तुझ्या डोळ्यात खोलवर पाहिलं की कुठलीतरी खोलवर वेदना का दिसते गं?
तू कशी आहेस विचारल्यावर हसतेस नि म्हणतेस बरी आहे. त्या हसण्यात तू बरी नाहीयेस, हे का कळतं गं मला?
तुझ्या विचारात तू हरवतेस नि मग तुझ्या नजरेत पोकळी का असते?
आपण एकमेकांच्या मिठीत नेहमी विसावत नाही, तरी आपली मिठी तुला का हवीहवीशी वाटते?
आणि मग आपण मिठीत काही क्षण जास्तच का बरं विसावतो?
मिठीचे ते जास्तीचे क्षणच समाधान का देतात?
आपण मिठीतून नेहमी अलगद का बाहेर येतो?
उबदार मिठी सुटली तरीही तो उबदार स्पर्श हवाहवासा का वाटतो?
मिठी सुटताच सहज हातात हात का गुंफला जातो?
एकमेकांची सोबत त्या हाताच्या स्पर्शाइतकी उबदार का वाटते गं?
आपण एकमेकांच्या कुशीत किंचित जास्त वेळ का रमून जातो गं?
आपलं नातं जन्मोजन्मीचं आहे असं का बरं वाटतं?
आपण एकमेकांसवे नसतो तेव्हा आठवणींत एकमेकांसवे का बरं असतो?
मग भेटल्यावर आपण एकमेकांची किती आठवण काढली होती हे का सांगतो?
लिहिता लिहिता तो थांबला.
त्याने तिला विचारलं, "असं का गं?"
ती पुस्तक वाचत होती. पुस्तकातून डोकं बाहेर काढत म्हणाली, "काय माहित?" नि ती पुन्हा पुस्तक वाचण्यात रमून गेली.
तिची सहजता पाहून तो ही तिच्याकडे पाहत राहिला.
कोणत्यातरी प्रेम कहाणीत ती रंगून गेली होती. मधूनच हसत होती, क्षणात तिचे डोळे ओलावत होते.
ती पुस्तक वाचत होती नि तो तिला वाचत होता.
काही क्षण विसावून तो त्याची वही हातात घेऊन जाऊ लागला. पुस्तकातून हलकेच नजर उचलत तिने त्याला हाताने थांबवलं.
ती म्हटली, "थोडं थांब ना."
तो थांबला. नजरेनेच त्याने "काय?" असं विचारलं.
"इथे एकटं बसायला नको वाटतंय." ती बोलली.
"तुझं पुस्तक आहे की तुझ्यासवे." तो वही बाजूला ठेवत म्हणाला.
"ते पुस्तक अजूनच एकटं करतंय मला.'
"मग नको वाचू."
"सोडवत नाहीये. तुलाही सोडावं वाटत नाहीये."
"सोडायला कोणी सांगितलं? आणि तूच थांबवलंस ना हात पकडून?" तो गोड हसत म्हणाला.
"किती काळ थांबशील?"
"जेवढा काळ सोबत आहोत!"
"हा काळ खूप थोडा आहे."
"Then let's make the most out of it. मुळात हा काळ थोडा असला तरी पुन्हा भेट होणार नाही असं तर नाहीये."
"कधी होईल भेट?" ती थोडी खट्टू होत म्हणाली.
"कधी ते माहीत नाही गं. पण मला विश्वास आहे नक्की होईल."
"पण आपण रोज भेटणार नाही... असं का रे?"
"रोज भेटलो नाही तरी पुन्हा भेट होईलंच. नातंच असं जोडायचं की २ भेटीत काळ गेला तरीदेखील दुसरी भेट आजच्या भेटीनंतर लगेचच घडलीय असं वाटावं."
ती त्याचं बोलणं ऐकत राहिली.
तिला पटत होतं पण पटवून घ्यायचं नव्हतं.
त्यालाही कळत होतं पण वळवून घ्यायचं नव्हतं.
त्यामुळे कधी तो विचारत होता असं का गं? तर कधी ती विचारत होती असं का रे?
कितीतरी वेळ हे चालूच राहिलं. बाजूला ठेवलेल्या वहीची पानं फडफडू लागली. त्याच्या लक्षात येताच तो वही बंद करायला गेला. दोघांना जाणवलं की त्यांचा हात एकमेकांच्या हातातच होता.
- वरुण भागवत

Comments
Post a Comment