शब्द बोलला. बोलून गेला.
मग जाणवलं, चुकला.
का बोलला? उगाच बोलला.
खरंतर बोलण्यासाठीच असतात शब्द. पण शब्द चुकले तर मनं दुखावण्याचं काम करतात. माणूस कोणाला तरी वाट्टेल ते बोलून जातो. नंतर पश्चात्ताप करायची वेळ येते.
शब्द शस्त्र आहे. त्यांना धार असते.
कधी कधी ठरवून वार होतो,
कधी चुकून वार होतो.
कधी कठोर शब्द वापरावे लागतात.
कधी नकळत वापरले जातात.
याच्याच जोडीला चांगले शब्दही आहेत, जे मनांना जोडतात. अगदी सहज एकत्र आणतात.
शब्दांची गुंफण करून प्रेम दर्शवता येतं.
हेच शब्द एकत्र करून राग व्यक्त होतो.
शब्द नकळत घाव घालतात.
हेच शब्द घाव भरून काढतात.
शब्द ओले, शब्द कोरडे.
शब्द शहाणे, शब्द वेडे.
शब्द जोडले तर वाक्य.
वाक्य जोडत अर्थपूर्ण संवाद.
संवाद एकतर बरा किंवा वाईट.
संवाद माणसाला जोडतो, अथवा तोडतो.
शब्दाची ताकद मोठी असते.
ती ताकद एखादी गोष्ट घडवत किंवा बिघडवत असते.
शब्दांना बांध घालून अडवायचं काम खरंतर शब्दच करू शकतात.
अमितच्या बाबतीत असंच घडलं जेव्हा तो अशांत आणि अस्वस्थ झाला होता. त्याच्या तोंडून चुकून त्याच्याच मित्राविषयी चुकीचे शब्द निघाले. अमित त्याला खूप बोलला. त्यातले बरेच शब्द मित्राला दुखावणारे होते. त्यावेळी अमितला ते जाणवलं नाही. तावातावात तो बोलून गेला. मित्राला अकारण बरंच सुनावून गेला.
सगळं घडून गेलं,
बोलायचं ते बोलून झालं,
चुकायचं ते चुकून झालं,
रात्री जरा मन ताळ्यावर आलं.
तेव्हा अमित शांत झाला होता. पण मित्र मात्र दुखावला गेला होता . हे त्याला आत्ता जाणवत होतं. अमित पुन्हा अशांत,अस्वस्थ झाला. पण या वेळी कारण वेगळं होतं. मित्राला बोलायचं म्हणून नाही, मित्राला वाईट बोललो हे आठवून हा अस्वस्थपणा आला.
बोललोच नसतो तर बरं झालं असतं. जिभेवर ताबा नाही. का बोललो? मात्र या जर तरच्या गोष्टीला आता अर्थ नव्हता.
मित्राला फोन करावा की मेसेज करावा या विचारात अमित होता. अचानक त्याच्या डोक्यात काय आलं कोणास ठाऊक... तो गाडी घेऊन निघाला. थेट मित्राच्या घरी जाऊन पोचला.
बेल वाजली. मित्रानेच दार उघडलं. इतक्या वेळ शब्दामुळे घडलेल्या चकमकीत आता शब्द नव्हते. मित्र काही बोलत नव्हता. हेच अमितला जास्त त्रासदायक वाटत होतं. अमित देखील त्या क्षणी काही बोलला नाही. मात्र त्याने मित्राला कडकडून मिठी मारली. मिठीत केवळ एक शब्द उच्चारला, "सॉरी." तो ही मनापासून...
मनापासून उच्चारला असं मुद्दाम नमूद करावं लागलं कारण 'सॉरी' हा शब्द देखील अनेकदा माणसं उपकार केल्यासारखा वापरतात.
त्या मिठीत, त्या सॉरी मध्ये नातं टिकवून ठेवण्याची क्षमता होती. इथे जाणवलं, शब्दाची गंमत आहे. तो केवळ काय बोलला हे महत्त्वाचं नाही. कसा बोलला हे ही महत्त्वाचं. शब्द केवळ वापरायचा नाही, प्रामाणिकपणे, खरा खरा न्याय देत उपयोगात आणायचा. शब्द जगायचा!
- वरुण भागवत

Kiti chan lihitos Varun... Khupach bhari aa..... Khup khup shubheccha asach shabdha lihit raha .... 😍😍👌👍
ReplyDelete