| A click by: Sushil Ladkat |
माणूस प्रेमाचा भुकेला असतो. आयुष्यात असे काही टप्पे येतात जिथे प्रेमाची आणि प्रेम करणाऱ्या माणसांची किंमत फार जास्त जाणवते.. पण काहींच्या वाट्याला अशाच काळात आपल्याच माणसांकडून प्रेमाची परतफेड द्वेषाने मिळते.
KD नावाचा सिनेमा प्रेमाचं गणित छान मांडतो.
माणसं आपल्याच माणसाच्या जीवावर उठतात हे करुप्पा दुराई अर्थात KD ने ऐकलं होतं, पाहिलं होतं; पण आपली पोरं आपल्याच जीवावर उठतील याची त्याला पुसटशी सुद्धा कल्पना नव्हती. वडील आता ओझं झालेत या विचाराने मुलंच आपल्या ७५ वर्षाच्या पित्याला मारायचं ठरवतात. हे कळताच करुप्पा तिथून पळ काढतो. भटकत असताना त्याला १० वर्षांचा मुलगा भेटतो ज्याचं कोणीच नसतं.
प्रेम दिल्याने वाढतं हे अनुभवातून जाणणारा हा म्हातारा आणि कधीच प्रेम न मिळालेला हा कुट्टी नावाचा पोरगा यांच्यात फार जवळचं नातं निर्माण होतं.
कोणीही विचार केला नसेल असा विचार कुट्टी करतो आणि करूप्पा ची bucket list बनवतो. अर्थात अशा गोष्टी ज्या करायच्या राहून गेल्या किंवा ज्या करायला फार आवडतील अशी लिस्ट. मग सुरू होतो नि बहरत जातो एक निखळ प्रवास. ज्यात असतं प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळा!
प्रेमाचं असंच आहे. रक्ताचं नातंच जर सर्वश्रेष्ठ असतं तर मैत्री नावाची संकल्पना बहरलीच नसती. आपलीच माणसं कशी वागतील हे माहीत नसून पण आपण अक्षरशः जीव ओवाळून टाकतो त्यांच्यावर पण अनेकदा त्यांना किंमत कळत नाही. पण एखादं कोणीतरी भेटतं जे प्रेमाचं भुकेलं असतं आणि थोडंसं जरी आपण प्रेम दिलं तरी आपल्यावर दुपटीने वर्षाव होतो प्रेमाचा!!
प्रेम ओरबडणारे खूप आहेत. प्रेम लावणारा पाहिजे.
जीव घेणारे पण आहेत; आपल्याला जीवाला जीव देणारा पाहिजे.
पापी खूप आहेत.. निरागसता शोधणारा पाहिजे.
आयुष्य संपवणारे खूप आहेत. खुलवणारा पाहिजे.
आपल्यावर हसणारे खूप आहेत. हसवणारा पाहिजे.
तोडणारे अनेक आहेत. जोडणारा पाहिजे.
अशा जोडणाऱ्या व्यक्तीला सोडायचं नाही. तेच आपलं माणूस!
या जगाला प्रेमाची खूप गरज आहे. प्रेम लावणारा पाहिजे.
कारण माणूस प्रेमाचा भुकेला असतो.
- वरुण भागवत
Superb sir .👌👌
ReplyDeleteThank you!
Deleteखूप छान विचार आहेत तुमचे.👌👌
ReplyDelete