कामाचं ठिकाण. कामात थोडया वेळाचा ब्रेक होता. मी खुर्चीवर बसलो होतो. ३ जण शेजारी होते. अचानक एकाच वेळी निरनिराळ्या कारणांनी ते तिघे उठून तीन दिशांना गेले. मी तिथे एकटाच. एकदम एकटा पडलो असं वाटलं. एकटा पडलो होतो, एकटं वाटत होतं की एकटं वाटत होतं म्हणून एकटा पडलो होतो? काही कळत नव्हतं.
आजूबाजूला पाहिलं. प्रत्येक जण काहीतरी करण्यात व्यस्त. माझ्याशी बोलायला कोणीच नव्हतं. की मीच कोणाशी बोलत नव्हतो? की मी कोणाशी बोलत नव्हतो म्हणून माझ्याशी कोणी बोलत नव्हतं? की कोणी माझ्याशी बोलत नव्हतं म्हणून मी कोणाशी बोलत नव्हतो?
मग नीट पाहिलं. प्रत्येक जण तिथे एकटा होता. म्हणजे माणसं खूप होती पण सगळे एकत्र नव्हते. प्रत्येक जण आपापल्या विश्वात होता. स्वतःतच व्यस्त होता. काही जण तिथे खरोखरीच स्वतःच्या कामात व्यस्त होते. मात्र अनेक जण नुसतेच एकटे होते, जे खरंतर संवाद साधू शकत होते. अगदी सहज एकमेकांशी बोलू शकत होते. पण तसं घडत नव्हतं. ते पण माझ्यासारखंच स्वतःला एकटं समजत होते?
.
गंमत आहे सगळीच. मी बोलायला पुढाकार घेत नाही किंवा समोरचा घेत नाही यावरून कितीतरी संवाद होता होता राहून गेले असतील? कितीतरी जणांना आपलं मन मोकळं करायचं असेल मात्र योग्य व्यक्तीच सापडत नसेल? कितीतरी जण कुढत बसत असतील?
.
अनेक प्रश्न. हे प्रश्न मलाच पडले की अनेकांना पडले असतील? पडत तरी असतील का? हो, पडत असतील. पण ते प्रश्न विचारायचे तरी कोणाला? कधी कधी त्याचंही धारिष्टय होत नाही. हो, इथेच अडतं. पटकन न बोलण्याने किंवा न विचारण्याने असं घडतं. घडू शकणार असते ती गोष्ट घडत नाही. नंतर सगळ्याचा विचार होतो. पण मग वेळ निघून गेलेली असते. मग जाणवतं, अरे, विचारायचं, बोलायचं, सांगायचं राहून गेलं.
.
प्रश्न पुन्हा अनुत्तरित.
मी ही आत्ता तेच करत होतो. माझ्या समोर एक जण बसला होता. खूप वेळ एकटाच होता तो ही. कामात व्यस्त नव्हता. उलट काम करून थकला होता. थकला होता, पण थकून बसला नव्हता. त्याची शोधक नजर कोणाला तरी शोधत होती. कोणीतरी केवळ त्याच्याकडे बघून त्याचं एक अस्तित्त्व आहे इतकी जाणीव करून देणंही पुरेसं होतं असं वाटून गेलं. मग अस्मादिकांनी ठरवलं की कुठेतरी आपणही पुढाकार घ्यायला हवा. उठलो, त्याच्या समोर जाऊन केवळ त्याला "hi" केलं. त्यानेही "hello" म्हणून प्रतिसाद दिला. मी पुढे निघालो. सहज वळून पाहिलं. पुसटसं हसू त्याच्या चेहऱ्यावर होतं. मी ते हेरलं. त्यामुळे माझ्या चेहऱ्यावर हसू आलं. ते बाजूने pass होणाऱ्या मुलीने पाहिलं. ती माझ्याकडे पाहून छानसं हसली. मी हसू तसंच ठेवत पुढे आलो.
समोरून boss आला. Boss ने "आज काय विशेष?" असं विचारलं असता मी उत्तरादाखल म्हणालो, "काही नाही." Boss आश्चर्य व्यक्त करत म्हणाला, "तू हसतोयस म्हणून म्हटलं की काही विशेष?" आणि हसत निघून गेला. मी त्या प्रश्नात अडकलो. विचार केला. माणूस सहज हसू शकत नाही का? हसायला काहीतरी विशेष घडावच लागतं का? मी हसतच नाही की काय? म्हणूनच कदाचित boss म्हणत असेल की काय विशेष?
वाटून गेलं की हसत राहिलं पाहिजे, विशेष काही घडलं नसलं तरी किंवा प्रत्येक प्रसंग विशेष असतो हाच भाव डोक्यात ठेवून क्षण अन क्षण उत्तम जगलं पाहिजे.
.
.
एकाने खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, चलो, चहा मारूया. मी आपसूक हो म्हणालो आणि सोबत गेलो.
.
.
त्या टपरीवर रोज चहा घेत होतो. पण कटिंग चहा घेणे आणि त्याचे पैसे देणे या पलीकडे कधी काही चहावाल्याशी बोलणं नव्हतं. आज चहाची order दिली. चहा उकळेपर्यंत वेळ होता. विचारलं त्याला धीर करून, "घरी कोण असतं?" क्षणभर त्याचा प्रश्नार्थक चेहरा झाला जो विचारू पाहत होता की तू माझ्याशी बोलतोयस?? पण दुसऱ्याच क्षणी घडाघडा बोलू लागला. मोकळेपणानी सगळं सांगू लागला. त्याबरोबर चहा उकळू लागला. आलं नि गवतीचहाचा गंध भरून राहिला. चहा पिण्याआधीच काहीसा fresh झालो. कारण मनाने मोकळा झालो होतो. कामाच्या ठिकाणी "hi" या एका शब्दाने सुरू झालेला संवाद चालूच होता.
.
सुरुवात या विचाराने झाली की आपण एकटे, पण आत्ता एकटेपणा वाटत नव्हता. हे सगळे कोण होते माझे? खरंतर नातं काहीच नाही. पण हे सगळे आपलेसे झाले. सुहास्याने आणि मोजक्या पण मोकळ्या शब्दांमुळे!
.
चहा घेऊन माझ्या जागेवर येऊन बसलो. सुरुवातीला उठून गेलेले ते तिघेही अजून जागेवर आले नव्हते. ते एकटेच असावेत असं भासलं होते. मग लक्ष गेलं आणि लक्षात आलं की तो माझा भ्रम होता. ते तिघेही एकत्र येत होते, हसत, गप्पा मारत एकमेकांना टाळ्या देत होते. मी स्वतःशीच हसलो.
- वरुण भागवत
Khup sundar ✨👍☺️👏
ReplyDeleteDhanyawad!! 😊
Deleteखूप जवळचा तरी अपेक्षित राहिलेला विषय खूप अप्रतिम पणे मांडला आहेस
ReplyDeleteThank you!! 😊
Deleteछान लिहीले आहे.
ReplyDeleteThanks
Deleteछान!
ReplyDeleteज्ञाना 👍😊❤
ReplyDeleteछान लिहिलंय. ज्ञानेश्वर माऊली.
ReplyDelete👌👍shabdha rachna atiuttam
ReplyDelete