![]() |
| A click by Varun Bhagwat |
एक सुंदर वाक्य वाचनात आलं आणि लक्षात आलं की किती खरं आहे ते. लिहिलं होतं की काही तास एखाद्या गोष्टीवर खूप विचार करण्यापेक्षा काही मिनिटं त्याच्यावर काम करणं अथवा काही मिनिटात ते करून टाकणं हे जास्त श्रेयस्कर आहे.
असं केल्याने आपलं मन थाऱ्यावर राहतं.
नवा विचार करण्यासाठी डोकं जागेवर राहतं. कारण एखाद्या कामाचा जेव्हा नुसता विचारच केला जातो (कृतीविना), तेव्हा काहीही घडत नाही. वाया जातो तो वेळ, वाया जाते ती ऊर्जा ती सुद्धा निष्कारण! किती विचार करायचा आणि कुठे थांबवायचा हे आपलं मन ठरवतं. आता मन म्हणजे आपणच, मव आपणच ते वेळेत ठरवायचं आणि विचार करून कृती करून टाकायची. यामुळे त्याच गोष्टी आवण घोळत बसत नाही, पटकन पुढे जातो अर्थात पुढची वाटचाल सुरू करतो.
होतं असं की याने आपलं मानसिक आरोग्य सुदृढ राहायला मदत होते. गमतीचा भाग असा, खरं तर हा भाग गमतीचा नाही पण एकूणच आपल्याकडे मानसिक आरोग्याला फार कमी लेखलं जातं, कमी महत्त्व दिलं जातं.
शारीरिक आरोग्याइतकंच मानसिक आरोग्यालाही महत्व आहे; मात्र त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. यावर बोलणारे अनेक लोक आहेत पण तरीसुद्धा त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तितपत सकारात्मक झालेला नाही. हे काही सर्वांच्या बाबतीत लागू नाही पण काही लोकांच्या बाबतीत मात्र निश्चितच attitude बदलण्याची गरज आहे. हळूहळू awareness वाढतो आहे जी जमेची बाजू आहे.
अगदी खरं सांगायचं तर या मानसिक आरोग्याची काळजी आपण आपलीच घेऊ शकतो. शारीरिक आजार बरे करण्यासाठी डॉक्टर असतात. अर्थात मानसिक आरोग्य सुधारण्यासाठीसुद्धा डॉक्टर्स आहेत मात्र मानसिक आरोग्याकडे ज्याचं त्यानं कटाक्षाने लक्ष देणं गरजेचं असतं.
शरीर आणि मन या गोष्टी एकमेकांशी खूप जास्त संलग्न आहेत. मन जपलं की शरीर उत्तम राहतं आणि शरीर सुदृढ ठेवलं की मनाने सुद्धा आपण खूप फ्रेश राहतो.
योग दिन किंवा मानसिक आरोग्य दिन ही निमित्त झाली. खरंतर हे प्रातिनिधिक दिवस आहेत. हे दिवस आपल्याला प्रेरणा देतात आणि सांगतात की शरीर आणि मन या दोन्ही गोष्टींचा उत्तम balance साधून राहता आलं की जमतं.
आपलं मनच तर नेहमी पुढची वाटचाल ठरवत असतं. समर्थ रामदासांनी तर फार पूर्वी मनाचे श्लोक लिहिले आहेत. ते तर केवढे मोठे सायकॉलॉजिस्ट होते असं म्हणता येईल.
त्यांनी मनाच्या प्रत्येक गोष्टीचा अभ्यास केला आणि नकळत मानसिक आरोग्याचं महत्त्व पटवून दिलं.
मन जर का नितळ आणि स्वच्छ असेल
तर आपोआपच सगळं निखळ होऊन जातं.
मन जाणता आलं पाहिजे, स्वतःचं आणि इतरांचं सुद्धा!
अवघड आहे पण प्रॅक्टिसने जमू शकतं. ही कला अगदी ठरवून अवगत करता येऊ शकते. मनावर उपचार सापडला की शरीर पण बऱ्यापैकी बरं होत राहतं.
अनेकदा लक्षात येत नाही की पण घरात एकाचं मन जरी खट्टू असेल तरी त्याचा परिणाम पूर्ण कुटुंबावर होतो. म्हणून स्वतःसोबत दुसऱ्याचं मन जपता आलं पाहिजे. प्रत्येक वेळी शक्य होत नाही, जमत नाही पण म्हणून नेहमीच जमणार नाही असं नसतं. कारण जमेल , जमणार नाही हे ही ठरवतं ते मनच!
- वरुण भागवत

Comments
Post a Comment