मी कसा लिहितो नि काय लिहितो याहीपेक्षा जेव्हा मी लिहितो तेव्हा स्वतःच्या विश्वात रमलेला असतो. आता इतक्यात काय झालं कुणास ठाऊक? अचानक इतके बदल झाले की मी practically, कुठल्यातरी तिसऱ्याच विश्वात सध्या आहे. त्यामुळे या लेखनविश्वात रमायला मला वेळ होत नाही. की मी वेळ काढत नाही? कसंही असलं तरी वेळ नाही असं म्हणून कसं चालेल? जिथे मन रमवायला आवडतं तिथे वेळ काढायला हवा. त्या विश्वात मी किती वेळ राहतो नि किती उत्तम लिहितो हे तितकं महत्त्वाचं नाही.
ते रमणं महत्त्वाचं,
ते रममाण होणं महत्त्वाचं!
भान हरपून त्यात शिरणं महत्त्वाचं!
एका शांत स्थळी जाऊन लिहावं ही इच्छा अनेकांची असते. फक्त लिहिणं असं नाही तर निरनिराळ्या छंदांसाठी कोणाकोणाला कुठे कुठे जायचं असतं. आता एका प्रकारे काही प्रमाणात शांत ठिकाणी आलोय, तर मन अशांत आहे की काय असं जाणवू लागलंय. मन स्थिर केलं तर परिस्थिती अस्थिर वाटते. ते ही मनाचंच आहे म्हणा. हे सगळं घडण्यात दोष कसलाच नाही, कोणाचाच नाही.
सगळं जेव्हा नेहमीसारखं चालू असतं तेव्हा एका प्रकारे आपण त्या रोजच्या दिवसाशी set झालेलो असतो. पण जेव्हा बदल घडतो तेव्हा अनेक गोष्टी बदलतात. असा बदल जिथे स्थल, काल, काम काज सगळंच वेगळं असतं. हे जुळवून घेणं सोपं नसतं. सोपं असेल तर मजा काय म्हणा. हे असं सुद्धा स्वतःच स्वतःला समजावत राहावं. मग आव्हानं पेलायला भीती वाटत नाही. आपण जेव्हा त्या 'आपल्या विश्वात' रमतो, तेव्हा मग routine थोडं सुसह्य वाटू लागतं.
बदल आपल्याल नवे अनुभव देतात. अनुभव माणसाला शहाणं करतो. अनुभवाने समृद्ध होत जाणाऱ्या माणसाचा जगाच्या पाठीवर कुठेही निभाव लागतो आणि प्रयत्नाने प्रभावही पडतोच!
सध्या बदल अफाट आहे. स्थळ- काळ- काम- काज- खाणं- राहणं- माणसं- आव्हानं आणि असं बरंच काही... सगळं सगळं अगदी वेगळं, काही प्रमाणात नवीन. हे बदल काय आहेत याच्या detailing पेक्षा सुदधा निरनिराळ्या प्रकारचे बदल अनेकांच्या आयुष्यात अनेकदा अनेक प्रकारे कधी ना कधी होतात. यांना सामोरं जाण्याचं बळ आपलं आपणच आणायचं असतं. सामोरं जाता जाता त्या 'आपल्या विश्वात' मध्येच एखादी फेरी मारून येणं महत्त्वाचं. या आपल्या विश्वात चक्कर मारून येणं म्हणजे स्वतःला नव्याने प्रेरित करणं आणि बदलाशी जुळवून घेणं.
या बदलांमध्ये माझ्या या diary कडे लक्ष द्यायला वेळ झाला नाही, दिला गेला नाही. पण जमेल तसा तो वेळ देत त्या विश्वात रममाण होणं महत्त्वाचं. प्रत्येकाचं हे 'आपलं विश्व' निराळं असणार, असेल. कोणतंही असेल, पण ते स्वतःसाठी विशेष असावं इतकंच!
- वरुण भागवत

Loved it👌👌
ReplyDeleteThank you!!
Delete