"कोरा कागद घेऊन बसलो आणि ठरवलं की आता काहीतरी लिहावं."
"मग?"
"सुचत नाहीये."
"असं का?"
"माहीत नाही. खरंतर सगळ्या गोष्टी जागेवर आहेत. पेन, पेपर, टेबल, शांत जागा."
"इतकं पुरतं की अजून काही लागतं?"
"लागतं."
"काय?"
"लिहिण्याची भूक आणि कागदावर काहीतरी छान उमटवण्याची मनापासून इच्छा!"
"मग ती नाहीये का तुझी?"
"ती पण आहे?"
"मग आज कागदावर काही उमटत नाही असं सुरुवातीलाच का म्हणालास?"
"कारण खरंच उमटत नाहीये."
"म्हणजे भूक आणि इच्छा कमी पडली का?"
"काहीतरी पडतं कमी. पण ते कमी पडतं हे पण मान्य करता यायला हवं"
"म्हणजे?"
"म्हणजे भूक आणि इच्छा याही पलीकडे मला आज लिहिता येत नाहीये, सुचत नाहीये हे मी सांगतोय."
"तुला येत नाहीये हे कशाला सांगतोय?"
"म्हणजे?"
"तू ते लपवू शकतो. लिहायला वेळ नाही असं सांगू शकतोस
येत नाही, सुचत नाही हे सांगायचं कशाला?"
"वेळ आहे, जागा आहे. पण आत्ता सुचत नाही. मला वाटलं ते सांगायला हवं, न लाजता. तेच मी केलं. म्हणून म्हणालो की कागदावर काही उमटत नाहीये."
"चांगलंय."
"काय?"
"मी म्हणलं चांगलंय."
"आं?"
"येत नाहीये लिहायला असं म्हणालास हे चांगलं आहे."
"कसं?"
"अरे हे मान्य करणं चांगलं आहे."
"म्हणजे?"
"अरे आज तुला लिहायला जमत नाही हे सांगता सांगता तू काय केलंस कळलं का तुला?"
"काय?"
"तुला लिहिता येत नाहीये हाच विषय पकडून तू अनेक शब्द गुंफत हा संवाद तयार केलास."
"अरे, हे तर लक्षातच आलं नाही."
"आणि मी अर्थात तुझी ही डायरी तुझं ऐकते म्हणून तिच्यावर तो उतरवून पण काढलास."
"नकळत."
"हो, पण नकळत केलेली ही गोष्ट ४ जणांना कदाचित प्रेरणा देईल."
"कशी?"
"एखादी गोष्ट उत्तम करण्यासाठी basic तयारी आणि ते करावं वाटणं महत्त्वाचं असतं. पण त्याहीपलीकडे जाऊन तू स्वीकार सांगितलास. आपण परिपूर्ण कधीच नसतो याचा स्वीकार. अर्थात आपल्यापाशी लिहिण्याची भूक आणि इच्छा असूनही कधी सुचत नाही, जमत नाही, येत नाही हे बिनधास्तपणे मान्य करणं. केवळ तुझं लिखाण असं नाही. कोणतीही गोष्ट, जी नेहमीची आहे, एखादा त्यात कदाचित तज्ञ असतो. पण कधीतरी ती गोष्ट फार उत्तम किंवा बिलकुल जमत नाही हे सांगणं हा झाला स्वीकार."
"एका बाजूने पाहिलं तर हा पराभव आहे की जमत नाही."
"पण त्याकडे तसं न पाहता अगदी सहज सांगणं की हो, येत नाहीये आत्ता. It's completely okay and should be acceptable.
"हां."
"असं केलं म्हणजे प्रयत्न सोडले असं नसतं. आत्ता या क्षणी जमत नाहीये हे मान्य करायला पण धैर्य लागतं."
"बाप रे. छोटीशी गोष्ट मान्य करणं याबद्दल बरंच काही सांगितलंस तू. मला वाटायचं मान्य करणं, स्वीकार फार सोपा आहे."
"हो स्वीकार सोपाच आहे पण सगळे मान्य नाही करत!"
- वरुण भागवत

Very nice Varun Da..||☺️||
ReplyDeleteThank you!!
ReplyDeleteअगदी खरे आहे
ReplyDeleteपण स्विकार करणाऱ्याला सुद्धा समोरच्या व्यक्तीने स्विकारले पाहीजे.......
मनातली गोष्ट वाचल्यासारखी वाटली. खूप छान लिहिले आहे तुम्ही..
ReplyDelete