Skip to main content

सुट्टी

A click by- Varun Bhagwat (pic name- Ray of hope)



निशिकांत सकाळीच थोडासा पडलेला चेहरा घेऊन ऑफिसला निघाला. नीट हाय, हॅलो, बाय, असं काहीच त्याच्या पत्नीशी न करता त्याचा दिवस सुरू झाला. कामावर पोचला, मन लागेना. शरीराने माणूस इप्सित स्थळी पोहोचला तरी मन सैरावैरा फिरत राहतं. तसं ह्याचं मन घरीच राहिलं होतं. ते सगळं बॅड मूड वालं बॅगेज घेऊन तो कामावर आला होता. काम धड होईना, तिची आठवण होऊन उपयोग पण होईना.

त्याने डेस्क वर पाहिलं. कॅलेंडर आणि घड्याळ त्याच्याकडे पाहत होतं. आज महिन्याची १५ तारीख होती. घड्याळात ९.०० वाजले होते.


बॉसला अंदाज आला. अंदाज म्हणजे काय की नेहमीसारखं काही आज दिसत नाही हे केबिन मध्ये बसून ट्रान्सपरंट काचेतून बॉस ऑबजर्व करत होता. कामाचं निमित्त साधत बॉसने निशिकांतला केबिन मध्ये बोलावलं.


"येऊ?" निशिकांतने दरवाजा हलकेच ढकलत विचारलं.

नुसतं फाईल कडे बघत हातानेच "कम इन" असं न म्हणता बॉस छान हसला, म्हणाला, "या, आत या. बसा."

निशिकांत खुर्ची मागे सारत सरांसमोर बसला.

"ऑल वेल?" बॉसचा प्रश्न.

"हां." निशिकांतचं उत्तर.

"वाटत नाही."

"नाही, ठीक आहे."

"चेहऱ्यावर वेगळंच लिहिलंय."

"ते जरा घरी."

"एनीथिंग सिरीयस?"

"नाही."

"मग?"

"थोडं ते.."

"इज इट टू पर्सनल?"

"हिच्यासोबत..."

"नो निड टू एक्सप्लेन."

"हाफ डे घ्या."

"सर!"

"सलग बिना सुट्टीचं दोन ते अडीच आठवडे काम झालंय. कोणाचीही पत्नी रागावेल."

"काम पण महत्त्वाचं होतं."

"हो पण प्रयोरीटीचं काम उरकलं आहे. थोडं रिलॅक्स व्हायला हरकत नाही."

"अहो पण..."

"आपल्याला ना सवय नाही सुट्टीची. आपण बुजता. अकारण सुट्टी कशाला? असे प्रश्न असतातच."

"हां."

"घ्यावी हो सुट्टी. टीव्ही बघत लोळत पडायला घेतलीत तरी काय हरकत आहे?"

"सर..."

"तुम्ही तसं करत नाही. पण हरकत काहीच नाही. वेळेवर काम करता तर वेळेवर सुट्टी पण घेत चला. ऑफिस सोबत घरचे पण असतात. त्यांना वेळ द्यायचा असतो हे बॅक ऑफ द माइंड असावं. त्यांच्यासाठी तर करतो सारं काही आपण! घ्या हाफ डे सुट्टी. आत्ताच निघता का? वहिनींना सरप्राईज मिळेल घरी? काय म्हणता?"

"बॉस च आहात ना तुम्ही?"


यावर बॉस दिलखुलास हसले. निशिकांतला जे घडलं ते स्वप्नवत होतं की खरं यावर विश्वास बसेना.



तो खरोखरच निघाला. घरी पोचला. बेल वाजवली. दरवाजा उघडला गेला. घरची लक्ष्मी लक्ख आवरून दरवाजा समोर उभी ठाकली. चेहऱ्यावर उत्साह तेवढा नव्हता. पण दार उघडताच समोर निशिकांत. आधीच पडलेला चेहरा गंभीर झाला. अवेळी घरी आलेला नवरा, भांडून गेला होता. काही उलटं पालटं केलं का? अपघात तर नाही झाला? काही विसरला का? भांडायला परत आला का? सारे विचार झरकन निघून गेले. "छे माझं आपलं काहीतरीच" असं स्वतःशीच पुटपुटत ती बाजूला झाली. निशिकांतने संधी साधत गृहप्रवेश केला. पटकन दार लावलं. हिला वाटलं काहीतरी खूप मोठा गोंधळ आहे.

