![]() |
| A click by Varun Bhagwat |
मला फार गंमत वाटते न मागता सल्ले देणाऱ्या लोकांची.
मला नको असेल यांचा सल्ला तर म्हणतात तुझ्या भल्यासाठी आहे हे!
त्यांना म्हणावसं वाटतं की अहो तुम्ही कसं काय ठरवलं की माझं भलं कशात आहे ते! सटवाई ने ५व्या दिवशीच माझं नशीब लिहून ठेवलंय. ते तुमच्या सल्ल्याने बदलेल का? नशीबाचं जाऊ द्या. सल्ला दिला इथवर ठीक! तो ऐकलाच पाहिजे हा यांचा अट्टाहास! यांच्या मते, यांच्या सल्ल्याने काहीतरी revolutionary म्हणजेच क्रांतिकारी बदल होणार असतो आपल्या आयुष्यात.
योग्य माणसाने, योग्य ठिकाणी, योग्य टप्प्यावर, योग्य वेळी योग्य सल्ला देणं आणि आपण तो घेणं या साठी त्या योग्य level चं नातं असावं लागतं. तरच सल्ला देणाऱ्याचा मान राहतो आणि घेणाऱ्याला कदाचित सल्ल्याचा फायदा होतो.
पण यातली ही जी उगाच सल्ला देणारी माणसं असतात, त्यांना एकतर त्यांचं सगळं सांभाळून ही सोशल सर्व्हिस (?) करायला वेळ झालेला असतो किंवा स्वतःचं झाकण्यासाठी हे सल्लागार नावाचा पार्ट टाइम जॉब (बिनपगारी) करतात किंवा यांना मुळातच हौस असते दुसऱ्याचं डोकावून पाहण्याची. याचा अर्थ यांचं काही फार बरं चाललेलं असतं असा नाही. पण कोणावर तरी वरचष्मा दाखवायला मिळतो याचा आनंद (?) त्यांना मिळतो. पोट भरलेला माणूस अर्धपोटी माणसाला उत्तम सल्ले देतो पण तो काही त्या अर्धपोटी माणसाचं पोट भरत नाही आणि चुकून त्याच्यावर तशी परिस्थिती आली तर दुसऱ्याला दिलेल्या सल्ल्यानुसार तो स्वतः वागेलच असंही नाही.
बरं, अनेकदा तर सल्ला देणारा आपण दिलेला सल्ला विसरूनही जातो पण जो त्याचा सल्ला घेतो तो मात्र बिचारा त्यावर बरीच काथ्याकूट करत बसतो. अनेकदा काही निष्पन्न होतंच असं नाही.
एखाद्या गोष्टीविषयी, माणसाविषयी, परिस्थितीविषयी पूर्णपणे माहिती नसताना उगाच सल्ला देऊ नये असा मला यांना सल्ला द्यावासा वाटतो. बघा, बोलता बोलता मी पण सल्ला देण्याची भाषा केलीच! कोणीही न मागता! आपल्याकडे problem च आहे हा.. सवय लागल्यासारखं न मागता सल्ले देणं!
या सल्लागारांना म्हणावं वाटतं, अहो ऐका ना! नकोय तुमचा सल्ला..बरं चाललंय की आमचं! बघवत नाहीये की त्रास होतोय???
पण असं कसं म्हणणार?
वयाचं भान राखावं लागतं,मानापमान जपावे लागतात.. नाहीतर यांना त्याचाही राग.. बोलायची पद्धत नाही असं म्हणत आमच्या आईबापांना नावं ठेवतात आणि यातले काही काही जण तर मी कशा पद्धतीने त्यांना react झालो, ते कसं चुकलं आणि ते कसं सुधारता येईल हा सल्ला आमच्या आईबापाला देतात.
उगाचच आपल्या आईबापाला काही सल्ला देऊ नये, समाजाचा balance (?) बिघडू नये आणि नातेसंबंधांना गालबोट लागू नये आणि ultimately त्यामुळे आपल्या मनाचा balance बिघडू नये म्हणून आपण यांचे सल्ले ऐकतो आणि या सल्लागारांना शहाण्यालाही वेडं करायची ताकद बहाल करतो. आपल्या मनाचा balance खरंतर हे बिघडवत असतात पण यांच्या मते हे एक महत्वपूर्ण सल्ला देत असतात.
-वरुण भागवत

Comments
Post a Comment