![]() |
| A click by: Varun Bhagwat |
आपल्याला कामात अडचणी येतात. त्या कायमच येत राहणार आहेत. पण आपण प्रयत्न सोडून द्यायचे नाहीत. काहीतरी उपाय काढत राहायचे. शोधायचं. गरज शोधाची जननी असते ही गोष्ट अगदी खरी आहे. पटकन आपण संतापतो, वैतागून जातो.. नेहमीची रड सुरू होते की माझ्याच बाबतीत का?? पण खरं तर असे अनेक 'मी' असतात ज्यांच्या बाबतीत असं काही ना काही होत असतं. अडचण येत राहते. आपण ते हाताळतो कसं हे आपलं कसब! यावर त्याचं यशापयश, परिणाम वगैरे ठरतात.
सचिन तेंडुलकर सारखा माणूस, वर्ल्ड बेस्ट क्रिकेटर सुद्धा या अडचणींच्या सत्रातून सुटला नाही. एकदा भारताची ऑस्ट्रेलिया सोबत एक सीरिज चालू होती. त्या काळात सचिन ऑफ साईड चे शॉट्स खेळताना बऱ्याचदा आउट झाला होता. सचिन अर्थातच या अडचणीवर उपाय शोधत होता. त्याने जो रामबाण उपाय शोधला, त्याने ऑस्ट्रेलिया चे खेळाडू चक्रावून गेले.
ती टेस्ट मॅच होती. वेळ हाताशी होता. वेगळं काहीतरी करून बघणं शक्य होतं. ऑफ साईड चे शॉट्स खेळताना आपण आउट होतोय हे तो जाणून होता. त्या इंनिंग्ज मध्ये त्याने ठरवून ऑफ च्या खूप बाहेरचे बॉल संयमाने सोडून दिले. बाकी सगळे बॉल्स तो लेग साईड ला खेळला. ऑफ साईड चे सुद्धा काही चेंडू त्याने लेग साईडला वळवले.
किती संयम लागला असेल? पण डट के खडे रहना है इतकंच त्याला माहित... म्हणून तो संयमाने अडचणींना तोंड देत थांबला. सचिनने त्या इंनींग्जमध्ये नाबाद २४१ धावा केल्या.
संयम बाळगला तर अशक्य असं काहीच नसतं हे सांगणारं उत्तम उदाहरण म्हणजे सचिन रमेश तेंडुलकर!!
संयम विकसित करण्यासाठी संयमाचीच गरज असते. संयमाने संयम वाढतो.
संयमाने वागलं तर फार अवघड गोष्टी साध्य करता येऊ शकतात.
'डट के खडे रहना है' असं एकदा ठरवलं की मग जमतं!
- वरुण भागवत

Comments
Post a Comment