| A click by: Varun Bhagwat |
"आठवणी."
"त्यांचं काय?"
"या आठवणी आठवण्याची आणि साठवण्याची सवय लावून घेऊ नये."
"का लावून घेऊ नये?"
"त्रास देतात या आठवणी."
"अगं, याच आठवणी जगवतात.
याच आठवणी जगण्यात मजा आणतात.
याच आठवणी नव्या आठवणी तयार करण्याची प्रेरणा असतात.
आठवणीच तर असतात ज्या हलकेच सारं आठवून हसवतात."
"हो रे. खास व्यक्तींच्या बाबतीत तर हे घडतंच. काही व्यक्ती येतात आपल्या आयुष्यात. आपलं आयुष्य सुंदर आहे हे दाखवून देतात. त्या माणसांची सोबत हवीहवीशी वाटते. मग एक दिवस ती माणसं आपल्याला सोडून जातात. भांडून नाही. त्यांचा आपल्यासवे असणारा कार्यभाग संपतो इतकंच. ते पुढच्या प्रवासाला निघतात. त्यांचं काय करायचं? त्यांनाही जायचं नसतं. आपल्यालाही त्यांना सोडायचं नसतं. पण परिस्थितीच यांना एकमेकांपासून दूर लोटते."
"हो, पण परिस्थितीनेच तर त्यांना एकत्र आणलेलं असतं. वेगळं करणारी पण ती परिस्थितीच. जरी वेगळं केलं तरी त्या भेटीच्या काळात आपलं आयुष्य काही प्रमाणात समृद्ध होतं. या व्यक्ती शरीराने नेहमी सोबत नसल्या तरी आठवणींच्या रूपात आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनून जातात. या व्यक्ती नि त्यांच्या या आठवणी म्हणजेच तर आपलं सुंदर जीवन."
"पण ही माणसं जाणार असतात तर येतायच कशाला?"
"ही माणसं आपल्या आयुष्यात येतात म्हणून तर यांच्या आठवणी होतात. या आठवणी म्हणजे तर जगण्याचा आधार."
"अरे पण याच आठवणींनी डोळे पाणावतात."
"कारण या आठवणी निर्माण होत असतात तेव्हा आपण ते क्षण खरे जगलेलो असतो. या आठवणी खूप काही आठवायला लावतात. ते स्पर्श, ते प्रेम, ती माया, नात्यात निर्माण झालेला तो ओलावा, तो आपलेपणा, पोट दुखेपर्यंत हसणं, पूर्ण वेळ एकमेकांसवे राहणं, एकमेकांना काय हवं नको ते पाहणं. या साऱ्याचं सार म्हणून या आठवणी कधी डोळ्यांत हलकेच पाणी आणतात. आपण ते अश्रू पुसू लागतो तोच कोणाची तरी पाठीवर थाप पडते. ती व्यक्ती विचारते काय झालं?
आपण आपल्यातच असतो, आपण पापण्यांची कड पुसत म्हणून जातो की काही नाही झालं. आपण पुन्हा आपल्यात रमतो."
"हो रे. खरंच. या आठवणी काय काय करतात?"
"अगं, या आठवणीच तर असतात ज्या सगळं सरलं तरी उरतात. सरणावर जाण्याआधी सुद्धा बाकी असतात त्या आठवणी. आणि तू म्हणतेस आठवणी त्रास देतात."
"हो देतात."
"अगं.."
"खरंच आहे हे."
"पण.."
"अरे पूर्ण ऐक तर."
"हां बोल"
"अरे आठवणी त्रास देतात. पण काही त्रासच हवेहवेसे असतात. नाही का?"
- वरुण भागवत
Hats off!👏👏👏
ReplyDeleteI just read the whole two times and I want to read it again❤️🙏....it's amazing, beautiful,deep and connects to my heart so well!
Really awesome varun dada!
Keep coming🥰
-Your little sister.
Thank you very much!! 😊😊😊
Delete