![]() |
मिट्ट काळोख. समोर पूर्ण अंधार. चालायला तर हवं. पण कसं? सोबत कोण करेल? तेवढ्यात त्या अंधारात कोणीतरी अलगद हात पकडतं. कानावर हलकेच आवाज येतो, "चालत राहा. प्रकाशापर्यंत नेणारी वाट हीच आहे बाळा!"
मी विचार करू लागतो की हा कोण आहे? त्याच्या शब्दांमधील भाव विश्वासार्ह असतो. मला वाटून जातं की कोणी संत माणूसच असणार!
मी त्या साधूच्या / संताच्या शब्दांवर विश्र्वास ठेवतो. चालू लागतो. थोडा वेळ काहीच नाही. अंधार संपायचं नावं नाही. मी हरणार असं जाणवताच, "अजून थोडंच चाल. तू इप्सित स्थळी पोहोचशील." असा मृदू आवाज कानी येतो. त्या आवाजावर आणि विश्वासावर मी चालू लागतो.
मला कळलेलं नसतं की मी जे करतोय ते काय आणि का करतोय. त्या आवाजावर, त्या बोलण्यावर विश्वास का ठेवतोय? त्या शब्दांत, त्या बोलण्यात, त्या आवाजात अशी काय जादू आहे जी मला पुढे चालायला भाग पाडतीये?
एक गोष्ट निश्चित की आधीच आपण अंधारात आहोत. या संत माणसाचं ऐकलं नाही नि तिथेच थांबलो तर अंधारातच राहू हे निश्चित! ऐकलं तर मात्र प्रकाशापर्यंत पोहोचण्याची शक्यता तरी आहे. नाहीच दिसला प्रकाश तर काय होईल? फार काही होणार नाही. अंधारात होतोच, अंधारातच राहीन.
अंधारातून अजून किती अंधारात जाणार?
मग म्हटलं विश्वास ठेवूया. विश्वास ठेवण्याची पण एक गंमत असते. आपण विश्वास ठेवताना किती विचार करतो? अर्थात आयुष्यात येणारे अनुभव माणसाला तसं वागायला भाग पाडत असतात.
'विश्वास' या गोष्टीवरचा विश्वासच अनेकदा उडालेला असतो. आयुष्याने दिलेल्या धड्यांमुळे पटकन कोणावर विश्वास ठेवला जात नाही.
पण अशा काही व्यक्ती, असे काही शब्द, त्या शब्दांमागील भाव खरोखर विश्वास देतात. 'विश्वास' या गोष्टीवर आपण पुन्हा विश्वास ठेवू लागतो. किमान असा विश्वास ठेवू शकतो याचा विश्वास येऊ लागतो.
हा विश्वास देणारा कोणी मार्गदर्शक, कोणी संत माणूस कुठेतरी भेटतो. आधी तर आपलं आयुष्य कल्पनेनेच प्रकाशमान करतो. म्हणजेच अत्यंत सकारात्मक भाव निर्माण करतो. त्याचं अलौकिक तेज प्रसन्नता देतं. आयुष्य केवळ अंध:कारमय नाही हा विश्वास मिळतो. तिमिरातून तेजाकडे जाण्याची वाट तो दाखवतो. "मी सवे आहे, तू चल पुढे!" हे नकळत सांगतो.
असं सांगणारं, असा विश्वास देणारं, असा विश्वास ठेवणारं, असा संतमाणूस, अशी संतसंगत आपल्याला तारून नेते.
प्रत्येक वेळी आपण स्वतःचं डोकं चालवत असतोच; कधीकधी दुसऱ्याने चालवलेल्या डोक्यानुसार आपण मार्गक्रमण करायचं. जमतं. कधीकधी नेहमीपेक्षा जास्त चांगलं पण जमतं.
पण अखेरीस मानवी मन ते! डोकं चालवायचं नाही असं कितीही ठरवलं तरी अंधारलेल्या वाटा प्रकाशमान कधी होणार हा प्रश्न भेडसावत राहतोच! आपण पुन्हा विचारात जातोच. पण पाहता पाहता बरंच अंतर कापून पुढे जातो. काही अंतर चालल्यावर अंदाज येतो की आपण एका बोगद्यात आहोत आणि म्हणून तो अंधार अधिकच जाणवत आहे. लहानपणी वाचलेलं असतं की कुठेतरी बोगद्याचा अंत होतो, अंताला प्रकाश सापडतो वगैरे! मग मी अथक चालत राहतो.
जसं जसं मी बोगद्याच्या टोकाला पोहोचतो, परिसर प्रकाशमान होऊन जातो. एक आवाज माझ्या कानी पडतो, "जमलं बाळा तुला."
मी कृतज्ञता व्यक्त करायला वळतो. तो संत/ तो साधू/ तो वाटाड्या/ तो मार्गदर्शक तो सखा नसतोच. पण तरीही त्याचं अस्तित्त्व त्याने निर्माण केलेल्या सकारात्मक लहरींमधून जाणवत राहतं. ती ऊर्जा मी भरून घेतो पुढच्या प्रकाशमान वाटेवर चालण्यासाठी!
२ पावलं चालल्यावर दिसतं की अजून एक वाट आहे जिथे अंधार आहे. कोणीतरी त्या वाटेवर चाचपडत आहे. त्याच्याही आजूबाजूने अंधार आहे. मला स्वत:ची धडपड आठवते.
"मिट्ट काळोख. समोर पूर्ण अंधार. चालायला तर हवं. पण कसं? सोबत कोण करेल?" असा प्रश्न यालाही भेडसावत असेल असं मला वाटून जातं.
माझंच प्रतिबिंब मला त्याच्यात दिसतं. पावलं नकळत त्या दिशेने पडू लागतात.
- वरुण भागवत


अंतरमनावर विश्वास ठेवल्यावर दिसत नसलेल्या व्यक्तीचंही अस्तित्व जाणवत.👌🙏
ReplyDelete🙏😊😊
DeleteGajanan sutar Sangli mo 9021294710
ReplyDelete