![]() |
| A click by: Varun Bhagwat |
तो थकून आडवा पडला होता. छताकडे बघितलं. त्याच्या हातात काहीच नाही अशी एक भावना निर्माण झाली. नीट पाहिलं तर अनेकदा आपल्या हातात गोष्टी नसतातच. हे प्रत्येकाच्या बाबतीत, आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या टप्प्यात लागू होतं. साऱ्याच गोष्टी आपल्या हातात नाहीत आणि असं होऊ शकतं याचा स्वीकार केला की सोपं होतं.
ज्यांना आपलं मानलं ते जर आपापलंच पाहू लागले तर? ही भावना खरंतर त्रासदायक आहे. पण प्रत्येक जण आपापलं पाहणारच. यात गैर काही नाही. हा स्वीकार केला की सोपं होतं.
कोणी कसं वागावं हे आपण ठरवू नये. ठरवलं तरी प्रत्येक जण स्वतःला हवा तसाच वागतो. ह्याचा एकदा स्वीकार असला की मग सोपं होतं.
Routine हे कंटाळवाणं होणार याचा स्वीकार केला की सोपं होतं.
नेहमीच दुसरं कोणी आपलं मनोरंजन करेल असं नाही. किंबहुना आपलं आपल्यालाच आपला 'दोस्त' होत self entertain करावं लागतं. हे आपण करू शकतो, हे आपल्याला जमू शकतं याचा स्वीकार केला की सोपं होतं.
आपल्या आयुष्यात निर्णय घ्यायला नेहमी कोणी मदत करेलच असं नाही. उलट आपले निर्णय आपणच घ्यावे. बरोबर किंवा चूक याची जबाबदारी आपलीच असेल याचा स्वीकार केला की सोपं होतं.
सारखंच ऊन आहे, फारच पाऊस आहे असं म्हणत त्यावर अकारण वैतागण्यात अर्थ नाही. निसर्ग त्याचं काम करतो आणि आपल्यालाही त्यानुसार flexible राहत आपली कामं करायची आहेत याचा स्वीकार केला म्हणजे सोपं होतं.
आपल्या हातून प्रत्येकच गोष्ट उत्तम घडेल अशी अपेक्षा बाळगणं म्हणजे स्वतःवर अपेक्षांचं अती ओझं टाकण्यासारखं आहे. काही गोष्टी सामान्य घडू शकतात याचा स्वीकार केला की सोपं होतं.
सातत्य ठेवायचं नाही आणि म्हणायचं यश मिळतच नाही. हे अयोग्य आहे. सातत्याला पर्याय नाही याचा स्वीकार केला की सोपं होतं.
मीच श्रेष्ठ आणि बाकीच्यांना काही येत नाही हा वेडा विचार झाला. आपण सर्वांकडून खूप काही शिकू शकतो, शिकलं पाहिजे याचा स्वीकार केला की सोपं होतं आणि शिकत राहता येतं.
याचबरोबर स्वतःला कमी लेखणं बरं नाही. आपल्याला आत्मविश्वास वाढवायची गरज आहे याचाही स्वीकार करत तसे प्रयत्न केले की सोपं होतं.
सगळंच अचूक नसेल याचा स्वीकार केला की सोपं होतं.
आपण superhuman नसून आपल्यालाही मर्यादा आहेत याचा स्वीकार केला की सोपं होतं.
प्रयत्नाने आपण आपल्या मर्यादा वाढवू शकतो याचादेखील स्वीकार केला की सोपं होतं.
प्रत्येक वेळी जिंकणंच सारं काही नसतं. आपण हरू शकतो हे स्वीकारलं की सोपं होतं.
एकट्याने नाही, सगळ्यांनी मिळून केलं की कोणताही project पूर्णत्वास जातो याचा स्वीकार केला की सोपं होतं. म्हणजेच मी नाही तर आपण असतो हे स्वीकारलं की सोपं होतं.
स्पर्धा स्वतःशी आहे याचा स्वीकार केला की सोपं होतं.
अपयश हा यशाचाच भाग असतो याचा स्वीकार केला की सोपं होतं.
टाळाटाळ टाळायची याचा स्वीकार केला की सोपं होतं.
तेवत राहणारी ज्योत केव्हातरी शांत होईल याचा स्वीकार केला की सोपं होतं.
कुठे थांबायचं हे कळलं की सोपं होतं.
- वरुण भागवत

अगदी खरंय 👆👌🙏
ReplyDeleteतंतोतंत खरंय भावा 🤗❤️
ReplyDeleteThank you
ReplyDelete