![]() |
| A click by : Varun Bhagwat |
धबाबा कोसळणारा पाऊस.
त्याला काळ्या ढगाने अजूनच लावली फूस.
शांत उभी ठाकलेली वृक्षवल्ली.
पावसात नाचणारी पोरं होती वल्ली.
कसा कोणास ठाऊक, कोकीळ पाऊसगाणं लागला गाऊ,
कोकिळेच्या प्रेमात बुडत तिच्या जवळ लागला जाऊ.
चिमणा चिमणी बसले घरट्यात जसा येऊ लागला पाऊ,
घरट्यामध्ये न रमणारा, उघडा पडला आळशी काऊ.
मन उधाणलं.
इतका पाऊस की मन बघता बघता तिच्यात केव्हाच बुडालं.
ती दूर,
मनी हुरहूर.
पाऊसच जणू जुळवत होता आमचे चिंब सूर.
मनातूनच रेखाटू लागलो तिच्या चेहऱ्यावरचा नूर.
धरती वरुणमय
हवी होती तिची सय
मी निघालो,
पावसात पोहोचलो.
कोसळत होत्या संततधारा
संगे होता सोसाट्याचा वारा.
मन चिंब, चिंब, चिंब
तळ्यातल्या पाण्यात तिचंच प्रतिबिंब.
आठवायचं तरी किती?
आठवणीत रमायचं तरी किती?
चार्लीसारखं पावसात रडून झालं.
थेंबांनी अश्रूंना पुसून टाकलं.
मला वाटलं भेटेल ती
तिला वाटलं भेटेन मी.
पण दोघांना एकाएकी पाऊस भेटला.
प्रेम आणि आठवांचा निरोप देऊन गेला.
ती माझ्यात गुंतलेली,
मी तिच्यात रमलेला.
पावसाची धार ओसरत आलेली,
मी प्रेमात आकंठ बुडालेला.
पावसाचे थेंब झेलत खिडकीपाशी थांबलो.
निसर्गाच्या लयीत फुलून पाण्याचा बुडबुडा बनलो.
बुडबुडाच तो,
फुटायचाच!
पाऊस तो,
थांबायचाच!
ओघ ओसरला,
पाऊस थांबला.
निसर्ग जरा शांत झाला.
प्रेमाचा ओघ वाढतच राहिला.
मी भानावर आलो.
तिला आठवू लागलो.
जरी दोघे होतो एकमेकांपासून दूर,
पाऊसच जुळवत होता आमचे सूर.
पाऊस तिथेही,
पाऊस इथेही.
तोच आम्हाला जोडत होता.
प्रेम मनातून फुलवत होता.
- वरुण भागवत

Comments
Post a Comment