समीर नी चिडचिड करतच गाडीला किक मारली. पहिल्या किकला स्टार्ट होणारी गाडी आज चार किका मारून सुद्धा स्टार्ट होत नव्हती. अखेर पाचव्या किकला गाडी सुरू झाली. गाडी सुरू झाल्यानंतर त्याचा राग त्याने Accelerator वर पिळ देत काढला. Accelerator खूप जास्त प्रमाणात पिळत त्याने गाडी idle च ठेवली. त्यानी गाडी इतकी raise केली की शेजारच्या पाटील काकू काचेची खिडकी उघडून डोकावून पाहू लागल्या. त्या बघताच तो थोडासा embarrassed झाला. समीर त्यांच्याकडे बघून कसंनुसं हसला. गाडीचा कधीच इतका मोठा आवाज न करणारा समीर आज थोडं वेगळंच वागताना पाहून समोरच्या शेलार काकूंना आश्चर्य वाटलं होतं. मिस्टर शेलार सुद्धा पूजा करत करत खिडकीतून डोकावून पाहू लागले. आता मात्र समीरने पटकन नजर चोरत gear टाकत तिथून पळ काढला.
वर्षा मावशींची गडबड चालू होती. त्यांना काहीही करून त्यांची बस गाठायची होती. कारखान्यात वेळेवर पोहोचणं भाग होतं. पतीच्या निधनानंतर गेली दहा वर्ष, घरापासून ८ किलोमिटर अंतरावर असणाऱ्या कारखान्यात त्या कामाला होत्या. त्यांनी हे काम करून मुलालाही मोठ्या कष्टाने वाढवलं होतं. आता मुलगा कॉलेजमध्ये होता आणि कॉलेजच्याच एका शिबिरासाठी तो परगावी गेला होता. त्यामुळे आज फटफटीवर बस स्टॉप पर्यंत सोडायला त्यांचा मुलगा घरी नव्हता. आपल्या वडिलांची जुनी splendor bike घेऊन तो आईला बस स्टॉप वर सोडत असे नि तसाच विरुद्ध दिशेने त्याच्या कॉलेज ला जात असे. पण आज तो घरीच नव्हता. त्यामुळे वेळेचा अंदाज गडबडला. बस स्टॉप पर्यंत चालत जाणं भाग पडलं. त्यांच्या डोक्यात विचार घोळत होता. New DP road पर्यंत बस. New DP road ला रामेश्वर चौकात उतरलं की तिथून पुढे उजवीकडे आपला कारखाना आतल्या बाजूला. तिथे पोहोचायला नेहमीप्रमाणे चालत थोडा वेळ जाईल. पोहोचेन मी वेळेत. बस गाठली म्हणजे मिळवलं. या विचारात असताना त्या धावतच बस स्टॉपला पोहोचल्या.
इकडे समीर गाडी पळवत होता. समीरचा स्वभाव शांत. पण वेळेच्या बाबतीत पक्का. ऑफिसला जाताना नेहमीच punctual असे. आज मात्र alarm ऐकूच न आल्यामुळे समीर झोपून राहिला. याचा परिणाम आता ऑफिसला पोहोचायला उशीर होणार होता. नऊ वाजताचं ऑफिसचं timing होतं.
New DP road च्या dead end ला समीर चं ऑफिस. घरापासून पाऊण तासाचा बाईक चा प्रवास. नवीनच लग्न झालेला समीर आज उशीर झाल्याने बायकोवर पण चिडचिड करून आला होता. या साऱ्यात traffic इतकं की गाडी २० ते २५ किमी प्रती तास या वेगाने धावत होती. त्याने ८.२० ला घर सोडलं होतं. कितीही केलं तरी ऑफिसला पोहोचायला पाऊण तास. म्हणजे ९ वाजून ५ मिनिटं होणार. म्हणजे ५ मिनिटं उशीर होणार होता. हे त्याच्या तत्त्वात बसत नव्हतं.
समीर finally New DP road ला लागला. तरीही बरंच अंतर बाकी होतं. नेमकी त्याच्यापुढे एक बस होती. काही केल्या overtake करू देत नव्हती. मागे धुरळा उडवत होती. एका बस स्टॉप वर बस थांबली. Overtake करायची नामी संधी होती. पण नेमकी समीरची गाडी बंद पडली. बस निघून गेली. Chance हुकला. धूळ settle होत होती. गाडी सुरू होतच नव्हती. बस जशी पुढे जाऊ लागली तसं बस स्टॉप जिथे होता तिथल्या गल्लीतून एक पन्नाशीची बाई धावत तिथे पोहोचली. धुराळ्याची पर्वा न करता बस च्या मागे धावू लागली. पण बस निघून गेली. समीर हे सगळं पाहत होता. बाई बस स्टॉप वर थांबली.
ती समीरजवळ आली. बाईकचं मागचं seat रिकामं पाहिलं. बाई थेट बोलली, "माझी बस चुकली. मला रामेश्वर चौकात सोडा ना."
