| A click by: Sushil Ladkat |
काय बदललं? फक्त कॅलेंडर!
रोजचा सूर्य तसाच उगवला आहे.
सुर्यास्तसुद्धा तसाच,
सकाळ तशीच आहे.
काय बदललं? फक्त कॅलेंडर!
गरमागरम चहानेच दिवसाची सुरूवात होत होती,
आजही तशीच होते आहे.
काहींचा आळसाने दिवस सुरू व्हायचा,
काहींचा उत्साहाने.
आजही तेच घडतंय.
मग काय बदललं? केवळ कॅलेंडर!
वर्तमानपत्रात काल बातम्याच आल्या होत्या,
आजही बातम्याच आल्या आहेत.
केवळ वर्तमानपत्रावरील तारीख बदलली, वर्ष बदललं.
काल ३१ तारीख होती, आज १.
दर महिन्यात असतं हे,
मग बदललं काय? फक्त कॅलेंडर!
आजूबाजूला असणारी माणसं तीच आहेत,
रोजची कामं तीच असणार आहेत.
काय बदललं? फक्त कॅलेंडर!
दिवस २४ तासांचाच राहिलाय,
कामाची वेळही तीच राहिलीय.
काय बदललं? फक्त कॅलेंडर!
.
.
कष्ट तितकेच आहेत,
त्यात काही बदल नाही.
रोजची काम तीच आहेत,
रुटीन तसंच आहे.
बदललं काय, केवळ कॅलेंडर!
.
.
सगळं खरंय, पण माणसाला काही ना काही बदल घडलाय किंवा घडेल (चांगला) हे वाटण्याची संधी आहे हे बदलणारं कॅलेंडर!
सूर्य तोच असला तरी उत्साह नवा आहे असं सांगतं हे कॅलेंडर!
कॅलेंडर फक्त बदलत नाही, जुनं जे नको आहे ते विसरुन पुढे जायला शिकवतं.
जे चांगलं घडून गेलं आहे त्याची आठवण आणि जाण ठेवायला लावतं.
माणसं,
ऑफिस,
व्यवसाय,
उद्योग,
उपक्रम,
काम
असं सगळं तेच आहे हे मान्य, पण नवं कॅलेंडर या सगळ्याकडे नव्या दृष्टिकोनातून पाहायला लावेल कदाचित!
हे कॅलेंडर नवी दिशा आणि नवा उत्साह देईल अशी आशा बाळगणारे आपण सामान्य जन. ही आशाच आपल्यातलं बळ टिकवते आणि वाढवते.
कॅलेंडर बदललं, बदलतं. हे होतच राहील.
पण अनेक गोष्टी शिकवतं आणि सुचवतं हे बदलणारं कॅलेंडर. ते कॅलेंडर सुचवत असलेल्या गोष्टी घ्यायच्या की नाही हे आपण ठरवायचं.
.
.
एका वर्षातून दुसऱ्या वर्षात आपण यशस्वीपणे पोहोचलो याची जाणीव करून देतं हे बदललेलं कॅलेंडर.
कधी वाटतं की कुठे काय ग्रेट केलं आपण सरत्या वर्षात? मग मनाला पटवतं हे नवं कॅलेंडर की अरे, तू मागच्या वर्षात सर्वाईव्ह झाला हे ही एक प्रकारचं यशच आहे.
नव्या वर्षाचं नवं स्वरूप बघायला लावतं हे बदललेलं कॅलेंडर.
नवे प्लॅन्स, संकल्प करायला प्रवृत्त करतं हे बदलणारं कॅलेंडर. (अमलात नाही आले तरी किमान डोक्याला चालना तरी द्यायला लावतं.)
नव्याने नवा विचार डोक्यात आणतं हे बदलू पाहणारं कॅलेंडर.
आपल्याला वाटतं आपणही कदाचित बदलू या कॅलेंडरसह, चांगल्या अर्थाने, ठरवलं तर!
.
.
कॅलेंडर बदलतं, एकदम बदलत नाही. त्यासाठी ३६५ दिवस लागतात. तेव्हा कुठे एकाने त्याची प्रगती होते. म्हणजेच तेव्हा कुठे २०२१ साल बदलून २०२२ होतं. हा दिसताना एवढासा बदल खरोखरी अमलात यायला कितीतरी वेळ जावा लागतो. म्हणूनच हे कॅलेंडर संयम शिकवून जातं. हे कॅलेंडर पुढे जाण्याचं बळ देऊन जातं.
हो, बदललं कॅलेंडर, पण फक्त बदललं नाही, पुढे गेलं आणि शिकवून गेलं की मी ही पुढे जाऊ शकतो, कणाकणाने!
- वरुण भागवत
छान विचार !
ReplyDelete