![]() |
| A click by: Varun Bhagwat |
ऑफिस मधून घरी पोहोचलो. फ्रेश झालो. चहा घेतला. तेवढ्यात बेल वाजली. दार उघडलं. समोर माने काका उभे. माने म्हणजे आमचे केबल वाले काका. नेहमीप्रमाणे टिव्हीचा रिचार्ज मारायला आले होते. बरं, आले ते वैतागतच! त्यांना बसा म्हटलं.
“बसतो कसला? या ३००० रुपयाचं काय करू?"
"मी समजलो नाही." असं म्हणत मी त्यांना पाणी दिलं.
"अहो, सकाळी निघताना खिशात ११० रुपये होते मोजून!! आता ३००० कसे होतील??"
" तुम्ही केबल ची बिलं गोळा करत आलात त्याचे पैसे असतील."
"सगळे त्याचेच पैसे आहेत. पण हिशोबाने हे ३००० एक्स्ट्रा आहेत."
"ऑनलाईन नोंद होते ना बिलाची. ते चेक केलं का?"
"विचारलं अहो मी हेड ऑफिसात."
"मग?"
"३००० जास्त च आहेत."
"अहो, जास्त आहेत, कमी नाहीत ना.. तेवढं तरी बरं आहे ना?"
"अहो असं कसं? ज्याचे असतील त्याला गरजेचे असतील हो हे पैसे!"
"मान्य आहे मला. पण तुम्ही काय कोणाचे पैसे असे उचलणारे आहात का?"
"नाही हो."
"मग असू द्या ना. रात्री बिछान्यावर पडलात की आठवेल."
आत्ता कुठे माने काकांना थोडा दिलासा मिळाला आणि त्यांनी पाण्याचा पेला पिऊन संपवला.
“मी निघतो." माने काका जाऊ लागले.
आत्तापर्यंत आईला आत स्वयंपाक घरात सगळ्या गप्पा ऐकू आल्या होत्या.
ते जायला लागताच ती म्हणाली, "चहा घेऊन जा."
चहा म्हणल्यावर काका थोडे थबकले. गवतीचहाचा सुगंध पसरला होता.
काका म्हणाले, "असं म्हणताय.... द्या घोटभर."
अस्मादिकांनी त्यांना चहा दिला.
केबल चे पैसे मी कांकांना दिले. नेमके वरचे २ रुपये सुट्टे नव्हते. ते म्हणाले, "असू द्या. पुढच्या वेळी द्या."
"थांबा ५ आहेत. घ्या."
"आज पैसे (जास्तीचे) मिळण्याचा दिवस दिसतोय. अवघड आहे माझं. काय झालंय माझ्या स्मरणशक्तीला."
काकांनी असं म्हणत "फुर्रर्रर्रर्र" करत चहाचा शेवटचा घोट घेतला. ते निघणार तोच त्यांचा फोन वाजला. मेसेज होता. काका जवळजवळ ओरडलेच, "हिशोब लागला."
"छान!"
"त्या सर्व्हर प्रॉब्लेम मुळे हे घडलं."
.
.
नशीब ....
आज माणुसकी नव्याने दिसली. दिवसभर कष्ट करून सुद्धा मिळतायत म्हणून जास्तीचे पैसे काकांना नको होते. जास्तीचे पैसे आपले नाहीत त्यामुळे त्याचा हिशोब लागल्यावर काका जवळजवळ लॉटरी लागल्याच्या आनंदात होते आणि काम करून दमल्यावर जरा विसावा म्हणून बाबांनी आई साठी केलेला चहा, क्षणाचाही विलंब न करता आईने काकांना प्यायला दिला.
क्षणिक आनंद त्यांच्या हिशोबात बसणारा नव्हता.
शाश्वत आनंद शोधणारी, देऊन सुखी झालेली ही दोन पापभिरू माणसं पुन्हा आपल्या कामाला लागली.
दुरून सगळं पाहणाऱ्या बाबांनी पुन्हा आधण ठेवलं, आईच्या राहिलेल्या घोटभर चहासाठी!!
- वरुण भागवत

Khup masta Varun
ReplyDeleteDhanyawad!!
DeleteMastach
ReplyDeleteThank you!!
ReplyDelete