मशाल जळत होती. त्यातून निर्माण होणारी आग केसरी, गडद पिवळा रंग झळकवत होती. त्या आगीतून तयार होणारी आभा त्याच्या मुखावर पसरली. मुखावर तेज दिसू लागलं. आजूबाजूला मिट्ट काळोख. केवळ चेहऱ्यावर आगीची आभा, त्यामुळे येणारं तेज, आणि शांत उभा असलेला तो!
अंधारात असणाऱ्या कोणासाठीही एक प्रोत्साहन होतं ते चित्र! इतका मिट्ट काळोख आयुष्यात निर्माण झाला तरी इवलासा प्रकाश तमाचा अंत करू शकतो.
"पिछे मेरे अंधेरा, आगे आँधी आँधी हैं, मैंने ऐसी आँधी में दिया जलाया है|" या गुलजार जींच्या ओळी तंतोतंत तिथे बसल्या.
ते चित्र प्रेरणा देत होतं की कितीही नकारात्मकता असली तरी एक छोटी ज्योत सारं काही उजळून टाकते.
आग ही खरंतर विध्वंस करणारी गोष्ट देखील आहे. परंतु हाच अग्नी पंच महाभूतांपैकी एक आहे. It's a source of energy.
तिमिरातून तेजाकडे जाताना हा अग्नी मदत करेल. मनात हा अग्नी सतत प्रदीप्त असायला हवा. तोच ऊर्जा देतो.
मशाल तर खूप जास्त प्रकाश देते. पण एक छोटी पणती सुद्धा तिचा परिसर समृद्ध करते. आपण आपल्या परीने पणती होऊ शकतो, मशाल होऊ शकतो. इतक्याशा प्रकाशाने काय होणार? असा self doubt असतोच. पण प्रकाश नसण्यापेक्षा थोडा प्रकाश असणं अधिक महत्त्वाचं.
आपल्यात प्रकाश असतोच. पण आपल्याला कळत नाही. कारण त्यावर काजळी बसलेली असते. ती दूर करणं आपल्याच हाती असतं. दीप उजळण्यासाठी काजळी काढणं महत्त्वाचं.
ही काजळी कधी नकारात्मकतेची असते.
कधी कंटाळ्याची असते.
कधी अविश्वासाची असते.
कधी न मिळालेल्या प्रोत्साहनाची असते.
कधी दुर्लक्षित कौशल्याची असते.
कधी आळसाची असते.
कधी द्वेषाची असते.
कधी भीतीची असते.
मग काय करायचं? प्रत्येक वेळी कोण सहाय्याला येईल? आपणच आपल्या हाताने ती काजळी काढायला सुरुवात करायची. कधी कधी जळत असणारा दिवाही या काजळीमुळेच हवा तितका प्रकाश देत नाही. कारण काजळी काढलेली नसते. थोडे कष्ट पडतात. पण जमतं. म्हणजेच काय तर स्वयंप्रेरणेने ती काजळी दूर करायची.
मी अविवेकाची काजळी,
फेडोनि विवेकदीप उजळी|
ते योगिया पाहे दिवाळी,
निरंतर|
- ज्ञानेश्वर माऊली
ते चित्र हेच दर्शवत होतं. तेजाने झळकणारा चेहरा डोळ्यातून बोलत होता. ती आग डोळ्यातही होती. निरखून पाहिलं. लक्षात आलं की मशाल दूर आहे. हातात एक पणती आहे. ती काजळी नसलेली पणती केवढा प्रकाश देत होती. प्रत्येकामध्ये प्रकाश निर्माण करण्याचं, किमान आजूबाजूचा परिसर आपल्या ज्ञानरूपी प्रकाशाने समृद्ध करण्याचं सामर्थ्य आहे, हेच जणू ते चित्र, त्यातील छोटीशी पणती आणि ते तेजःपुंज मुख सांगत होते.
- वरुण भागवत

Thank you so much dada, fr this blog.. #अप्रतिम
ReplyDeleteThank you!!
DeleteKhup chan
ReplyDeleteThank you 😊
Deleteछान लिहलं आहे
ReplyDelete