"आता तर लक्ख उजाडलंय. तरी आज थोडा जास्तच वेळ आहे बघ तो आभाळात."
"कोण गं?"
"आपला चंद्र!"
"असं कसं गं?"
"कधी कधी राहतो तो असा जास्त वेळ. निसर्गाचं काय सांगावं?"
"किंवा कधी कधी त्याला निघून जावं वाटत नसेल. तिच्यासवे थांबून राहावं असं वाटत असेल!"
"ती?"
"त्याची सखी!"
"चंद्राची सखी?"
"हो. नसू शकते?"
"असेल."
"आहेच. चंद्राला साक्ष ठेवून इतकं काय काय romantic बोललं जातं, लिहिलं जातं. चंद्र नसणार का मग romantic?"
"हां."
"हां काय? खरंच! मग थांबत असेल तो त्याच्या सखीची वाट पाहत. थांबावं वाटत असेल त्याला. आज तसाच दिवस आहे. म्हणून तो अजूनही आभाळात दिसतोय."
"हो ना.. वाटत असेल थांबावं."
"रमत असेल तो तिच्या आठवणीत. झुरत असेल भेटीसाठी. आणि खूप दिवसांनी भेट झाली की मग तिच्यासोबत थांबून राहत असेल. नाही का?"
"हो रे. यात गंमत आहे खरी. मग ती सोडतच नसेल बघ त्याला."
"तिने तरी त्याला का सोडावं? मस्तपैकी घट्ट मिठीत पकडून थांबावं. कुशीत विसावून बसून राहावं."
"ए काय रे तुझं?"
"कुठे काय?"
"अरे सकाळी सकाळी काय romantic होतोस?"
"सकाळी सकाळी म्हणजे? Romantic व्हायला काय ठराविक वेळ असते?"
"अरे असं नाही. पण?"
"पण काय?"
"काही नाही. बोल."
"हां, तर मग त्यांनी मस्त एकमेकांच्या कुशीत विसावून बसावं. त्याने तिच्या चेहऱ्याकडे पाहावं. तिच्या चेहऱ्यावर तिचे कुंतल यावे. ते केश त्याने हलकेच बाजूला करावे. तिच्या डोळ्यांत पाहत राहावं. तिनेही पाहावं."
"Hold on. कधी eye contact थांबवायचा हे पण कळायला हवं बरं.."
"तेवढं कळतं चंद्राच्या सखीला."
"मग तरी पाहत राहतीये का त्याच्या डोळ्यांत?"
"हो, पण काही क्षणच. मग चटकन तिने नजर चोरत खाली पाहावं."
"हां. त्या हलकेच खाली जाणाऱ्या नजरेत एक वेगळं आकर्षण असतं बरं."
"हां, मग तेच तर तो पाहत राहतो. त्यात रमतो."
"मग हळूच वाकून पुन्हा डोळ्यांत पाहायचा प्रयत्न करतो. पण 'झुकी निगाहे' तिथेच असतात."
"तो हाताने तिची हनुवटी वर करत पुन्हा त्या नील नेत्रांत पाहतो."
"तिचे डोळे निळे असतात?"
"हो."
"बरं."
"तिचे गुलाबाच्या पाकळ्यांसारखे गुलाबी ओठ तो पाहतो. तो हे पाहतोय हे तिला कळतं. तिचे ओठ नकळत विलग होतात. ती ही नकळत त्याच्या ओष्टद्वयांकडे पाहते. श्वासाला श्वास भिडतो. ते दोघे खूप जवळ येतात. एकमेकांत गुंतून पडतात. एकमेकांचा श्वास जाणवतो. तिच्या श्वासातला सुगंध तो पितो. चंद्रच तो. चंद्रकोर जशी सुबक दिसते तसं त्याचं लाघवी हसू तिला मोहात टाकतं. आणि...
"आणि काय?"
"तिच्या चेहऱ्यावर एकदम प्रकाश येतो."
"कसा?"
"अगं, सूर्य प्रखर होऊ लागतो. त्याचा प्रकाश वाढू लागतो."
म्हणजे आता तिचा नि चंद्राचा विरह?"
"हो."
"तो जाणार?"
"हो गं. जावं तर लागणार."
"का?"
"कुठे थांबायचं हे त्याला कळतं."
"तिला नाही कळत?"
"तिला तर खूप कळतं. पण कधी तो वाहवत जातो तर कधी ती. कधी तो सावरतो तर कधी ती."
"पण विरह निश्चित. असंच ना रे?"
"हो. पण विरह झाला तर पुनश्च भेटीची मजा असते."
"पुन्हा कधी भेट?"
"भेट होणारच."
"कशी?"
"चंद्र आहे तो. कायमचा कसा निघून जाईल?"
"मग?"
"मावळतो तसा उगवेल सुद्धा आणि तिची नि सखीची भेट होईल सुद्धा!"
तिने मोकळ्या आभाळात पाहिलं. सूर्यनारायण प्रखर होत होता. चंद्र दिसत नव्हता. तिने त्याच्याकडे वळून पाहिलं. तो ही नव्हता. पण तो तिला पुन्हा भेटणार होता. चंद्रानेच तशी आशा पल्लवित केली होती.
- वरुण भागवत

वाह 👏👏खूपच छान लिहिलय तुम्ही 👌🏻👌🏻
ReplyDelete