रात्रीच्या निवांत वेळी ते दोघे त्या वेळेच्या वेगाने अर्थात तितक्याच शांतपणे आणि आरामात चालत होते. कसलीच घाई नव्हती, गडबड नव्हती. रस्त्याने चालताना दोघांचं बोलणं चालू होतं.
ती स्वतःबाबत आणि स्वतःच्या thought process बाबत खूप confident होती. ती त्याला काय काय विचारत होती, तो बोलत होता. बोलता बोलता त्याच्या तोंडी साधारण या अर्थाचं आलं की चाळिशीपर्यंत खूप पैसे कमावून नंतर मग मी माझी hobby जपणार वगैरे!
असं म्हणताच तिने विचारलं की चाळिशीपर्यंत किंवा त्यानंतर तू जगणार किंवा जगशील हे तुला कसं माहितीये??? त्याला काय बोलावं सुचेना आणि हा त्या संवादातील एक realization चा point होता.
‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या सिनेमातील हृतिक आणि कॅटरिना मधला हा संवाद.
त्या realization point ला ती म्हणाली, "Seize the moment" अर्थात हा क्षण भरभरून जग. उद्याचं कोणी सांगितलं आहे.
मुद्दा असा की तो चाळिशीपर्यंत जगेल, १०० वर्षं जगेल हे कोणी सांगूच शकत नाही. जन्म आणि मृत्यू हा तेवढा निसर्गदत्त ठेवला गेलाय. मग आपल्या हातात काय आहे?? असं काही कोणी म्हटलं तर माणसाला भीती वाटते. जाणवतं की अरे बाप रे, खरंच हातात काय आहे?
तर आहे ना, आत्ताचा हा क्षण! हा कोणी हिरावून घेऊ शकतो तर ते आपणच. आपणच आपल्या आत्ताच्या चांगल्या क्षणाची माती करतो कधीकधी. त्या क्षणाला सहज वाहू दिलं पाहिजे. तो क्षण सहज जगता आला पाहिजे आणि पूर्ण जगता आला पाहिजे कारण एक नक्की, की ती moment किंवा तो क्षण, ती वेळ एकदा गेली की परत येत नाही.
क्षण ही किती छोटी गोष्ट आहे.
माणूस या क्षणाला कित्ती कमी लेखतो.
हे वाक्य बोलेपर्यंत हा क्षण निघून गेला सुद्धा. इतका पटकन तो निघून जातो. हा क्षण जगला किंवा जगायचा राहून गेला तरी अनेकदा त्याचं महत्त्व तो निघून गेल्यावरच कळतं.
हा क्षण उत्तम जगला तर मग पुढचा क्षण त्या सुंदर आठवणी आठवण्यात अजून छान जातो. नाही जगला तर भूतकाळाच्या दुःखात माणूस अडकत जातो, नि भविष्याच्या अती चिंतेत गुरफटून जातो.
आयुष्य म्हणजे हातात असलेल्या समुद्राच्या रेतीसारखं. आयुष्याला खूप control मध्ये ठेवायच्या प्रयत्नात आणि अती घट्ट पकडायच्या प्रयत्नात ते जास्तच पटापट निसटून जातं आणि खूप नंतर लक्षात येतं की अरे, आयुष्य पकडून ठेवायच्या नादात जगायचं तेवढं राहून गेलं.
मग हळहळ व्यक्त करून सुद्धा पुन्हा गेलेले क्षण येत नाहीतच. भविष्य ही एक गंमत आहे. आपण ते secure करायला जातो, केलंच पाहिजे. पण यात कधीकधी वर्तमान जगायचा राहून जातो. Take it step by step.
एक एक क्षण मस्त पिता आला पाहिजे, जगता आला पाहिजे.
तो क्षणच असा जगायचा की त्या क्षणाला आपल्याला सोडताना हळहळ व्यक्त करावी लागेल.
-
वरुण भागवत
Comments
Post a Comment