![]() |
| A click by - Varun Bhagwat |
आई वडिलांनी काय विचार करून नाव ठेवलेलं असतं कोणास ठाऊक? पण ते नाव सार्थकी लागावं असं त्यांना वाटत असतं. गणेश चतुर्थीला लंबोदरचा जन्म झाला त्यामुळे हे नाव ठेवलं आणि पटठ्याने त्याच्या गणेशभक्ती मुळे नि लंब उदरामुळे (पोटामुळे) ते नाव सार्थही केलं.
लंबोदर च्या घरी गणपती छोटीशीच भेट द्यायचा.
मोजून दीड दिवस मुक्काम!
लोकांचे गणपती settle होइपर्यंत यांच्या जाण्याची वेळ यायची.
दीड दिवसात खूप लगबग असायची. लंबोदर च्या आईच्या उत्साहाला तर काय उधाण यायचं! प्रसाद म्हणजे विचारायला नको. हाताला इतकी मस्त चव की लहानपणी लंबोदर ला वाटायचं गणपती दीड दिवसाची प्रथा मोडून खास आईच्या मोदकासाठी मुक्काम वाढवेल की काय! कारण मोदक म्हणजे लंबोदर चा जीव की प्राण. पण वर्षातून एकदाच मोदक व्हायचे आणि या गणपती सोबत लंबोदर ला मोदकांना सुद्धा पुढच्या वर्षी लवकर या म्हणावं लागायचं.
या दीड दिवसात लंबोदर आपल्या आईला मनापासून मदत करायचा. सगळ्या छोट्या छोट्या कामात याचा हातभार लागायचा आणि याचा खारीचा वाटा सिंहाच्या पिल्लाइतका नक्की मोठा व्हायचा. याला "बहीण" नाही त्यामुळे पाहुण्या रावळ्यांना पाणी, फराळ आणि मोदक देण्याचं काम याच्याकडेच असायचं. मधेच वैतागायचा. पण त्याच्या लाडक्या बाप्पासाठी आणि आईसाठी करायचा.
गणपतीला आणण्यापासून निरोपाची आरती या वर्षीही लंबोदरनेच केली. सण म्हणजे माणसंच माणसं, कामंच कामं.
हा हा म्हणता दीड दिवस सरला. यात त्याला बाप्पा घरी असून त्यांच्याशी संवादच नाही साधता आला.
लंबोदर च्या आईने उत्साहाने विसर्जनाचा प्रसाद तयार केला.
आजीबाईंच्या अनुभवी सूचना चालू होत्या.
आजोबा "तुका म्हणे उभे राहावे, जे जे होईल ते ते पाहावे" या उक्तीनुसार सगळं पाहत होते. फक्त ते उभे नव्हते. वयानुसार वाकले होते आणि शांत बसले होते.
लंबोदर चे बाबा पूजेच्या तयारीला लागले.
लंबोदर ने स्वच्छ पितांबर नेसलं.
या चतुर्थीला लंबोदर २२ वर्षांचा झाला होता.
आता त्याला "हे असं का आणि तसं का" असे फार प्रश्न पडत होते.
पानांचं देठ देवाकडे की आपल्याकडे?
देवाला दाखवताना जो "नैवेद्य"असतो तो देवाला दाखवल्यावर त्याचा "प्रसाद" का होतो?
काही वाहायचं राहून गेलं तर अक्षता वाहा असं असेल तर याच्या मते अक्षता वाहूनच पूर्ण पूजा करा.
या आणि अशा अनेक प्रश्नांची शास्त्रीय उत्तरं लंबोदर ला सहज मिळाली नाहीत. पण गणपती वर मात्र याची मनापासून श्रद्धा होती. म्हणून तो हे सगळं चालवून घ्यायचा. याची श्रध्दा म्हणजे घाबरून केलेली भक्ती नव्हती. गणपती समोर बसलं (ध्यान लावलं) की आपोआप मन शांत होतं अशी त्याची पक्की समजूत होती. पण इथे कुठली शांतता. कारण गणेशोत्सव हा "सार्वजनिक" असतो.
गणपतीशी बोलणं वगैरे म्हणजे joke च!
पाहुणे रावळे जमले.
आरतीची तयारी झाली.
आरती म्हणजे एक मजेशीर प्रकार असतो.
लंबोदर ने गडबडीत कापराच्या २-४ वड्या एकदमच टाकल्या. हात पोळल्यासारखा झाला. पण सगळ्यांसमोर तो हे दाखवू शकला नाही.
