किती सांगायचं, किती बोलायचं, किती काय काय करायचं राहूनच गेलं.
आपण एकमकांसोबत नव्हतो की सोबत असून सोबत मिळत नव्हती आपली एकमेकांना?
खरंतर दोन्ही होतं, पण फार काळ नव्हतं.
अगदी थोडा अवधी आपण सोबत होतो.
पण जितका काळ सोबत होतो त्या काळात खूप छान सोबत केली आपण एकमेकांची!
एकमेकांना वेळ दिला, एकमेकांची काळजी घेतली.
तुझं दुःख माझं मानलं, माझ्या आनंदात तू तुझा आनंद शोधलास.
माझ्या हास्यात हसू शोधलंस.
तुझ्या रडण्यात मी माझे हरवून गेलेले, कोरडे होऊन गेलेले अश्रू शोधले.
माझ्या विनोदांमध्ये पोट दुखेपर्यंत हसलीस. हसता हसता पटकन रडून मोकळी झालीस.
सहज मोकळं होणं, मनातलं बोलून टाकणं तुझ्याकडून तर शिकलो.
किती काळ स्वतःतच हरवलेल्या तुला त्यातून बाहेर काढणं मात्र मलाच जमलं.
तुला चित्र काढताना पाहून वाटलं, ही कला काही आपल्याला जमली नाही गड्या! पण म्हणूनच तुला या कलेत बुडालेलं पाहून मला तुझ्यात रमायला जमलं.
आपल्या एकत्र असण्यात जान होती.
निखळ मैत्रीची गायलेली सुंदर तान होती.
पण हे सारं फार लवकर संपलं.
खूप काही करायचं राहून गेलं.
खरंतर एकत्र असल्यावर जगाची फिकीर नव्हती.
कोणी आपल्या मध्ये येण्याची आवश्यकता नव्हती.
पण नियती मध्ये आली. तिचं नियोजन वेगळं होतं.
तुला मला एकमेकांपासून दूर करण्यात तिला मजा वाटत होती.
खूप काही बाकी ठेवून आपल्या मैत्रीला ती अर्धविराम देत होती.
मुद्दाम अर्धविराम म्हटलं. कारण माणसाने आशावादी असावं. सहज सोडून देणं सोपं असतं, पण त्यात काय मजा! सहज सोडून द्यायच्या असतात त्या गोष्टी, माणसं नाही.
भेटलो नाही तरी मनात आपली मैत्री राहिलंच. पण तरी तू अन् मी भेटूच अशी आशा आणि खात्री आहे. कारण ही दुनिया गोल आहे नि खूप छोटी आहे;
;
वरची ही गोष्ट अशा सर्वांसाठी, ज्यांच्या आयुष्यात किमान अशी एक किंवा त्याहून अधिक व्यक्ती आल्या ज्यांच्याशी त्यांची निखळ, निरागस, निष्पाप नात्याची नाळ अगदी सहज जोडली गेली. नियतीने त्या नात्याला अर्धविराम दिला. पण ही नाती जपण्याचा आपण नेहमी प्रयत्न केला. कधी प्रत्यक्षपणे, कधी अप्रत्यक्षपणे!
ही नाती आपण मनाच्या एका नाजूक कप्प्यात अजूनही जपत असतो.
कधी कोणी दिलेल्या पुस्तकाच्या रुपात;
तर कोणी दिलेल्या अत्तराच्या दरवळात;
कोणी दिलेल्या स्वेटरच्या उबेत;
तर कोणी दिलेल्या पुनःश्च भेटीच्या आश्वासनात;
कोणी दिलेल्या हळुवार खांद्यावर;
कोणी मारलेल्या कडकडून मिठीत;
कोणी दिलेल्या प्रेरणेत;
कोणी बदललेल्या विचारांत;
कोणी साकारलेल्या चित्रात;
कोणी लिहिलेल्या कवितेत;
कोणी सांगितलेल्या गोष्टीत;
कोणी लपवलेल्या डायरीत;
कधी जुन्या गाण्यात;
कधी रस्त्यात दिसलेल्या माणसात;
कधी तप्त भास्कराच्या तापात;
कधी बरसणाऱ्या हलक्या पावसात;
कधी भल्या पहाटे;
तर कधी कातरवेळी
ही नाजूक कप्प्यातली नाती डोकावतात.
कधी सुखावतात, कधी डोळ्यात हलके अश्रू आणतात.
पण काही असो, ही नाती कमाल असतात;
पूर्णविराम देणं बरं नाही या नात्यांना; नाहीतर उगाच नाती संपली की काय असं वाटतं; अर्धविराम देणंच बरंय; कारण अर्धविरामात आशा टिकून आहे;
- वरुण भागवत

😍
ReplyDelete🙏
Deleteअगदी खरं;
ReplyDeleteखूपच छान 👌👌
ReplyDelete👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
ReplyDeleteकमाल 😍
ReplyDeleteKhup chhan
ReplyDelete