Skip to main content

फुलपाखरं आणि ते दोघे!

 

A click by: Varun Bhagwat


ती आणि तो तलावाकाठी निवांत बसले होते. दोन फुलपाखरं बागडत होती, खेळत होती. चेहऱ्यावर सहज हसू यावं आणि क्षणभर ते टिकूनही राहावं असं ते दृश्य. क्षणभरच, कारण ते बघत असताना क्षणातच त्याच्या चेहऱ्यावरचं हसू मालवलं.


तो तिला म्हणाला, "या फुलपाखरांसारखं झालंय आपलं."

"म्हणजे?" तिला कळेचना.

"भेट होईल तो दिवस आपला. तो दिवस पूर्ण एन्जॉय करायचा, जसे आज भेटलोय."

"असं का म्हणतोस?"

"तू तिकडे, मी इकडे! अजून काय म्हणू?"

"हं. ही फुलपाखरं पण अशीच भेटत असतील का?" तिला प्रश्न पडला.

"कोणास ठाऊक? पण बघ ना, कधी का भेटेनात पण भेटतात तेव्हा फार खुश असतील असं वाटतं."

"आपल्यासारखीच!" ती हसत म्हणाली.



त्याला पटलं  आणि त्याने प्रतिसाद दिला, "हो गं. तुझं खरंय की आपण सारखे भेटत नाही सद्ध्या. मी तिकडे, तू इकडे. पण भेटलो की किती आनंदी असतो पण."

"पण तो आनंद त्या क्षणापुरताच!" ती थोडीशी खट्टू होत म्हणाली.



तो तिच्याकडे पाहत म्हणाला, "असेल, पण पुढच्या खूप दिवसांसाठीची एनर्जी देऊन जाते ती भेट. तो क्षण खूप काही देऊन जातो.

तो क्षणच लक्षात ठेवण्यासारखा असतो.

तो क्षणच जगण्याचा अर्थ सांगून जातो.

तो क्षणच साऱ्या भावना एकत्रितपणे सांभाळतो.

तो क्षणच सुख देतो,

तो क्षणच आनंदाने भरलेले अश्रू देतो.

तो क्षण हुरहूर देऊन जातो.

तो क्षण निखळ हसू देऊन जातो.

तो क्षण पोटभर प्रेम देऊन जातो.

तो क्षण मनाला स्पर्शून जातो.

तो क्षण मनाची घालमेल थांबवतो.

तो क्षण विश्वास देतो.

तो क्षण पुन्हा भेट होणारच अशी आशा देतो.

तो क्षणच क्षणभरासाठी दुःख विसरायला लावतो.

तोच क्षण विरह संपवतो.

तो क्षणच पुढच्या विरहाची नांदी देतो.

तोच क्षण खूप काही करतो.

तो क्षणच जगण्याचं रहस्य सांगून जातो.

तो क्षण जगण्याची गंमत सांगून जातो.

तो क्षण जगण्यातील प्रेम शिकवून जातो.

तो क्षण जगण्यातील सौंदर्य दाखवतो.

तो क्षण जगणं जगायला शिकवतो."


ती प्रश्नार्थक नजरेने म्हणाली, "हा एकच क्षण इतकं काही सांगतो??"

"हो." तो उत्तरला.

ती पुढे म्हणाली, "असे अनेक क्षण येतील ना आपल्या आयुष्यात? त्या सुंदर फुलपाखरांसारखं खुलून जगायचं आहे मला तुझ्याबरोबर!"

"नक्की येतील."



ती दोन फुलपाखरं अचानक थोडी शांत झाली. अगदी जवळ बसली. कदाचित काही गूजगोष्टी करत असावीत.


तिला वाटून गेलं की आपल्यासारखाच विचार चालू असेल यांचा कदाचित. काही क्षण गेले. ती फुलपाखरं जागेवर, हे दोघेही तिथेच. तिचं लक्ष त्या फुलपाखरांवरून हलत नव्हतं. ती एकटक त्यांच्याकडे पाहत होती. थोड्या काळासाठी एकूणच काळ थांबावा अशा पद्धतीत फुलपाखरं आणि हे दोघे स्थिर होते, एकाच जागी!


