![]() |
| A click by Varun Bhagwat |
ऑफिस च्या कॅफेटेरिया मध्ये गरमा गरम कॉफी चे mugs घेऊन दोन team members कोपऱ्यातील टेबल पकडून बसले. कॉफी थोडी थंड होईपर्यंत दोघांमध्ये संवाद सुरू झाला.
"काय मग शिराळशेट?" विकास म्हणाला.
"काय? कोणाला बोलवतोयस?"
"तुलाच!"
"माझं नाव शिरीष आहे, शिराळशेट नाही."
"हो, पण आज तू शिराळशेट! औट घटकेचा राजा, congratulations!"
"ऐक ना, कोण शिराळशेट? कसली औट घटका? आणि माझा त्याच्याशी काय संबंध?"
"तुला नाही माहीत?"
"नाही रे बाबा."
विकास कॉफीचा घोट घेत बोलू लागला, "अरे पूर्वी एक राजा होऊन गेला."
"शिराळशेट नावाचा?"
"नाही."
"मग?"
"जो राजा होऊन गेला त्या राजाच्या नावाला महत्त्व नाही. त्याने घेतलेल्या एका निर्णयामुळे घडलेल्या बदलला महत्त्व आहे."
"कोणता निर्णय?"
"ऐक तर! त्या राजाच्या राज्यात फार मोठी नैसर्गिक आपत्ती आली. त्याच राज्यात शिराळशेट नावाचा वाणी अर्थात दुकानदार दुकान चालवायचा."
"Okay."
"आता या शिराळशेटने या आपत्तीला तोंड देण्यासाठी आणि लोकांची मदत व्हावी म्हणून आपलं सगळं धान्याचं गोदाम मोकळं केलं. शक्य तिथे वाटून टाकलं. त्याच्या या औदार्याच्या कृत्यामुळे खुश होऊन तिथल्या राजाने ह्याला औट घटकेचा राजा बनवला. घटका म्हणजे फार थोडा काळ. पण थोड्या काळासाठी का होईना, त्याला राजा होण्याचा मान मिळाला. हे सगळं घडलं त्याने केलेल्या सत्कृत्यामुळे."
"चांगलंय. पण या सगळ्याचा माझ्याशी कसा संबंध? कारण मी कोणतंच सत्कृत्य केलेलं नाही."
"तू या महिन्याचा employee of the month आहेस ना?"
"हो."
"तो तू कशामुळे झालास?"
"कंपनीला तसं करावंसं वाटलं."
"श्या, इतकं अरसिक उत्तर देऊ नको."
"अरसिक काय?"
"अरे कंपनीला असं करावं वाटलं कारण कंपनीला खूप गरज होती त्या वेळी तुझ्या उत्तम आणि dedicated कामाने तू कंपनी साठी उभा राहिलास. So, असं समज की राजा म्हणजे कंपनी आणि आपत्तीसमयी मदत करणारा शिराळशेट म्हणजे तू. त्यामुळे तुझा आज गौरव झाला. हां, अगदी राजा नाही बनवलं तुला पण औट घटकेसाठी अर्थात थोड्या वेळासाठी का होईना, राजासारखं feeling आलं ना तुला. काही काळासाठी तुझ्यावर लक्ष्य केंद्रित होतं सर्वांचं. म्हणून तू शिराळशेट!" असं म्हणत विकासने कॉफी चा mug संपवून खाली ठेवला.
शिरीष विचारात मग्न होता. तोच त्यांना पाठमोरी बसलेली व्यक्ती म्हणाली, "Sorry to interrupt, पण ही अर्धीच गोष्ट आहे."
विकास त्या व्यक्तीला उद्देशून म्हणाला, "आपण?"
मान वळवत ती व्यक्ती उत्तरली, "माझं नाव प्रकाश. तर मी म्हणत होतो की गोष्ट अर्धी आहे."
"कशी?"
"शिराळशेट औट घटकेचा राजा झाला आणि राजा झाल्यावर जो काही अगदी थोडा कालावधी त्याला मिळाला त्यातही त्याने अनेक परोपकारी कामं केली."
विकास पटकन म्हणाला, "म्हणजे शिरीष शिराळशेट नाही."
प्रकाश बोलला, "नाही असं नाही."
"पण आत्ताच तर तुम्ही म्हणालात, तो परोपकारी होता आणि आत्ता हा कुठे परोपकारी कामं करतोय?"
"आत्ता ते त्याच्या अधिकारात नाही. हळूहळू त्याची पण team असेल आणि मग निश्चितच संधी मिळत असते leader बनून नकळत परोपकारी कामं करण्याची. आजच्या काळात मी त्याला अगदी परोपकारी म्हणणार नाही पण शक्य त्या पद्धतीत team चं भलं करण्याची संधी! आज सुद्धा त्याने champ चं काम केलंय. So, तो काही प्रमाणात तू म्हणालास तसा शिराळशेट आहे."
"हां, म्हणजे मी काही पूर्ण चुकीचं विधान केलं नाही तर." विकासला हायसं वाटलं.
प्रकाश सांगू लागला, "अर्थात! वेळेला तो कंपनी करिता धावून आला. खरं पाहिलं तर आपण सगळेच कधी ना कधी काही प्रमाणात का होईना, शिराळशेट होऊ शकतो."
"लोक म्हणतात की आजच्या युगात आणि त्यातही कॉर्पोरेट मधल्या स्पर्धेत हे अवघड असतं."
"हो पण जर शिरीषसारखी माणसं आहेत तर अजूनही शिराळशेट होण्यासाठीचा विश्वास टिकून आहे."
"हां, आपण सारे शिराळशेट. I mean ठरवलं तर होऊ शकतो."
"Correct!"
"आपला परिचय?"
"मी तुमचा नवा leader. सोबत काम करायला मजा येईल."
- वरुण भागवत

Comments
Post a Comment