सूर्यनारायण सारं विश्व प्रकाशमान करत असताना मी काय करत असतो?
त्या भास्कराकडून प्रकाश घेणं ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. अर्थात ती सुद्धा जमावी लागते. अनेक चांगल्या गोष्टी आपल्या आसपास घडत असतात, दिसत असतात. आपल्याला काहीतरी देत असतात, म्हणजेच देण्याचा यत्न करत असतात. घेणं सर्वथा आपल्यावर आहे.
मग विचार आला की खरंच मी त्या गोष्टी घेतो का?
किमान त्या घेण्याची तयारी दर्शवतो का?
त्याच्याही आधी त्या गोष्टी आपण घेतल्या पाहिजेत असं मला वाटतं तरी का?
सकाळ झाली. रोजच होते म्हणा. परंतु ज्या सकाळी मी माझ्या आळसाला लाथाडून जागृतावस्थेत येतो, तेव्हा जाणवतं की सकाळही सुंदरही असू शकते. ती सुंदर सकाळ अनुभवल्यावर मग मला कळतं की आपल्या झोपेहून अधिक सुखावह काहीतरी असतं. काय? तर हा सुंदर प्रकाश. (तसा हा प्रकाश डोक्यात पडायला वेळ लागतो, पण तो पडतो हे महत्त्वाचं.)
विश्व प्रकाशाने उजळत जातं. तो प्रकाश आपल्याला नवा उत्साह देतो. उगवणाऱ्या आदित्याला मी वंदन करत दिवसाची सुरूवात करतो. हा उत्साह मला स्वस्थ बसू देत नाही. मी नव्या दिवसाचा वेग पकडत व्यायामाचं निमित्त करत धावत सुटतो. धावून थोडं थकतो. पण हा दिनकर, त्याचा प्रकाश मला खुणावत असतो.
नकळत हा दिनमणी (सूर्य) विचारत असतो, "इतक्यात थकलास? पूर्ण दिवस तुझ्या हाती आहे. खूप काही अनुभवायचं आहे, उत्तम जगायचं आहे. चल, चल, माझ्यासवे चल. धावला नाहीस, तरी किमान चालत राहा. हा प्रकाश घेत राहा."
मी क्षणभर विसावलो. धावून चेहऱ्यावर घामाचे थेंब जमा झाले होते. पण हलकेच येणारी वाऱ्याची झुळूक सुखावत होती. कोवळं ऊन हवंहवंसं वाटत होतं. प्रकाश पसरत होता, चेहऱ्यावर. नकळत डोळे हळूच मिटले गेले.
चक्षू अलगद मिटताच मनाच्या आतपर्यंत प्रकाश पसरू लागला. माझे गुरूजी एकदा शिकवत होते की दिव्याची ज्योत जशी सृष्टीला प्रकाश देते तशी अंतर्मनाची ज्योत तेवत ठेवता यायला हवी. तो प्रकाश आपल्यालाही दिसावा नि शक्य तेवढा तो इतरांच्या सुद्धा उपयोगी यावा. ते सोपं नाही. पण अशक्य सुद्धा नाही.
आभाळभर पसरलेला भास्कर स्वयंप्रकाशी तर आहेच आणि अवघ्या विश्वाला उजळून टाकण्याची क्षमता त्याच्यात आहे. दिवसाची मर्यादा त्यालाही आहे. रात्री सूर्यप्रकाश मिळत नाही. पण मर्यादा आहेत म्हणून तो आदित्यनारायण खट्टू होत नाही. कारण त्याला त्याचं ध्येय ठाऊक आहे. हे ध्येय त्याला रोज नवी ऊर्जा देतं. म्हणूनच तर तो दुसऱ्या दिवशी पुन्हा सारी दुनिया प्रकाशाने व्यापून टाकतो.
आपणही आपल्या मर्यादा सांभाळत, जमेल तशी त्यावर मात करत आयुष्य उजळून टाकू शकतो. आपलं स्वतःचं आणि जसं जमेल तसं आपल्या सवंगड्यांचं.
आपण स्वयंप्रकाशी तारा असतोच. पण स्वतःत डोकावून पाहत नाही. आपणच आपली प्रेरणा होत नाही. स्वतःच स्वतःची ऊर्जा होणं अवघड असतं, पण प्रयत्नांनी जमतं.
गरज असते ती आळस झटकण्याची. तो झटकला की मग तो प्रकाश झोपेहूनही सुखावह वाटू लागतो. पण तो झटकण्यासाठी पण प्रेरणा लागते, ती प्रेरणा म्हणजे ध्येय.
एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी ती आधी मला प्राप्त करायची आहे हे स्वतःला समजावलं आणि ती का प्राप्त करायची आहे हे एकदा स्वच्छ आणि स्पष्ट केलं की मग आळसाला वेळ आणि जागाच राहत नाही.
मन प्रकाशित झालं की सारं काही पारदर्शक होऊन जातं. सगळं दृश्य लक्ख दिसू लागतं. सृष्टीतलं नि मनातलंही.
मग थोडा प्रकाश माझ्या डोक्यात उजेड पाडू लागला.
तो सांगू लागला, "जे करशील ते स्वच्छ नि लक्ख कर."
असा प्रसन्न विचार येताच नेत्र अलगद उघडले गेले.
आभाळमाया करणारा रविराज (सूर्य) मला प्रेरणा देत होता, मनाची ज्योत तेवत ठेव असं सांगत होता.
- वरुण भागवत

😊👍
ReplyDelete😊😊
Delete👌👍😊
Deleteखरचं सुर्याचा प्रकाश आपल्याला खुप काही सांगण्याचा व बोलण्याचा प्रयत्न करत असतो. पण त्याच्या मनातलं ऐकण्यासाठी आपलं मन मात्र स्थिर व निर्मळ असावं लागतं.
ReplyDeleteहो. अगदी खरंय.
Deleteखूप छान...!तुम्ही सांगितलं कि सगळं सोपं होऊन जाते समजायला...👌🏻👌🏻👌🏻
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद!!! 😊😊
Delete