"कोणी मागे लागलंय की काय यांच्या? गुन्हा बिन्हा केला की काय? नाही, पापभिरू माणूस हा तर. साधेपणा पाहून तर लग्न केलं. का आला हा आत्ता घरी? विसरलं असणार नक्की काहीतरी." तिचे विचार चालूच होते.

"काही विसरलं?" तिने विचारलंच.

"हो." असं म्हणत त्याने हळूच तिच्या कपाळाला ओठाने स्पर्श "केला.

ती अगदीच गोड लाजत म्हणाली, "हे काय असं?"

"सुट्टी टाकली."

"आणि काम?"

"ते होत राहील."

"असं काय अचानक?"

"असंच. चल."

"कुठे?"

"आवर. चल डेट वर जाऊ."

अतिशय विस्मित होत तिने त्याच्या कपाळावर हात ठेवला.

"अगं काय झालं?"

"नाही, तापातली बडबड नाही ना एकदा तपासून पाहिलं."

"नाही गं बये. चल."

"अचानक हा बदल?"

"बॉसची कृपा."

"अर्थात. सुट्टी तेच देतात."

"नुसती सुट्टी नाही. खूप मस्त बोलले."

"बॉस मस्त बोलतात?"

"हाहा. चल बाकी डेट वर बोलू. आवर मस्तपैकी."


सुंदर अशा डेट नंतर दोघे घरी आले. दुपारी मस्त झोप काढत लोळत पडत खरोखरच निशिकांतने टीव्ही पहिला. संध्याकाळी दोघे मस्त बागेत फिरायला गेले, कैरी घातलेली आंबट गोड भेळ खाल्ली. एकूणच दिवस निवांत पण मजेत गेला.


कथेचा शेवट क्रमांक १ -


दुसऱ्या दिवशी निशिकांत वेळेत कामावर पोहोचला.

त्याला अंदाज आला की बॉसचं नेहमीसारखं काही आज दिसत नाही. फार छान मूड आहे असं वाटत नाही. हे केबिन मध्ये बसलेल्या बॉसला ट्रान्सपरंट काचेतून निशिकांत ऑबजर्व करत होता. कामाचं निमित्त साधत निशिकांत केबिन मध्ये गेला. बॉसने हसून वेलकम केलं, पण आज हसण्याचा अभिनय होता हे निशिकांतला लगेच जाणवलं.


"बोला, काय काम?"

"काम नाही."

"मग?" बॉसने प्रश्नार्थक नजरेने पाहिलं.

"थँक्स."

"कशासाठी?"

"सुट्टीसाठी."

"तुमच्या हक्काची आहे ती सुट्टी." बॉस म्हणाला.

"त्याचीच तुम्ही आठवण करून दिली." निशिकांत शांतपणे उत्तरला.

"अरे नो प्रॉब्लेम."

"सर, तुम्हाला आठवण करून देऊ एक?"

"कोणत्या रिपोर्टची आठवण हो निशिकांत?"

"तुमच्या सुट्टीची आठवण!"

बॉसला कळेना.

निशिकांत बोलू लागला, " साहेब, आमच्या सुट्टीची, आमच्या फॅमिली लाईफची तुम्हाला काळजी. आम्ही पण केली पाहिजे ना तुमची काळजी. घ्या सुट्टी आज. बघतो इथलं आम्ही. आज काहीच लोड नाहीये तसा. तुम्हालाही लहान मुलगी आहे, वयस्कर वडील आहेत."

"अहो नाही हो. होतं मॅनेज."

"तेच सांगतोय. कामं होतात मॅनेज. घ्या सुट्टी."


