| A click by: Varun Bhagwat |
- आज
पूर्ण पान कोरं सोडलंस?
- सुचलं नाही.
- सुचलं नाही की तसा प्रयत्न
केला नाहीस.
- केला ना!
- मग का लिहिलं नाहीस?
- अरे.. मी केला प्रयत्न..
- मला
सांगण्यासाठी म्हणशील केला प्रयत्न..
- अरे
तू होतास तिथे. किती वेळ तुझ्याकडे पाहत होतो. तुला पटत नाही का?
-
जोपर्यंत मी शाईने नाही भिजत तोपर्यंत मला नाही पटत.
- पण मी.
- हे बघ. मला कळतंय.
- काय कळतंय?
- तुला quality
भारीच हवी
आहे तुझ्या लिखाणाची.
- अर्थात.
- आणि म्हणूनच तू माझ्यावर
अर्थात या कागदावर एक शब्द सुद्धा न उमटवता निघून जातोयस.
- कदाचित.
- कदाचित नाही.. हेच खरं आहे.
- बरं मान्य.
- तू लिहिलेलं चांगलं आहे की
नाही हे लिहील्याशिवाय कसं कळेल..?
- म्हणजे?
- अरे तुला वाटतंय की तुला quality stuff सुचत
नाहीये.
- हां.
- पण जोपर्यंत तू माझ्यावर
प्रयोग करत नाहीस तोपर्यंत तुलाही कळणार नाही. कधी कधी लिहायला घेतलं की सुचत
जातं. कधी कधी अगदी वाईट लिहिलं जाईल. पण वाईट लिहिण्याला घाबरु नकोस. लिहिता हो.
लिहिलेलं वाईट आहे असं अनेकदा आपल्याला वाटतं किंवा कधीकधी स्वतःचं लिखाण स्वतःला
सामान्य वाटतं पण इतरांना ते कदाचित त्यांच्या जवळचं वाटेल. Don't overthink. Overanalyse
करू नकोस. उपयोग काहीच होणार नाही. कागदावर काही
उमटल्याशिवाय कसं कळेल की ते कसं जमलंय? नुसताच माझ्याकडे पाहत राहिलास तर काय
होणार? मी
कागद आहे, तो
ही कोरा. जोपर्यंत मला रंग चढत नाही तोपर्यंत तुझ्या लिखाणावर चर्चा होऊच शकत
नाही.
- चर्चा?
- हां, तू लिहिणार तर मग चर्चा
होणारच. तू चर्चेला घाबरू नकोस. हां,
'न लिहिण्याला'
घाबर. कारण तेच तर तुझं शस्त्र आहे. शस्त्र वापरलं
नाही तर त्याला गंज चढेल. ते होऊ देऊ नकोस. चांगलं - वाईट अशा दोन टोकांचं फार कमी
असतं. मुळात चांगलं आणि वाईट ठरवणं हा सुद्धा दृष्टिकोनाचा भाग आहे.
- मी काय करू?
- लिहायला घाबरू नकोस, कचरू नकोस. लेखणी चालव. शाई
सांडू दे. माझ्यासाठी तोच मोठा आनंद आहे.
- पण ते लिखाण कसं होईल?
- ते कसं का होईना. तू आधीच नको ठरवू. ते मी आणि
मला वाचणारे लोक ठरवतील. तू मजा घे. टीकेची आणि कौतुकाची..!!
- वरुण भागवत
अगदी👌
ReplyDelete