पुढल्याच क्षणी त्यातलं एक फुलपाखरू उडालं. दुसऱ्यापासून थोडं दूर उडत गेलं. ताटातूट होण्याचा क्षण आला असं तिला वाटलं. ती ते दृश्य पाहत होती. तिने शेजारी बसलेल्या त्याला ते दाखवण्यासाठी त्याचं लक्ष वेधलं. पण शेजारी पाहताच तिला जाणवलं की या दरम्यान तो तिला काहीतरी सांगून तिथून निघाला होता. तिनेही स्वतःच्याच नकळत त्याला जाण्यासाठी संमती दिली होती हे तिचं तिलाही कळलं नव्हतं. तिला जाणवलं. तो पाठमोरा होता. चालत होता. समोरही एक फुलपाखरू उडत होतं. दुसरं तिथेच जागीच स्तब्ध होतं.

.

.

ती विचारात होती. थांबावं की जावं. खाली शांत बसलेलं फुलपाखरू तिथेच होतं. तिने मात्र निर्धार केला आणि ती उठली. ती त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होती. खाली बसलेलं फुलपाखरु हलत नव्हतं. ती सुद्धा आधी जागीच थबकली. मग एकदम धावत सुटली, त्याला कळायच्या आत त्याला जाऊन बिलगली. त्याच्या मिठीत हरवून गेली.


तो शांत पण आनंदी.

ती तितकीच चपळ नि आनंदी!



ती त्याच्या मिठीत होती. तिच्या डोक्यात मात्र दोन फुलपाखरांचे विचार होते. मिठीत असतानाच हळूच ती खाली बसलेल्या फुलपाखराच्या दिशेने पाहू लागली. पण ते तिथे नव्हतं. तिने आशेने वर पाहिलं. वरती ते मगाशी उडालेलं फुलपाखरू होतं. पण खाली असणारं फुलपाखरू कुठे दिसेना. ती अस्वस्थ झाली. ते बिचारं निराशेने निघून गेलं का घरी? त्याचं काय झालं असेल? ते दिसेनासं का बरं व्हावं एका क्षणात? तिने पुन्हा आशेने खाली पाहिलं. ते त्या जागेवर नव्हतं.


थोडीशी अस्वस्थ, थोडीशी उदास अशा मनस्थितीत ती मिठीतून बाहेर आली. वर उडणारं फुलपाखरू तिच्या नजरेत होतं. पण ते उडत नव्हतं. पण ती जशी मिठीतून पूर्णपणे बाहेर आली तशी तिची कळी खुलली. कारण हवेत त्या स्थिर वाटणाऱ्या फुलपाखराच्या मिठीतून दुसरं फुलपाखरू बाहेर आलं, तिच्यासारखंच, अगदी अलगद! ती पुन्हा मिठीत शिरली, पुन्हा उत्सुकतेने तिने फुलपाखराच्या दिशेने पाहिलं. पुन्हा एकच फुलपाखरू आहे असं वाटलं. पण बाजूने हळूच एक पंख डोकावला. ती आनंदून गेली.


एकरूप झालेली ती फुलपाखरं क्षणभर मिठीत विसावली!


- वरुण भागवत



Comments

Popular posts from this blog

Late झाला तर...

