दिनेश तणतणत घरातून बाहेर आला. त्याचा भाऊ जयेश जवळजवळ त्याला जबरदस्तीच बाहेर घेऊन आला होता. अजूनही दिनेशचा राग काही शांत होत नव्हता.
"अती होतंय हे!" दिनेश तिरिमिरीत म्हणाला."काहीच अती झालं नाहीये."
"अरे काय आहे हे? आत्ता वाटलं होतं की माझा पोरगा आता हाताशी आला आहे. पण ह्याला कशाची फिकीरच नाही."
"आज असं काय झालं की तू इतका भडकलास?"
"अरे पोरीसोबत पाहिलं मी ह्याला."
जयेश म्हणाला, "एवढंच ना?"
"एवढंच काय?"
"आपण नाही केलं का त्याच्या वयात असताना सगळं?"
"हो केलं पण..."
"ऐक... मला कळतंय की या सोबतच त्याला परिस्थितीची जाणीव असावी."
"कळतंय ना?"
"अर्थात!"
"मग मला आत्ता काहीच का बोलू दिलं नाहीस?"
"आत्ता पाणी फार गढूळ झालंय रे. नंतर बोलू त्याला आपण."
"कसलं पाणी जयेश दादा?"
"चल जरा एक चक्कर मारून येऊ."
दोघे शांत रस्त्यावर पायीच फेरी मारत होते.
थोडा वेळ कोणीच काही बोललं नाही. दिनेश स्वतःहूनच काहीतरी आठवत म्हणाला, "दादा, मगाशी काय म्हणत होतास पाणी गढूळ आहे."
जयेश हसत म्हणाला, "अरे ती गौतम बुद्धांची गोष्ट आठवली."
"सांग ना."
"अरे मध्ये वाचनात आली. जशीच्या तशी आठवत नाहीये."
"तुला आठवेल तशी सांग."
जयेश सांगू लागला, "एकदा गौतम बुद्ध आपल्या शिष्यासोबत जात होते. त्यांना तहान लागली. ते आपल्या शिष्याला म्हणाले की मागे काही अंतरावर आपल्याला ओढा लागला. त्याचं थोडं पाणी घेऊन ये. पुढे म्हणाले की फार स्वच्छ पाणी होतं नाही त्याचं? होय होय असं म्हणत शिष्य धावतच गेला. जाताना स्वच्छ दिसणारं ओढ्याचं पाणी आत्ता मात्र गढूळ झालं होतं. जवळच्या शेतातले बैल तिथून जोरात धावत गेल्याने पालापाचोळा, माती पाण्यात मिसळून सगळं पाणी गढूळ झालं होतं. शिष्य परतला आणि त्याने हकीकत ऐकवली. पुढे जाऊन त्याने हे ही सुचवलं की इथून पुढे जवळ नदी आहे तिथे पाणी पिऊ. गौतम बुद्ध म्हणाले की त्यांना इथलंच अर्थात ओढ्याचंच पाणी हवं आहे. नाईलाजाने शिष्य परत गेला. या सगळ्यात थोडा वेळ गेल्याने पाणी पुन्हा शांत आणि वाहतं झालं होतं. पालापाचोळा नव्हता, माती खाली बसली होती. तळ दिसत होता. पाणी स्वच्छ होतं." दिनेशच्या हावभावांचा अंदाज घेत जयेश पुढे म्हणाला, "कारण थोडा वेळ गेल्याने सगळं निवळलं होतं."
दिनेश काही बोलला नाही.
जयेश संधी साधत म्हणाला, "चला, आता परत जायला हरकत नाही. चांगला ओरडा दिला पाहिजे तुझ्या पोराला! काय म्हणतोस? मीच ओरडतो त्याला."
समजायचं ते समजत दिनेश म्हणाला, "कसलं काय दादा, आता निवळलं सगळं."
"म्हणूनच परत जायचं, कारण आता संवादसुद्धा विशुद्ध होईल, त्या पाण्यासारखा! आता वाद नसेल, तू त्याला समजावण्याचा आणि त्याने समजून घेण्याचा एक प्रयत्न असेल. तुम्ही दोघे एकमेकांना समजून घ्याल अशी परिस्थिती असेल. अरे त्याने मुलीसोबत फिरणं यात गैर काही नाही; हां पण जोडीला जबाबदारीने पण वागावं ही तुझी अपेक्षाही गैर नाही."
"दादा, कसं जमवतोस हे?"
"त्यात काय आहे? जरा निवळू देत जा. तुम्ही दोघेच आहात एकमेकांसाठी! इतकंही कोणाचं चुकलेलं नसतं रे.. "
"हं."
"हं नाही.. चल."
"चला."
"राग आल्यावर थांबत जा. त्या क्षणी सगळं गढूळ असतं बघ. एकदा निवळलं की एकमेकांच्या मनाचा पण तळ शोधता येईल इतकं स्वच्छ होऊन जातं चित्र!"
- वरुण भागवत
सत्य परिस्थिती
ReplyDeleteसत्य परिस्थिती
ReplyDelete