![]() |
| A click by Varun |
प्रेम ही फार छान संकल्पना आहे. काहींच्या बाबतीत ती सत्यात उतरते तर काहींच्या बाबतीत ही फक्त कल्पनाच बनून राहते. अर्थात काहींना प्रेम मिळतं तर काहींना नाही.
प्रेम मिळालंच नाही तर? ते सुद्धा लहान वयात?
'सिस्टिम क्रॅशर' नावाच्या सिनेमाची मूळ कल्पना हीच. त्यातल्या मध्यवर्ती पात्राला (१० वर्षाच्या मुलीला) जिव्हाळा माहीतच नाही. इतक्या लहान वयात प्रेमाला पारखं झालेली ती रागीट बनते. मनासारखं न झाल्याने वस्तूंची आदळआपट करू लागते. कधी कोणी तिचं जवळचं बनू पाहतं पण या ना त्या कारणाने तिच्यापासून दुरावतं. यामुळे ती अजूनच चिडचिडी होते.
हा एक प्रकार झाला. असे अनेक प्रकार पाहायला मिळतात. ऐकायला वेगळं वाटेल पण प्रेम न मिळाल्याने माणसांचं मानसिक संतुलन बिघडू शकतं.
प्रेम ही अशी गोष्ट आहे जी दुष्टाला सुद्धा सुष्ट करेल. इतकी ताकद असते या प्रेमात!
पण प्रेम नाही मिळालं तर याच्या बरोबर विरूद्ध घडतं.
यामुळे,
माणसाचं माणूसपण हरवू शकतं.
निरागस मन बंडखोर बनू शकतं.
प्रेमाची व्याख्या काही नाही.
प्रेम विकत मिळत नाही.
पण,
प्रेम वाटता येतं,
प्रेम वाढवता येतं.
प्रेम सहज असतं.
प्रेम गरजेचं असतं.
प्रेम प्रेमळ असतं.
प्रेम आजकाल दुर्मिळ असतं.
प्रेम नात्यातला ओलावा वाढवतं.
प्रेम अनेक प्रश्न सोडवतं.
या जगाला प्रेमाची गरज आहे.
कारण माणूस प्रेमाचा भुकेला आहे.
म्हणूनच कधी कुठे कोणाची सिस्टिम गडबड करू लागली तर वेळीच प्रेमाचा उपाय अवलंबला पाहिजे... सिस्टीम क्रॅश होण्याआधीच!!! कारण एकदा सिस्टीम क्रॅश झाली अर्थात गोष्ट हाताबाहेर गेली की मग ती पुन्हा पूर्ववत करणं हे फार फार फार अवघड होऊन बसतं. या सिस्टीमकडे वेळोवेळी पाहणं, दखल घेणं महत्त्वाचं. आपण महत्त्वाचे आहोत असं माणसाला जाणवलं की तो सुद्धा समोरच्यावर जीवापाड प्रेम करू लागतो. कारण तो प्रेमाचा भुकेला असतो. प्रेम मिळाल्याने तो त्याच्यात वाढच करणार असतो. प्रेम असं दिल्याने आटत नाही, वाढतं. प्रेमाची भूक पण लगेच संपत नाही, पण वेळोवेळी प्रेम दिलं की।ती शमत राहते. प्रेम दिलं की प्रेम मिळतं सुद्धा. अनेकदा माणसं आपल्याला प्रेम मिळणारंच नाही या खात्रीने कोणावर जीवच लावायला जात नाही आणि मग खरोखरीच एकटं पडायला होतं.
त्यामुळे या सिस्टीम चा सातत्यानं विचार होणं महत्त्वाचं. क्रॅश झाली नाही म्हणजे मिळवलं.
- वरुण भागवत

Comments
Post a Comment