![]() |
| A click by: Varun Bhagwat |
सोडून गेली याहूनही अधिक अजूनही आठवणीतून गेली नाही याचं जास्त वाईट वाटत होतं त्याला... मग विचार आला की तिची आठवण कशी निघून जाईल? माणसं जातात, त्यांच्या आठवणी राहतात. आठवण राहते याचं वाईटच अधिक वाटत राहतं. कारण चांगल्या आठवणी आठवल्या की आता 'ते क्षण' नाहीत म्हणून वाईट वाटतं. वाईट आठवणी आठवल्या की त्या आठवताना अंगावर काटा येतो नि तो म्हणाला की या वाईट आठवणीच नको.
पण त्याला काहीच बदलता येत नव्हतं. परिस्थितीचा स्वीकार हा एकमेव उपाय होता. हा उपाय दिसतो सोपा, पण अमलात आणणं फारच मुश्किल. स्वीकार करायला मनाचं खूप मोठं स्थैर्य लागतं. हे स्थैर्य प्राप्त करायला मनावर नियंत्रण लागतं. मनावर नियंत्रण आणणं हे ज्याचं त्याचं कसब.. अशक्य नाही पण फार अवघड गोष्ट.
पण त्याने ठरवलं. मनाचा हिय्या करून पुढचं आयुष्य उत्तम पद्धतीत जगण्याचा निर्णय घेतला. खरंतर हा निर्णय घेणं सुद्धा सोपं नाही. असा निर्णय घेताना स्वतःला शाबासकी द्यायला विसरायचं नाही. कारण मनातून खचल्यावर, कोणी जवळचं सोडून गेल्यावर माणसं आतून पूर्ण तुटतात. सावरणं अवघड असतं.
हे जमलं म्हणजे 'पुन:श्च हरी ओम' करण्याची पहिली पायरी यशस्वीरीत्या पार पडली, असं त्याने स्वतःलाच बजावलं. त्याचा त्यालाच धीर आला. अशा अवघड परिस्थितीत सावरणारं कोणी असतंच असं नाही. असलं तरी चोवीस तास सवे असेलच असंही नाही. मग स्वतःच स्वतःचा साथीदार होत स्वतःला पुढे न्यायचं.
तोही हेच करत होता. पुन्हा एकदा स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करत त्याने झेप घ्यायचं ठरवलं. त्या दृष्टीने तयारी सुरू केली. बाकी सारे विचार बाजूला सारत तो घोडदौड करू लागला. इतर विचार नसले नि एकाच विचाराने माणूस कृती करत राहतो नि आपल्या लक्ष्यावर लक्ष स्थिर राहतं.
हे बळ आणायला पुन्हा एकदा मनालाच कार्यरत राहावं लागतं. कारण मन विचलित झालं की तनाची चलबिचल झालीच समजायची. हा विचार त्याच्या मनी आला तोच त्याला रस्त्यावरून चालत असताना फुगे दिसले. तिला आवडणारा लाल फुगा त्याने पाहिला. हा विचार नको म्हणून आधी दुर्लक्ष केलं. पण पुन्हा कसलासा विचार करत त्याने फुगा विकत घेतला.
फुगा घेऊन तो रस्त्याने चालत राहिला. रस्त्याच्या बाजूला एका ठिकाणी शांतपणे थांबला. डोळे मिटले. त्याच्या खांद्यावर अलगद हात आला. डोळे उघडले नि पाहिलं तर 'ती' होती. गोड हसत होती. चेहऱ्यावर आलेली केसाची बट मागे करत हलकेच लाजत होती. भुवया हलकेच प्रश्नार्थक करत जणू विचारत होती की माझ्याकडे काय पाहतोयस असा? तो नजरेनेच काही नाही असं म्हणाला.
पुन्हा एकदा नाजूक हात आला. पण हात खांद्यावर नव्हता. त्याच्या उजव्या हातात फुगा होता. डावा हात खाली होता. नि तो हात एका नाजूक हाताने पकडला होता. तो आत्ता भानावर आला. त्याला बोलवणारी 'ती' नव्हती. डोळे उघडले. पाहिलं तर एक मुलगीच होती, पण साधारण ५ वर्षाची. गोड हसत होती. हाताने खुणावत 'मला फुगा हवा' असं म्हणत होती. त्याला काही कळायच्या आत तिच्या बाबांनी तिला आवाज दिला. आता फुगा न घेता जावं लागेल हे तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. भानावर आलेल्या त्याने पटकन गुडघ्यावर बसत तो फुगा तिच्या हातात दिला. तिच्या चेहऱ्यावरचा विलक्षण आनंद पाहण्यासारखा होता. ती हसत तिच्या बाबांकडे गेली. बाबांनी तिला उचलून घेतलं. तो हे पाहत होता. लाल फुग्यासवे आता नव्या आठवणी जोडल्या जात होत्या.
मध्ये काही दिवस गेलेलं. पुन्हा रस्त्यात लाल फुगा बघितल्यावर त्याने दुर्लक्ष केलं नाही. तो त्याच्याकडे बघून मनापासून हसत होता. हसायला आता कारण होतं. तो हसला ते डोळे मिटल्यावर दिसलेल्या 'तिच्या'बद्दल जी खरंतर आता त्याच्या आयुष्यात नव्हती. पण खिलाडूवृत्तीने स्वतःच केलेल्या या स्वीकाराबद्दल तो स्वतःशीच हसला.
हो, आत्ता तो स्वीकार येत होता. कारण 'तिच्या'सवे देखील सुंदर आठवणी होत्याच. फुगा हे निमित्त. फुगा ही त्यातली एक सुंदर आठवण. मग या हव्याहव्याशा आठवणींनी का रडायचं? मान्य आहे की 'ती' आता सवे नाही. हां, या आठवणींनी डोळे हलके ओले होतील. पण आपण ते क्षण तितके सुंदर जगलो होतो याचा आनंदही असेल. त्यामुळे आता चांगल्या आठवणी आठवून आता ते क्षण नाहीत याचं त्याला वाईट वाटलं नाही, तर ते क्षण आपण पूर्णपणे जगलो याचा आनंद वाटला. म्हणून तो निर्मळ हसला.
मग तो पुन्हा हसला ते भानावर आल्यानंतर लहान मुलीसवे खरोखरी घडलेल्या घटनेवर, फुगा देत त्याने नकळत वाटलेल्या आनंदावर आणि त्यामुळे साठवलेल्या त्या लहान मुलीच्या गोड आठवणीवर!
- वरुण भागवत

Mind blowing मला खूपच आवडली story खूपच छान lihiliye
ReplyDeleteभारी लिहिलायेस भावा 😍💯🤍
ReplyDeleteApratim✨💓💖
ReplyDeleteThanks
DeleteDhanyawad
ReplyDeleteज्ञाना खूप छान लिहिले ❤👍🙏
ReplyDeleteKhup chan
ReplyDelete