समीर थोडासा वैतागलेल्या सुरात म्हणाला, "इथे माझीच गाडी सुरू...." गाडी सुरू होत नाही असं म्हणेपर्यंत गाडी सुरू झाली.
त्याने बाईकडे पाहिलं. वर्षा मावशी आर्जवाच्या सुरात म्हणाल्या, "सोडतोस?"
समीर gear टाकत म्हणाला, "बसा."
मावशी बसल्या. बोलू लागल्या, "बाळा, मी हीतं रामेश्वर चौकातून आत गेलं की जो कारखाना हाय ना थितं कामाला हाय."
उशीर झालाच होता. आता समीरला उशीर झाला आहे या गोष्टीचा हळूहळू acceptance येत होता. तो मावशींचं बोलणं ऐकत होता.
मावशी सांगत होत्या, "लेट केला का मग पैशे कापतात रं. म्हनून सोड म्हनले. तरीबी थोडा लेट व्हइनच. पन बगु."
पैसे कापले जातील ही गोष्ट ऐकून समीर त्यांच्या बोलण्याकडे अधिक लक्ष देऊ लागला. केवढी साधी बाई होती. मुलाला मोठं करायचं स्वप्न उराशी बाळगून रोज पायपीट, बस असा प्रवास करून कारखान्यात पोहोचून काम करायचं. काही न बोलता कष्टणारे आई बाप त्याला आठवले. बोलता बोलता रामेश्वर चौक आला . त्या म्हणाल्या, "थांबव लेकरा."
काहीसा विचार करत समीरने गाडी न थांबवता चौकात कारखान्याच्या दिशेने वळवली.
मावशी म्हणाल्या, "तुला तर सरळ जायचं असन ना?"
"तुम्हाला सोडून जाईन की."
"तुला बी उशीर?"
"नाही होणार."
गप्पांच्या नादात कारखाना आला. मावशी उतरल्या. अजून २ मिनिटं होती. वर्षा मावशी जशा बस पकडायला धावल्या होत्या त्याच वेगाने सही करण्यासाठी धावल्या. घड्याळावर लक्ष ठेवणारा इसम तिथे उभा होता. समीर सारं पाहत होता. त्यांनी वेळेत सही केली आणि समीरकडे वळून पाहत हात केला आणि हसल्या. त्यांच्या डोळ्यातील चमक लांबूनही समीरला दिसली.
गाडी वळवत शांतपणे तो ऑफिसच्या दिशेने जाऊ लागला. Sharp ९ वाजले होते. तो विचार करत होता. जितका वेळ मला रामेश्वर चौकातून कारखान्याकडे यायला लागला तितकाच वेळ ऑफिस ला पोहचायला लागत असावा. कदाचित वेळेत पोहोचलो पण असतो. कदाचित ५ मिनिटं late झाला असता. कदाचित...
समीरच्या ऑफिसमध्ये महिन्याला ३ late marks allowed होते. त्याचा एकही late mark आजवर झाला नव्हता. वेळेत पोहोचणं हे त्याचं तत्त्व होतं. Late केला तर त्याचं नुकसान होणार नव्हतं, होणार नाही. कोणी काही बोलणारही नव्हतं. पण मावशींना late झाला तर त्यांचे पैसे कापणार हे त्याला पटलं नसावं. म्हणून कदाचित त्याने त्यांना सोडलं असावं.
कारण आज late होऊनही त्याच्या चेहऱ्यावर समाधान होतं. तो पोहोचला. ५ च्या जागी १० मिनिटं late पोहोचला.
शांतपणे गाडी लावून punching machine पाशी गेला. तर तिथे गर्दी झाली होती. त्याचा colleague चंद्रशेखर भेटला. तो म्हणाला, "morning समीर."
समीरने विचारलं, "morning चंदू. गर्दी का आहे punching machine पाशी?"
चंद्रशेखर म्हणाला, "punching machine बंद पडलं आहे. तिथल्या register वर सगळे सही करत आहेत. निम्मे या विचाराने खुश आहेत की आपण लिहू ते timing. थोडक्यात आज कोणीच late नाही."
समीर अवाक होऊन पाहत राहिला. तो register पाशी पोहोचला. त्याने नाव लिहिलं आणि timing च्या column पाशी पेन नेला.
- वरुण भागवत

खूप छान लिहलं आहे कधीतरी आपला विचार सोडून दुसऱ्यांसाठी जगता आलं पाहिजे...
ReplyDeleteनेहमीच नसलं तरी कधीतरी अनपेक्षित पणे केलेली मदत ही श्री समर्थ चरणी रुजू होते .खूप छान लिहिलय तुम्ही.
ReplyDeleteWahhhh भिडलं की..
ReplyDeleteThanks 🙏
Deleteलिखाण समोर उभे राहते वाचताना..!
ReplyDeleteDhanyawad!!
ReplyDelete