![]() |
| A click by Sushil Ladkat |
नावेत बसलो होतो. वल्हवताना होईल तेवढाच पाण्याचा आवाज होता... बाकी निरव शांतता. पाण्यात मध्यभागी एक झाड उगवलं होतं, झाडाच्या सगळ्यात वरच्या फांदीवर एक सुंदर पक्षी बसला होता. मी तो पक्षी बघत होतो.
फांदीसारखी फांदी ती, एकदम हलकी. त्या फांदीसोबत हा डुलत होता. मला जाणवलं आपण हे पुस्तकात वाचलं होतं की पक्ष्याचा आपल्या पंखांवर विश्वास असतो आणि आज प्रत्यक्ष अनुभवलं. याला भीती नव्हती फांदी तुटण्याची आणि आपण पडण्याची!
आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे असं जाणवलं. भौतिक गोष्टींमुळे येणारी safety आणि comfort zone यात मी किती अडकतो असं वाटलं. माझं घर (कदाचित वडिलोपार्जित, कदाचित मिळवलेलं, कदाचित भविष्यातलं), माझी गाडी, माझे savings नसतील तर माझ्या आयुष्याला काही अर्थ नाही असाच मी समज करून घेतो.
डोक्यावर निवारा नसेल हा विचार मला घाबरवून सोडतो. मी जमवलेल्या माझ्या वस्तू जीवाहून जास्त जपतो. हे सगळं आहे तसं ठेवण्यात आणि जपण्यात मी माझा पूर्ण वेळ खर्च करतो. हे सगळं करण्याचं कारण म्हणजे मला कायम या भौतिक गोष्टींचा आधार असावा ज्याने मी सुरक्षित (?) राहीन असं मला वाटतं. मी असा विचारच करत नाही किंवा असा विचार करायला घाबरतो की हे सगळं जर कधी भविष्यात काही कारणांमुळे राहिलं नाही तर मी survive कसं करेन?
नाही, नाही! असं कुठं असतं का? असं का होईल माझ्या बाबतीत.. असं म्हणत मी तो विचार झटकतो. तेवढ्यात त्या पक्षाने त्याचे पंख झटकले. फांदी थोडीशी वाकली. पक्षी डगमगला नाही. त्याने चहूबाजूला एक नजर टाकली. फांदी थोडी अजून वाकली. त्याने फांदीचा अंत बघितला नाही. पंख पसरले आणि..
त्याने भरारी मारली, इकडे काडकन फांदी तुटली. फांदी पाण्यात पडली, तिचं अस्तित्व संपलं त्याचं कोणाला काहीच वाटलं नाही.लक्ष पक्ष्याकडे गेलं.
पक्ष्याने शाळेत पुस्तकात शिकलेल्या धड्याला प्रत्यक्षात उतरवलं. फांदी फक्त आधारासाठी.. ती कधीही तुटू शकते. तिच्यात अडकायचं नाही. एखाद्या फांदीने जास्त साथ दिली तर उत्तम पण ती सुद्धा एक दिवस तुटेल. त्यामुळे पंखांना विसरायचं नाही. आणिअशा कितीही फांद्या तुटल्या आणि पडतोय अशी वेळ आली तरी पंखांवरचा विश्वास गमवायचा नाही.
त्या पक्ष्याने माझ्या मनाला वल्हवत वेगळ्याच विचारांच्या किनाऱ्यावर आणून सोडलं. या नौकाविहारात पक्षाने फांदीचा आधार सोडला होता आणि मी जुना किनारा (सोडायच्या प्रयत्नांत होतो).
वरती पाहिलं. तो अजूनच उंच उडत होता. आता आधारासाठी अजून उंच झाड शोधात होता. पुन्हा आधार म्हणालो का मी? सवय लागलीये ना.. मग नीट पाहिलं. आधार कसला..
पंखांच्या बळावर
उंsssssssssच
गगनभरारी घेण्यासाठी
पक्षी उडाला आकाशी......
-वरुण भागवत

Comments
Post a Comment