![]() |
तो आणि ती समुद्रकिनारी गेले. समोर पाहिलं. दूरवर दिसणारा सागर. त्याला अथांग का म्हणतात त्याचं उत्तर लगेच त्यांना मिळालं. ज्याचा थांग लागू शकत नाही तो अथांग.
खरंच ह्या सागराला अंत आहे का?
अंत असेल तर कुठे जाऊन हा संपतो?
असे प्रश्न त्याला पडले.
ती म्हणाली, "क्षितिज बघ. आपले अवघड प्रश्न सोपे करतं."
"म्हणजे?" त्याने प्रश्न केला.
ती उत्तरली, "हा समुद्र कुठे संपेल वगैरे तुझा प्रश्न. त्याचप्रमाणे आयुष्यात पुढे काय होईल असेही तुझे प्रश्न."
तो बुचकळ्यात पडत म्हणाला, "हो."
ती गोड हसत म्हणाली, "क्षितीज हे त्याचं उत्तर."
तो पुन्हा प्रश्नार्थक नजरेने म्हणाला, "पण क्षितीज म्हणजे तरी काय?"
"जिथे आकाश आणि हे दूरवर असलेलं पाणी एकमेकांना मिळतात." तिने समर्पक उत्तर दिलं.
"पण खरंच असं घडत नाही. ही एक concept आहे. हा एक भास आहे." तो म्हणाला.
ती लगेच म्हणाली, "मान्य आहे. पण हे उत्तर आपल्या मनाचं समाधान तरी करतं."
"पण मग असं भासवत, फसवत का जगायचं?" तो निरागसपणे म्हणाला.
ती शांतपणे उत्तर देत होती, "आपण पण अनेकदा तसे जगतोच की. आपण म्हणतो लवकरच भेटू. तो 'लवकर' खूप काळाने सुद्धा येतो, मग ही फसवणूकच झाली ना. लवकर भेटू म्हणायचं पण उशीरा भेटायचं. मला पण म्हणालास की आपण लवकरच एकत्र येऊ. आपण भासवत आहोत की आपण एकत्र आहोत पण खरं पाहता आपण एकत्र नाही."
तो तोडत म्हणाला, "आहोत की एकत्र."
"पूर्णपणे एकत्र कधी येणार? लवकरच म्हणू नकोस. कारण तसं म्हणालास तर हे पण भासवत आणि फसवत जगणं होईल. नाही का?" तो ठामपणे बोलली.
तो थोडा खजील होत म्हणाला, "अगं तसं नाही. मी भासवत नाहीये. खरंच एकत्र येणार आहोत आपण. पण कधी कधी भीती वाटते. म्हणून पुढे ढकलतो मी आणि म्हणतो लवकरच येणार आपण एकत्र."
"म्हणजेच तू मला क्षितीज दाखवतोस. उत्तर खरं नसतं पण समाधान देणारं असतं."
तो सावरत म्हणू लागला, "अगं.."
तिने लगेच तोडलं, "पण मी complaint करतच नाहीये. तू दाखवत असलेलं क्षितीज मला हवंहवंसं आहेच. तू त्याला भास म्हणतोस पण माझ्यासाठी ती आशा आहे की हे घडेल. आपण आज ना उद्या पूर्णपणे एकत्र येऊ, कोणतेच किंतु परंतु न ठेवता एकमेकांचे होऊन जाऊ ही आशा त्यात असते. म्हणून मला क्षितीज भास आहे असं वाटत नाही."
तो तिच्याकडे पाहत राहिला, "आशावादी असणं तुझ्याकडून शिकावं. तुझं हे बोलणं पुन्हा मला विश्वास देतं की खऱ्या अर्थाने आपण लवकरच एकत्र येणार."
ती गोड हसत म्हणाली, "माझं कोणतंच pressure नाही. तुला खरंच माझी सोबत हवी असेल तरच हे घडू दे. नाहीतर मला क्षितीज दाखवत आकाश आणि पाणी यांनी एकत्र यायची आवश्यकता नाही. दोघे आपल्या रस्त्याने जाऊ शकतात."
तो पटकन म्हणाला, "मला हवीच आहे तुझी सोबत. पण भविष्यात कसं होईल, आपल्याला जमेल की नाही हे प्रश्न छळतात. पण तुझं हे बोलणं हे प्रश्न सोपे करतात. अशी सोबत असेल तर मी तरी का उगाच अती विचार करावा. लवकरच एकत्र येऊ असं मी नाही म्हणणार."
ती थोडी हिरमुसली.
तो हसत म्हणाला, "अगं मी म्हटलं की लवकरच एकत्र येऊ असं मी नाही म्हणणार. तर माझं म्हणणं असं आहे की आपण 'आत्ताच एकत्र येऊ'. तुझ्या समोर असणाऱ्या, त्या दूर दिसणाऱ्या क्षितीजाच्या साक्षीने एकत्र येऊ."
ती आनंदून म्हणाली, "खरंच?"
त्याने हसत मानेने होकार दिला.
तिने उडी मारत त्याला घट्ट मिठी मारली.
- वरुण भागवत



सरळ आणि सोप्या भाषेत खूप काही सांगून जातेय आजची गोष्ट.
ReplyDelete