| A click by: Varun Bhagwat |
कातरवेळ. सूर्य उदास आहे असं वाटत होतं. Bike वर जाणारा मी मित्रासोबत होतो. Highway वर चहाची टपरी दिसली. नकळत गाडी बाजूला घेतली. तिथेच एक बाकडं दिसलं. बसलो. २ कटिंग सांगितले. मित्राने सहज गाणं लावलं.
पद्मजा जोगळेकर यांनी गायलेलं आणि यशवंत देव यांनी लिहून संगीत दिलेलं गाणं. शब्द ऐकले.
"तुझ्या एका हाकेसाठी, किती बघावी रे वाट!" या पहिल्याच ओळीने गाण्यात बुडून गेलो. तिथून खूप खूप दूर असणाऱ्या माझ्या तिच्यापर्यंत पोहोचलो. दूर असून खरंतर कसा तिच्यापर्यंत पोहोचलो? हो, शरीराने दूर होती, पण गाणं तिच्या जवळ नेत होतं. खरंतर नाही, बहुधा जवळ आणून तिच्यापासून पुन्हा दूर करत होतं. कारण लगोलग भेट होणं शक्य नव्हतं. वाटलं, माझ्या एका हाकेसाठी वाट पाहतेय का ती??
स्वतःला प्रश्न केला, मी हाक मारत नव्हतो का? जाणवलं की ती किती वाट पाहत असेल. कामानिमित्त कित्येक दिवस तिच्या भेटीविना जातात.
तिची आठवण तर रोज होते. हाक मारायचं राहून जातं. ती वाट पाहत असेल. आलो नाही हे पाहून अश्रू गालावर ओघळू देत असेल. खिडकीतून तिला चंद्र दिसतो, तो निरखत असेल. चंद्र कळा बदलतो. कधी वाढत जातो तर कधी कमी होत जातो. तिच्या मनाची अवस्था अशीच वरखाली होत असेल. ती काही बोलत नसेल. पण एका हाकेची वाट पाहत असेल. असेल नाही, असतेच. एका हाकेसाठी झुरत राहते. खरंच, कित्ती वाट पाहते. कित्ती अबोल प्रेम असतं तिचं. तिचा अट्टहास नाही की मी आवाज दयावा. पण माझा आवाज ऐकायला तिची हरकत सुद्धा नाही. तिला माझी हाक ऐकायला आवडेलच.
पण मी कुठेतरी व्यस्त होऊन जातो.
कधी कामात, तर कधी स्वतःत.
कधी कोणत्या विचारात, तर कधी कोणत्या दुसऱ्याच कृतीत.
कधी कोणाशी बोलण्यात, तर कधी कोणावर चिडण्यात.
या साऱ्यात ती कुठे असते? ती आहेच की म्हणून अनेकदा तिला गृहीत धरलं जातं. ती समजून घेईल. घेतेच हो ती समजून.. पण वाटतं तिलाही, कधी बोलावं, मनातलं सारं सांगावं.
एका हाकेसाठी वाट पाहणं अगदीच साहजिक आहे.
मी ती दिली तर क्षणात तिची कळी खुलणार आहे.
खरंच, प्रेम ही किती सुंदर गोष्ट आहे. प्रेम केलं की ते अजून किती गहिरं आहे हे जाणवत जातं. प्रेमाला बंधन नाही. सीमा नाही. सीमा असती तर इतक्या दूर असणाऱ्या दोघांतील प्रेम संपूनच गेलं असतं. पण ते कधी असं संपत नाही. संपून गेलं ते प्रेम नाही. एक हाकच तर मारायची आहे. आता तर तंत्रज्ञान आहे. एका फोनवर तरी तिला हाक देता येऊच शकते, तिची कळी खरंच एका क्षणात खुलू शकते.
एव्हाना चहा माझ्या हातात आला होता. गरम वाफा निघत होत्या. हाताला किंचीत चटका लागला. पटकन कप बाजूला ठेवला. तो कपही सुचवत होता, चहा पिण्याआधी एक हाक दे. कारण पुन्हा चहा संपेल, निघायची घाई होईल, गाडीवर आवाज नीट येणार नाही, हाक तिच्यापर्यंत पोचणार नाही.
क्षणात फोन लावला. पलीकडून सुखद आवाज आला, "तुझ्याच फोनची वाट पाहत होते."
अस्मादिकांनी प्रश्न केला, "आत्ता?"
ती उत्तरली, "हो रे. अस्वस्थ वाटत होतं. ही कातरवेळ मुळातच आपल्या दोघांना अस्वस्थ करते. अशा वेळी एकमेकांची सोबत ही वेळ पुढे सरकवायला साहाय्य करते. विचार येत होता, की तू आलास तर किती छान होईल. किमान तुझा फोन आला तर किती बरं होईल आणि तुझा फोन आला."
ती बोलत होती. मी ऐकत होतो. फोन ठेवला. चहा थोडा थंड झाला होता. पण त्या थंडाव्यात पण ऊब जाणवली.
विचार आला की मी स्वतःहून तिला अशी अगदी सहज हाक मारणं, हेच तर हवं असतं तिला. खरंतर तितकंच हवं असतं. समोर दोन रस्ते होते. Bike चा ताबा मी घेतला. डावीकडचा रस्ता कामाला जाण्याचा होता. उजवीकडचा रस्ता आधी तिच्याकडे जाऊन मग कामाकडे जाण्याचा होता. अर्थात थोडा वळसा पडणार होता. पण मी तोच रस्ता निवडला. मित्राकडे पाहिलं. तो हसला. समजायचं ते समजला. मला सखीकडे जाणं भाग होतं. कारण आठवण काढणारं माणूस मनापासून साद घालत होतं. एका हाकेसाठी खूप वाट पाहत होतं. एका हाकेसाठी ती इतकी वाट बघत होती. आज काम थोडा वेळ वाट बघूच शकत होतं.
- वरुण भागवत
ReplyDeleteक्या बात खूपच सुंदर आणि सहज व्यक्त केल आहेस अव्यक्त प्रेम
Thank you! 😊
Delete