![]() |
| A click by : Sushil Ladkat |
अनयला स्वतःचाच कॅमेरा दिसला. त्याकडे बघत तो स्वतःशीच म्हणाला, "काय काय आणि किती किती टिपतो हा. आयुष्याच्या आठवणी सगळ्या एका पेटीत किंवा कुपीत.
छोटी पेटी, आठवणींची कुपी असं म्हटलं की फार काहीतरी interesting असेल असं वाटतं. पेटी असतेच मुळी interesting आठवणींची. त्यामुळे आता आठवण, आठवणीतल्या पेटीतले photos interesting असणारच. कधीतरी उघडायची त्या पेटीतली पानं. आता पेटीला कुठे पान असतं का? पण Photo Album ला असतं की. तसं या आभासी पेटीला पण पान असतंच. १ फोटो, १ पान."
असं म्हणत अनयने आभासी पेटीची अर्थात जुने सगळे photos store केलेल्या phone मधल्या folder ची पानं हळूहळू उलगडायला सुरूवात केली. सुरू झाली digitial आठवणींची सफर.
अनय पुन्हा विचारात गेला. केवढ्या आठवणी, केवढे लोक, कोणी आपले, कोणी नवखे, कोणी ओळखीचे, कोणी अनोळखी... सारं काही यात टिपलं जातं. आपण पाहत राहायचं. आठवत राहायचं. रमत राहायचं. कधी हसायचं, कधी नॉस्टॅल्जिक व्हायचं. कधी कोणीतरी आठवणीतला/ आठवणीतली पुन्हा कधीच न भेटलेली ती व्यक्ती दिसते. हे म्हणत असतानाच एकदम अनयच्या डोळ्यासमोर ती flash झाली. अनयचं भरभर पानं सरकवत जाणं थांबलं. तिच्या आठवणी एकदम डोळ्यासमोरून सरकू लागल्या. इथे अनयच्या मनाचा कॅमेरा फ्लॅशबॅक मध्ये गेला. त्याला जाणवलं हा मनाचा कॅमेरा काय काय टिपतो आणि तयार करतो अगणित आठवणींची पेटी. या पेटीत आपल्याला हवं ते दिसतं. पण तरीही त्या आठवणींवर आपला ताबा नसतो. कोणती आठवण, कोणाची आठवण किती काळ छळेल, कधी आनंद देईल याला काही मर्यादा नसते.
ही आठवण जितका आनंद देते तितकाच छळ मांडते. तशीच अनयची अवस्था झाली होती. त्याला ती दिसली, पण digitally. त्या तशा असण्याला अर्थ होता पण आणि नव्हता पण. तिच्यात आणि त्याच्यात आता खरं काहीच उरलं नव्हतं. पण तरी ती होती, मनाच्या कप्प्यात, कॅमेऱ्याच्या पेटीत बंद.
अनय पुढे सरकला. Move on झाला. तिच्यापासून झाला की नाही हे त्यालाही सांगता येत नव्हतं पण हां, त्या photo पासून move on झाला.
पुन्हा एक photo आला, त्यामध्ये होते त्याचे आई वडील. अनयचे ओघळणारे अश्रू ओघळून आईच्या photo मधल्या पापण्यांवर अलगद विसावले. Screen वरचे अश्रू पुसण्याच्या नादात touch screen असल्याने पुढचा photo open झाला.
आता फोटोत होता निर्झर. खळखळ वाहणारा. अनयचं मन वाहतं झालं. त्याला नवंचैतन्य देऊन गेलं.
एक photo, एक आठवण असं करता करता कितीतरी आठवणींची माळ गुंफली गेली. अनय क्षणभर थांबला. Digital सफरीतून बाहेर पडला. विचारमग्न झाला. स्वतः लाच म्हणाला की या आठवणीत रमता रमता तिथेच नुसतं रमून जायला नको. या आठवणी सुद्धा काय अशाच बनत नाहीत. नवे अनुभव, नवी माणसं, नवी आव्हानं यांना पार करत पुढे जायचं. मग क्षणभर विश्रांती घेत मागे वळून पाहायचं. आठवणींचा सिनेमा डोळ्यासमोरून जातो. यातले काही क्षण त्या कॅमेऱ्यात टिपले जातात. त्यामुळे प्रत्यक्ष अनुभव पुन्हा त्या आठवणींच्या पेटीत डोकावून जगता येतात. हा कॅमेरा हे टिपतो, पण या आठवणीतले बारकावे लक्षात ठेवतो तो मनाचा आणि डोळ्यांचा कॅमेरा.
म्हणूनच या खऱ्या आणि डोळ्यांच्या कॅमेऱ्यात काही ना काही टिपलं पाहिजे. त्यासाठी explore केलं पाहिजे. मग बनतात आठवणी. मग थोडं थांबावं वाटलं की त्या आठवणींचं अंथरूण बनवून निवांत पडायचं. मग पुन्हा पुढे निघायचं.
हा विचार करता करता अनयचं लक्ष कॅमेऱ्याकडे गेलं. तो कॅमेऱ्याकडे पाहू लागला. क्षणभर हसला. कॅमेरा उचलून बाहेर जाऊ लागला. कॅमेरा गळ्यात घालताना कॅमेऱ्याला उद्देशून म्हणाला, "चला, नवीन आठवणी बनवायला जाऊया."
- वरुण भागवत

Comments
Post a Comment