एका शांत, निवांत स्थळी मी जाऊन बसलो. एकदम जाणवलं की ही शांतता किती गरजेची होती आणि कितीतरी दिवसापासून हवीशी होती. मिळालं नाही की त्या गोष्टीचं महत्त्व जास्त समजतं हा मनुष्यस्वभाव वेळोवेळी दिसतो.
आपण शांतता शोधतो, ती शोधेपर्यंत किती कल्लोळातून जावं लागतं. किती कोलाहल, दंगा, गडबड, गोंधळ चालू असतो आणि या दिव्यातून पार झालं की मग लाभते शांतता. या सगळ्यातून न जाताच शांतता मिळेलही पण मग आत्ता जितकं जाणवतंय तितकं त्या शांततेचं महत्त्व जाणवणार नाही, समजणार नाही.
माणूस एक अजब प्रकार आहे. फार शांतता झाली तरी सुन्न पडतो. काय करावं समजत नाही. सारखा समतोल हवा असतो. आयुष्यात इतका जर समतोल असता तर आयुष्याची रेषा (ECG) सरळच राहिली असती. पण असं चालणार नाही. ती रेष सरळ झाली की विषयच संपला.
चढ आहे म्हणून उताराचं महत्त्व आहे आणि उतार आहे म्हणून चढाला किंमत आहे आणि तो चढ चढून वर जायला पण फार किंमत मोजावी लागते, वेगवेगळ्या प्रकारे.
या शांततेच्या महत्त्वाचा शोध घेताना कितीतरी गोष्टी शोधल्या जातात. आपला आपल्याला श्वासोच्छ्वास ऐकू आला की कळतं आपण आहोत. हा श्वास आपलं जिवंत असणं अधोरेखित करतोय. जसं 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' या चित्रपटातला इम्रान आपल्या एका कवितेचा शेवट करताना म्हणतो, "सिर्फ मैं हूं, मेरी सांसे है और मेरी धडकने…. मुझे अपने होने पे यकीन आ गया।"
आपण आहोत, आपण म्हणजे मी एक व्यक्ती आहे. माझ्यासारखा दुसरा नाही. त्या दुसऱ्यासारखा तिसरा नाही. प्रत्येक व्यक्ती वेगळी. परमेश्वराने निर्माण केलेल्या या जगात प्रत्येकाचं स्वत:चं असं स्वतंत्र जग आहे. नसेल तर ते त्याला निर्माण करायचंय. स्वतःचं अस्तित्त्व निर्माण करायचंय. स्वतःची ओळख निर्माण करायची आहे.
नवनिर्मिती हा मनुष्याचा सहजभाव आहे. त्यासाठी अर्थात आपल्याला असं काही नवं आणि स्वतःचं काही सर्जनशील निर्माण करावं वाटतं. तेव्हा कळतं की यासाठी हा शांतपणा, एकटेपणा गरजेचा असतो. तेव्हाच तो खरा वेळ मिळतो जाणून घ्यायला की मला नेमकं काय हवं आहे आणि मग सुरू होतो शोध. हा शोध आणि हा प्रवास थरारक बनत जातो. आपण आपलं एक सुंदरसं जग निर्माण करू पाहतो.
हे सर्व आपण करत राहतो आणि एका क्षणी ध्यानात येतं की आपलं जग सगळ्यांच्या ध्यानात येईलच असं नाही. पण आपलं जग आपलं असतं. कोणी डोकावलंच आपल्या जगात तर ते सुंदर असावं असं प्रत्येकाला वाटतंच. बाकी कोण राहू दे, वेळ मिळाला की या निर्मिलेल्या जगात आपण आपलंच स्वतः डोकावलं तरी ते समाधान देणारं असावं.
शांत, निवांत आणि मनातलं असावं!
- वरुण भागवत

Comments
Post a Comment