मनापासून स्मित करत बॉसने फाईल बंद केली. पी.सी. शट डाऊन केला.


निशिकांत विजयी मुद्रेने बाहेर आला नि दुप्पट उत्साहाने कामाला लागला.


कथेचा दुसरा शेवट-


सुंदर अशा डेट नंतर दोघे घरी आले... एकूणच दिवस निवांत पण मजेत गेला.



बॉसने दिलेली सुट्टी, पत्नीसह डेट, निवांत दिवस या मनाच्या प्रवासातून एकदम निशिकांत बाहेर आला. त्याला जाणवलं आपण तिथेच आहोत. तोच दिवस आहे. त्याने डेस्क वर पाहिलं. कॅलेंडर आणि घड्याळ त्याच्याकडे पाहत होतं. आज महिन्याची १५ च तारीख होती.  घड्याळात ९.१० वाजले होते.


१० च मिनिटात पूर्ण एक दिवसाचा ट्रॅव्हल मनातल्या मनात करत तो पुन्हा त्याच जागी होता. शरीराने माणूस इप्सित स्थळी पोहोचला तरी मन सैरावैरा फिरत राहतं हे पुनःश्च एकदा त्याला जाणवलं.


बॉसला अंदाज आला. अंदाज म्हणजे काय की नेहमीसारखं काही आज दिसत नाही हे केबिन मध्ये बसून ट्रान्सपरंट काचेतून बॉस ऑबजर्व करत होता. कामाचं निमित्त साधत बॉसने निशिकांतला केबिन मध्ये बोलावलं.


निशिकांत ला वाटलं आपण जे काही १० मिनिटात मनातल्या मनात पाहिलं ते सत्यात उतरणार. बॉसला माझा मूड कळणार.



निशिकांत आत गेला.

बॉस त्यांच्या टेबलावर असलेल्या फाईल मध्ये लक्ष घालतच बोलले, "अहो, निशिकांत आपण परवापासून एच अँड जे कंपनीच्या रिपोर्ट वर काम करत आहोत. आज डेडलाईन आहे."

"हो सर." असं म्हणत निशिकांत जागीच थांबला.

बॉसला डोळ्याच्या उजव्या कोपऱ्यातून दिसलं की निशिकांत तिथेच आहे. बॉस म्हणाला, "मला दुपारी सबमिट कराल. एनीथिंग एल्स?"

"सुट्टीचं जरा विचारायचं होतं. सद्ध्या सलग काम झालंय तर..."

"आय अंडरस्टँड. हे 'एच अँड जे' चं एकदा उरकलं की आपण सुट्टीचं बघणार आहोत. डोन्ट वरी. आय विल लेट यु नोव. आत्ता थोडा घाईत आहे मी."



निशिकांत शांतपणे जागेवर येऊन बसला.

पत्नीला मेसेज केला, "सॉरी. उगाच भांडलो तुझ्याशी."

रिप्लाय होता, " तुमच्या कामाचा ताण समजू शकते. सुटलात की या. मस्त पालकाची भाजी आणि भाकरी करते."


निशिकांत पुन्हा कामाला लागला.


- वरुण भागवत


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Routine चा आदर!

“कधी कधी वाटतं की खूप लिहावं, पण वेळ होतोच असं नाही.” “वेळ मिळाला की काय करतोस?” “वेळ मिळतो. I mean, कधी वेळ असतो, तर मग लिहायचा mood असतोच असं नाही.” “कधीतरीच काहीतरी करावंसं वाटणं हा मनुष्याचा अगदी सहज स्वभाव आहे. पण तीच गोष्ट रोज ठरवून करणं किंवा ठराविक कालावधीने पुनःपुन्हा करणं हे खरं कसब.”  “तीच गोष्ट repeat करण्यात काय आलंय कसब? रोज करणं हे तर routine झालं. Routine काय अवघड असतं का?” “नाही. Routine हे अवघड नाही तर routine ही गोष्ट खरोखरच boring आहे.” “हं, तेच.” “तेच नाही, फरक आहे.” “म्हणजे?” “Routine अवघड नाही पण boring आहे. पण ते असं आहे म्हणूनच routine हे long term साठी उत्तम result देणारं आहे.”  “कसं?” “कसंय, कित्येक माणसांना results तर हवे असतात आणि त्यातल्या बहुतेकांना results ची प्रचंड घाई असते. मग हवे तसे results मिळत नाहीत, ते खट्टू होतात आणि प्रयत्न म्हणजेच routine सोडून देतात. इथेच सगळी गंमत आहे. फार प्रयत्न न करता results न मिळणं हा प्रयत्नांचा आळस आहे. बघ, MS Dhoni ला कधी interview मध्ये बोलताना पाहिलं असेल तर तो अनेकदा म्हणतो की process वर focus करा. Result ...

