| A click by: Varun Bhagwat |
कुत्र्याचं पिल्लू बागेत बागडत होतं. इलुसं पिल्लू, सगळ्याच नव्या गोष्टींचं त्याला आकर्षण. ह्या जगातली प्रत्येक पहिल्यांदा दिसणारी गोष्ट जाणून घेण्याचा ते प्रयत्न करतंय असं वाटत होतं. त्या पिल्लाला पाहिलं. मित्राकडे बिस्कीट होतं. त्याने पटकन ते बिस्कीट मला देत त्या पिल्लाला खाऊ घालायची खूण केली. कोणालाही पटकन आवडावं इतकं ते गोंडस पिल्लू. मी पटकन त्याला बिस्कीट दिलं.
उजव्या डोळ्याच्या कोपऱ्यातून आधीपासून मला एक मोठा कुत्रा दिसत होता, तो ही रोज तिथेच खेळायचा. त्याचं नाव टॉमी. मी त्या पिल्लाला बिस्कीट दिलेलं त्याने पाहिलं. थोडा वेळ त्याने वाट पाहिली. त्याला देण्याकरता दुसरं बिस्कीट घेण्यासाठी मी वळलो. पण तो अचानक धावत आला. बिस्किटाजवळ असणारं ते पिल्लू दचकून बाजूला झालं. टॉमीने बिस्किटाचा ताबा घेतला.
कसं असतं ना! पिल्लू दुर्बळ आहे म्हणून पटकन त्याचं बिस्कीट उचललं. हे कितपत योग्य? पिल्लू काही प्रतिकार करण्याइतकं मोठंसुद्धा नव्हतं. त्याच्यासवे त्याचे आई बाप पण नव्हते. एकटं पडलं होतं. आशाळभूत नजरेने पाहत होतं, एकदा टॉमीकडे आणि एकदा माझ्याकडे.
टॉमीसाठीच बिस्कीट घ्यायलाच तर चाललो होतो मी, पण त्याला दम नव्हता. त्याचं लक्ष पिल्लाला दिलेल्या बिस्किटावर होतं. पिल्लू विरोध करू शकणार नाही हे तो जाणून होता. पिल्लाचं बिस्कीट उचलून त्याने स्वतःच्या तोंडात टाकलं. तो ते खाऊ लागला. मध्येच त्याचं लक्ष माझ्याकडे जात होतं, मध्येच ते लक्ष त्या पिल्लाकडे जात होतं. आम्ही तिघे एकमेकांकडे पाहत होतो.
काही क्षण गेले. फार फार वेगळंच घडलं. माझे सारे तर्क, माझे सारे अंदाज क्षणात गळून पडले. मी ते दृश्य पाहत राहिलो. टॉमीने बिस्कीट तोंडात टाकलं होतं. तो ते चावत होता. चावून त्याचे बारीक तुकडे करत होता. ते तुकडे तो जमिनीवर टाकत होता. पिल्लाला खुणावत होता, की हे तुकडे केलेत. ते खा.
त्याला कल्पना होती की याचे दात इतके बळकट नाहीत की हे बिस्कीट तोडता येईल. ते पिल्लू बिस्कीट चाटत होतं हे त्याने पाहिलं होतं. ते बिस्कीट त्या पिल्लाकडून तुटणार नाही हेच तो दुरून पाहत होता. कदाचित कृतीतून हे ही शिकवत होता की असं तोडतात बिस्कीट. ते पिल्लू शिकत होतं. त्याला समजलं. ते तुकडे होऊन मऊ झालेलं बिस्कीट शांतपणे चघळत खाऊ लागलं.
आपण किती पटकन जजमेंट लावून मोकळे होतो. एखाद्या व्यक्तीकडून एखादी कृती घडते आणि आपण त्या व्यक्तीबद्दल कयास बांधतो. ठरवून मोकळे होतो आणि मग स्टेटमेंट्स असतात,
"हा माणूस ना, हो, असाच असणार."
"तो माहितीये मला कसा आहे."
"मी बघितलंय, कसा वागतो."
घाई म्हणजे किती घाई! पूर्ण गोष्ट न पाहता, न ऐकता, फक्त त्याच वेळी जे दिसतं, जे समोर असतं त्यावर जजमेंट असतं कोणताही पुढचा मागचा विचार न करता!
अगदी खरं सांगायचं तर ते पिल्लू टॉमीचं कोणीच लागत नव्हतं. नात्या-गोत्यातलं तर नव्हतंच! पण शब्दशः मदतीस धावून जाणं हा टॉमीचा मूळ स्वभाव. रोज पाहण्यात असलेला टॉमी. तो किती प्रेम लावतो हे माहीत असताना सुद्धा त्याच्या एका अचानक झालेल्या वेगळया कृतीने अस्मादिकांनी टॉमीबद्दल मत बनवून आणि बदलून निष्कर्ष काढला.
माझ्या जीन्स पॅन्ट वर हलकेच स्पर्श झाला. ते छोटे पाय त्या पिल्लाचे होते. एका क्षणात त्या पिल्लाने माझ्या विचारांची शृंखला तोडली. त्याचं बिस्कीट खाऊन संपलं होतं. अजून एक बिस्कीट हवं असावं त्याला. मुका जीव. बोलू शकत नव्हता. मी टॉमीकडे पाहिलं. आशाळभूत नजरेने टॉमी पाहत होता. मी खुणेने त्याला बोलावलं. बिस्किटाहून अधिक काहीतरी त्याला हवं होतं. त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. हो, हेच त्याला हवं होतं. टॉमीलाही त्या पिल्लाला लावलं तसं प्रेम हवं होतं.
- वरुण भागवत
Great observation...
ReplyDeleteKhup chan lihile aahes...
वाचताना प्रत्यक्ष समोर प्रसंग घडतो आहे असं वाटलं आणि डोळयात पाणी तरळलं....
👌👌👌🙏😍😍