रात्री बाराची वेळ, एरवी किर्रर्र शांतता असणारा क्षण, मात्र हा दिवस वेगळंच काहीतरी मनात घेऊन आला होता. बाहेर धुवाधार पाऊस, आत कारागृहात बंदिवान होते देवकी आणि वसुदेव. या कारागृहातच इलुशा देवकीनंदनचा जन्म झाला नि अवघं जग कृष्णमय झालं. कृष्ण आणि त्याचं कार्य दुनियेला ठाऊक आहे. त्याच्या चातुर्याचे, शांत प्रवृत्तीचे, कर्माचे दाखले जगभर दिले जातात. या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी ज्याला कृष्णाने मात्र महत्त्व दिलं नाही ती म्हणजे त्याचं जन्मस्थळ. गंमत अशी की खरंतर कारागृहात याचा जन्म झाला, पण म्हणून ती जागा हे त्याचं भवितव्य ठरलं नाही. कृष्णाने त्याचं भवितव्य स्वतः घडवलं. नशिबाला दोष देत त्याने आयुष्याच्या गाडीला अडसर आणला नाही.
परिस्थिती प्रत्येकाची निराळी असते. काही व्यक्ती सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येतात पण म्हणून ते सर्वस्व प्राप्त करतीलच असं नाही. काही जण शून्यातून विश्व उभं करण्याची चुणूक आणि धमक दाखवतात. काही जण सर्व असूनही उतमात न करता आपलं काम करत राहतात. काही जण असलेल्या गोष्टी स्वतःच्याच कर्माने घालवतात.
या सगळ्यात एक समान दुवा असा की हे जे सर्व घडतं ते 'कर्माने' घडतं. कर्म या गोष्टीला पाठिंबा द्यायला कृष्णासारखा पाठीराखा नाही. कृष्णमय होताना हे जाणवतं की आपण कुठे जन्माला आलो या पेक्षा आपण जगाचा निरोप घेताना या दुनियेला काय देऊन गेलो किंवा काय कर्म करून गेलो हे महत्त्वाचं. कारण कर्म ही गोष्ट आपल्या हातातली आहे. जन्म कुठे, कसा आणि कधी होईल हे हातात नाही. मृत्यू वर माणसाचं नियंत्रण नाही. हे दोन्ही निसर्गदत्त. मधला प्रवास निसर्ग आणि दत्त शोधण्याचा. कसा? तर कर्म करत. कर्म आणि कष्ट यांना अनन्यसाधारण महत्त्व देणाऱ्या कृष्णाने तर फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करा असं सांगितलं. अवघड परिस्थितीतून मार्ग काढताना सुद्धा दुसऱ्यावर नुसतं विसंबून राहून गोष्टी आपोआप घडत नाहीत. स्वतः कष्ट करावे लागतात. कार्यरत राहणं गरजेचं असतं.
माणसाचं एकदम त्राण निघून जातं. वाटतं, आता काही जमणार नाही. पण थोडं थांबून पुन्हा प्रयत्नशील राहणं आपल्याला यशाकडे नेतं.
करत राहणाऱ्याला नशीब सुद्धा साथ देतं असं म्हणतात. पण रडत बसून, नशिबाला दोष देत घडत काही नाही. मनगटात ताकद नसेल तर मिळवावी. मिळवली की मग तिचा सदुपयोग करत कर्म करत राहावं. बसल्याजागी सहजा सहजी कोणालाच काही मिळत नाही, मिळालंच तरी ते टिकत नाही. कष्टाने मिळवलेलं चाखायला सुद्धा मजा येते.
आपण आत्ता या क्षणी कुठे आहोत यावरून आपण कोण आहोत हे ठरत नाही. आपण कुठे पोहोचण्याचा विचार करतो आणि त्या दृष्टीने पावलं उचलतो ते खरे आपण!
वरुण भागवत

कर्मयोग गीतेचा तिसरा अध्याय बरोबर सांगितलंस
ReplyDeleteधन्यवाद!
Delete👌👌👌👍
ReplyDelete