राघवच्या मनात संमिश्र भावना होत्या. नुकतीच त्याची एका tv show मधील मध्यवर्ती भूमिकेत entry झाली होती. अनेक जण शुभेच्छांचा वर्षाव करत होते. Show सुरू झाला याचं छोटं celebration सुद्धा show च्या set वर झालं होतं. सगळे जण enjoy करत होते.
राघव मात्र विचारात गढला होता. तो त्या गर्दीतून थोडा बाजूला येऊन set वरच्या एका पारावर
येऊन बसला. राघव तिकडे आहे हे कोणाच्याच लक्षात आलं नाही. Rather, राघवला ते कोणाच्या लक्षात येऊच द्यायचं नव्हतं इतक्या शांतपणे तो बाजूला झाला होता. पण ज्यांच्या लक्षात यायला हवं त्यांना कळलंच. राघवला नाटक शिकवणारे राघवचे सर पण set वर उपस्थित होते. या गर्दीतून त्यांचा राघव ते शोधत होते. तो दिसला नाही. त्याला आधीपासून ओळखत असल्याने त्यांनी जाणलं आणि त्याला शोधत ते बरोबर त्याच्या शेजारी येऊन बसले. राघवच्या मनात काय चालू असेल याचा सरांना अंदाज आला. पण सर काहीच बोलले नाहीत. काही वेळ दोघे नुसतेच बसून होते.
सरांनी पाठीवर हात ठेवला, म्हणाले, "काय, कसं वाटतंय?"
राघव इलुसं हसला.
सरांनी विचारलं, "कसला विचार चालू आहे?"
राघव त्याच्याच zone मध्ये होता. म्हणाला, "कोण काय म्हणलं, कोणाला कसं वाटलं?"
सर हसत त्याला तोडत म्हणाले, "एवढंच?"
राघव आश्चर्याने म्हणाला, "एवढंच म्हणजे? अहो, कित्येकांचे दृष्टिकोन, कित्येकांचे प्रतिसाद, कित्येकांच्या प्रतिक्रिया..."
सरांना अंदाज आला की राघवच्या डोक्यात काय येतंय. त्यांनी शांतपणे विचारलं, "कोणी काही वाईट बोललं का?"
राघव उत्तरला, "नाही!"
"मग"
"आपल्या कामाचा कोण कसा विचार करेल, आपल्याबद्दल काय बोलेल कसं सांगावं?" राघव म्हणाला.
"चांगलं पण बोलतील की." सर उत्तरले.
"हं." म्हणत राघव पुन्हा विचारमग्न झाला.
सर समजावू लागले, "दोन जणांचं मत एकसारखं कसं असेल? खरंखुरं मत हां! प्रत्येकाचा मत बनवण्याआधीचा विचार वेगळा. प्रत्येकाची विचारांची बैठक वेगळी, पद्धत वेगळी. प्रत्येकाचे भाव वेगळे नि प्रत्येकाच्या भावना वेगवेगळ्या."
राघव तोडत म्हणाला, "हा मतप्रवाह आपल्या बाबत असेल तर? तर काय करायचं?"
सर म्हणाले, "आपण काय करणार? आपण एकच गोष्ट करायची, आपलं काम करत राहायचं. चांगल्या, वाईट मतांचा स्वीकार करायचा, कामावर एकाग्रता ठेवायची.
समोर येईल त्याला धीरानं आणि शांत चित्तानं सामोरं जाणं आपलं काम!"
"असं करायला जमेल?" राघव मध्येच म्हणाला.
सर म्हणाले, "जमवायचं. कारण कोणी काय विचार करावा यावर आपलं नियंत्रण नाही. कोणी काय मत व्यक्त करायचं हे आपण सांगू शकत नाही. प्रत्येक जण हवं तसं व्यक्त व्हायला free आहे."
"म्हणजे विचार करायचा नाही." राघव विचारत होता.
सर म्हणाले, "अतीविचार मारक!"
राघव होकारार्थी मान डोलवत म्हणाला, "मग नेमकं काय करू?"
सर स्मित करत म्हणाले, "आपण आपल्या कामाशी प्रामाणिक राहायचं. टीका होत राहतील. स्तुती पण होईल. त्याला आपलं काम हेच उत्तर. आपण सगळ्याची तयारी ठेवायची. सगळंच गोड गोड, छान छान होईलच असं नाही. कधी कधी कोणी धारधार शब्द वापरतील, जे आपल्याला लागतील. बोलणारा बोलून जातो, ऐकणाऱ्याच्या मनावर खूप मोठा घाव घालून जातो. पण बोलणाऱ्याच्या ते लक्षात येत नाही. त्यामुळे आपणही ते मनाला फारसं लावून घ्यायचं नाही. नाहीतर रोजचं जगणं मुश्किल होईल."
राघव हसला. सरांना हायसं वाटलं.
Celebration चा आवाज हळूहळू कमी होत गेला. सगळे जण आपल्या कामाला लागले. सरांनी तिकडे वळून पाहिलं आणि म्हणाले, "स्तुती काय, टीका काय... सगळं आजच्या newspaper आणि social media च्या post पुरतं मर्यादित राहतं. ते मनाला लावून घेतलं तर मग खूप काळ टिकतं. आपण आपल्या आयुष्यात स्तुती आणि टीकेचं महत्त्व जिथल्या तिथेच ठेवायचं.
स्तुतीतून प्रेरणा घेत अजून उत्तम काम करायचं. टीकेतून हवं ते वेचत स्वतःला बळकट करायचं."
राघव set कडे वळला आणि म्हणाला, "संपलं celebration."
सर हसत म्हणाले, "Celebration लगेच संपतं. टीका टिकते. दुनियादारी अशीच असते. तू balance ठेव."
राघव अर्थपूर्ण हसला.
- वरुण भागवत

Comments
Post a Comment