अबोल ती... अबोल तो...

  माणसाचं भावविश्व समजून घेण्याचा विचार केला की लक्षात येतं की किती गोष्टी त्यात दडल्या आहेत. कोणीतरी एकटं, त्याहूनही अधिक अचूक सांगायचं तर एकाकी दिसलं की मनी प्रश्न येतो आणि तो विचारावा देखील वाटतो, "काय रे / काय गं? सगळं ठीक ना?" अशीच एक सखी त्याला भेटली. त्याने तिला विचारलं, "ठीक आहेस ना गं?" ती व्यक्ती उत्तरली, "हां... अं... हो..." या उत्तरावरुन त्याला अंदाज आला की काहीतरी बिनसलंय. मग त्याने जाणून घेण्याचा यत्न केला. तेव्हा ती काहीच बोलली नाही. मग तो विषय बाजूला पडला. पण थोड्याच वेळाने ती स्वतःच म्हणाली, "हो, काहीतरी आहे असं, ज्यामुळे मी ठीक नाहीये." त्याने हलकेच विचारलं, "सांगशील?" "नाही नको. उगाच सगळा mood spoil होऊन जाईल. त्यापेक्षा मी लिहिलेल्या कविता ऐकवते. ऐकशील?" "ऐकव." गंमत अशी की तो ही लिहायचा. थोडं तिचं, थोडं त्याचं असं करत दोघे एकमेकांना गूज सांगत होते. दोघे कल्पनेची नाव वल्हवत अज्ञात किनाऱ्यावर जाऊ लागले. काही क्षण शांत गेले. शांतता. न बोलताही बरंच बोलता येईल असा किनारा त्यांना सापडला. तिथे दोघे पोहोच...

चंद्र आणि ते दोघे!

  "आता तर लक्ख उजाडलंय. तरी आज थोडा जास्तच वेळ आहे बघ तो आभाळात." "कोण गं?" "आपला चंद्र!" "असं कसं गं?" "कधी कधी राहतो तो असा जास्त वेळ. निसर्गाचं काय सांगावं?" "किंवा कधी कधी त्याला निघून जावं वाटत नसेल. तिच्यासवे थांबून राहावं असं वाटत असेल!" "ती?" "त्याची सखी!" "चंद्राची सखी?" "हो. नसू शकते?" "असेल." "आहेच. चंद्राला साक्ष ठेवून इतकं काय काय romantic बोललं जातं, लिहिलं जातं. चंद्र नसणार का मग romantic?" "हां." "हां काय? खरंच! मग थांबत असेल तो त्याच्या सखीची वाट पाहत. थांबावं वाटत असेल त्याला. आज तसाच दिवस आहे. म्हणून तो अजूनही आभाळात दिसतोय." "हो ना.. वाटत असेल थांबावं." "रमत असेल तो तिच्या आठवणीत. झुरत असेल भेटीसाठी. आणि खूप दिवसांनी भेट झाली की मग तिच्यासोबत थांबून राहत असेल. नाही का?" "हो रे. यात गंमत आहे खरी. मग ती सोडतच नसेल बघ त्याला." "तिने तरी त्याला का सोडावं? मस्तपैकी घट्ट मिठीत पकडून ...