समीर नी चिडचिड करतच गाडीला किक मारली. पहिल्या किकला स्टार्ट होणारी गाडी आज चार किका मारून सुद्धा स्टार्ट होत नव्हती. अखेर पाचव्या किकला गाडी सुरू झाली. गाडी सुरू झाल्यानंतर त्याचा राग त्याने Accelerator वर पिळ देत काढला. Accelerator खूप जास्त प्रमाणात पिळत त्याने गाडी idle च ठेवली. त्यानी गाडी इतकी raise केली की शेजारच्या पाटील काकू काचेची खिडकी उघडून डोकावून पाहू लागल्या. त्या बघताच तो थोडासा embarrassed झाला. समीर त्यांच्याकडे बघून कसंनुसं हसला. गाडीचा कधीच इतका मोठा आवाज न करणारा समीर आज थोडं वेगळंच वागताना पाहून समोरच्या शेलार काकूंना आश्चर्य वाटलं होतं. मिस्टर शेलार सुद्धा पूजा करत करत खिडकीतून डोकावून पाहू लागले. आता मात्र समीरने पटकन नजर चोरत gear टाकत तिथून पळ काढला. वर्षा मावशींची गडबड चालू होती. त्यांना काहीही करून त्यांची बस गाठायची होती. कारखान्यात वेळेवर पोहोचणं भाग होतं. पतीच्या निधनानंतर गेली दहा वर्ष, घरापासून ८ किलोमिटर अंतरावर असणाऱ्या कारखान्यात त्या कामाला होत्या. त्यांनी हे काम करून मुलालाही मोठ्या कष्टाने वाढवलं होतं. आता मुलगा कॉलेजमध्ये होता आणि  कॉलेजच्याच ...

Parking आणि त्या तिघी!

  ईशा किराणामालाच्या दुकानातून दोन जड पिशव्या तिच्या नाजूक हातात घेऊन आपल्या two wheeler पाशी पोहोचली. तिथे गेल्या गेल्या तिला दिसलं की तिच्या गाडीच्या दोन्ही बाजूंना चिकटून दोन गाड्या लावल्या आहेत. आणि या तीनही गाड्या side stand वर आहेत. बाकीच्यांनी गाड्या side stand वर लावण्याचं कारण म्हणजे mostly आळस किंवा parking मध्ये दुसऱ्याची गाडी काढायला लावायला अवघड जाईल यांचं भान नसणे. ईशाने side stand वर लावण्याचं कारण आळस नव्हतं, तिला भान होतं; पण तिच्या नाजूक बांध्याला गाडी double stand वर लावणं म्हणजे कमरेची वाट लावून घेण्यासारखं होतं. त्यामुळे ती गाडी side stand वर लावायची. त्यामुळे गाडी काढताना अडचण होणं हा आजचा problem नव्हता. पण नेहमी कोणी ना कोणी सहाय्यास येई. आज मात्र गाडी main road पासून आत साधारण ५०० मीटर अंतरावर असणाऱ्या गल्लीत, उजवीकडे वळून अजून पुढे १०० मीटरवर असणाऱ्या किराणा दुकानासमोर होती. दुपारचा १ वाजला होता. Grocery shop मध्ये सकाळच्या सत्रातली ईशाच शेवटची customer होती. तिने सामान भरताच Shutter down करून ईशा गाडीजवळ येईपर्यंत भरत भाई निघून गेला. गल्ली, दुपारी १ ची व...

मनातल्या एकलव्याची भरारी...

  A click by : Varun Bhagwat  "हातात घेतलेली रेती किती सहज सुटते. आपण पकडून ठेवलीय असं वाटतं. आपला त्यावर ताबा आहे असं वाटतं पण..." "पण ती निघून जाते. असंच ना?" "हो, जशी माझी नोकरी गेली तशीच. शाश्वतीच नाही राहिली कसली." "हं..." "मी किती कष्ट घेतले. रोज नवीन काहीतरी शोधू पाहत होतो, शिकत होतो. पण असा तडकाफडकी निर्णय घेऊन मला काढून टाकलं. कुठे चुकलं माझं?" "तू मर्जीतील माणूस नव्हतास." "काय?" "खूप स्पष्ट बोलतोय मी. पण हेच सत्य आहे." "पण म्हणजे काय?" "खूप explain करावं लागेल. "मग कर." "वेळ आहे?" "नोकरी गेल्यावर वेळच वेळ असतो." "बरं. मग ऐक. द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडवांचे गुरू. अर्जुन तर त्यांचा लाडका शिष्य. त्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवण्याचं वचन त्यांनी त्याला दिलं होतं. एकदा गुरू द्रोणाचार्य त्यांच्या साऱ्या शिष्यांसवे अरण्यात गेले होते. एक कुत्रा खूप वेळ भुंकत होता. मात्र काही काळाने तो शांत झाला. कोणाला कळेना की हा अचानक कसा काय इतका शांत झाला? जिथून त्या ...