लंबोदर चा हात कायम आरतीच्या तबकाने अवघडून यायचा. मनातल्या मनात तो म्हटला, १ च आरती म्हणावी ना.. आता गणपती आहेत तर त्यात बाकी आरत्या कशाला? हे म्हणजे वर्षभरात सगळ्यांचे birthdays एकत्र celebrate करण्यासारखं आहे. कोणीच नाराज व्हायला नको म्हणून! पण यामध्ये त्या दिवशी ज्याचा birthday असतो तो नाराज होतो त्याचं काय! त्याला उगाच share करायला लावायचं.
या विचारात असताना कापूर संपला.
"वेंधळाच आहे बाई" असं म्हणत आईने पटकन एक वडी पेटवली. समोर जाळ आल्यावर लंबोदर भानावर आला.
या धुपादिपाने सगळ्यांनाच गरम होत होतं. पंखा लावता येत नव्हता. आता आरती संपणार तेवढ्यात कोणीतरी आजच्या अभ्यासक्रमा मध्ये बिलकूलच न बसणारी आरती सुरू केली.
ती आरती फक्त त्यांनाच पाठ होती. हा अभिनिवेश त्यांच्या चेहऱ्यावर दिसला. बाकी सगळे मग फक्त "जयदेव जयदेव" म्हणत होते. राहिलेला वेळ शांतता. फक्त यांचा आवाज. Finally ती out of syllabus आरती संपली आणि आता घालीन लोटांगण म्हणणार तोच गुरुवार मुळे कोणाला तरी दत्त आठवला. आता लंबोदर चे हात इतके भरून आले की बाकी कुठे लक्ष लागेना आणि त्या नादात तो "जयदेव जयदेव जय श्री गुरुदत्ता ऐवजी "जय पांडुरंगा" म्हणाला आणि सर्वांच्या लक्षात येईल इतकं जोरात म्हणाला.
काय करावं बाई ह्याचं असं म्हणत आई पुन्हा पुटपुटली.
बाकी मित्र परिवाराला हास्यफवारे उडवायला तेवढीच संधी मिळाली.
मजल दरमजल करत साधारण १ तासाने आरती संपली.
घालीन लोटांगण सुरू झालं आणि सगळ्यांची आरती घ्यायची वेळ झाली. तेवढ्यात लंबोदर च्या हातावर माशी बसली. वेंधळेपणा नडला आणि गडबडीत त्याने फुंकर मारली. तर आरतीचा दिवा च विझला. आजी ने डोक्यावर हात मारून घेतला. कापराच्या वड्यांनी त्याला वाचवलं. त्यावर सर्वांनी आरती घेतली.
Finally, आरती संपली.
इतका हात दुखून आला होता तरी विसर्जनासाठी गणपती लंबोदर ने च घेतला. कारण गणपती त्याचा होता. त्याचा लाडका बाप्पा होता.
लहानपणी तर "बाप्पाला जाऊच देणार नाही" असं म्हणत विसर्जन करायला निघालेला हा परत आला. तेव्हा आईने मोठ्या कष्टाने त्याला समजावलं होतं. गणपती ला आई बाबांशिवाय (शंकर पार्वती शिवाय) करमत नाही असं सांगत विसर्जन करायला पाठवलं.
वाजत गाजत पाहुण्या रावळ्यांसह स्वारी नदीवर निघाली.
आरोळ्या ठोकत सगळे नदीवर पोचले.
"गणपती बाप्पा मोरया" असं तीन वेळा म्हणून गणपती विसर्जित झाला.
सगळी गर्दी घरी परतली.
लंबोदर थोडा रेंगाळला. आपल्या गावी परत जाणाऱ्या बाप्पा कडे तो बघत राहिला.
बाप्पा जाताना लंबोदर चा तिसऱ्या "गणपती बाप्पा मोरया" चा स्वर थोडा थरथरला.
बाप्पाचं सगळं करण्यात बाप्पाला वेळच द्यायचा राहून गेला. आत्ता कुठे लंबोदरचा बाप्पाशी अबोल संवाद सुरू झाला.
अगदी दिसेनाशी होईपर्यंत ती मूर्ती तो पाहत राहिला. डोळ्यात साठवत राहिला. नंतर मूर्ती आणि पुढचं चित्र दिसेनासं झालं कारण नदीचा काठ गर्दीने आणि लंबोदरच्या डोळ्याचा काठ पाण्याने भरला.
-वरुण भागवत

मस्तच
ReplyDeleteधन्यवाद!
DeleteKhup mastch..
ReplyDelete🙋🌺🌺🌹🌹🙏🙏