अमोल घरी होता. अमोलचे वडील पुस्तक वाचत बसले
होते. अमोलचा एकूणच mood काही ठीक दिसत नव्हता. बाबांना ते जाणवत होतं.
“बेटा”
“हां बाबा..”
“All well?”
“हं...”
“नक्की?”
“हो... असं का विचारताय?”
“सहजच.”
“हं.”
बाबा पुन्हा पुस्तक वाचण्यात मग्न झाले.
अमोलला राहवेना.
“बाबा”
“काय रे?”
“आज संजय भेटला.”
“तुझा शाळेतला मित्र?”
“हो.”
“मग तू तर खुश व्हायला हवं.”
“कसलं काय?”
“का रे?”
“त्याचं वागणं बोलणं फार छान नाही वाटलं.
त्यामानाने अगदी लवकर त्याने त्याच्या क्षेत्रात प्रगती केल्याने असेल कदाचित असं
वागणं.”
“इतका लवकर तो वरच्या पदावर पोचलाय तर मग तर
त्याने खूप नम्र असलं पाहिजे.”
“पण it’s exactly opposite.”
“Oh.. ते ठीके पण त्याची प्रगती झाली आहे तर
तू का उदास होतोयस?”
“त्याच्या प्रगतीमुळे नाही हो. पण तो बाकीच्यांना
आणि अगदी त्याच्या मित्रांना असं कमी लेखतोय त्याचं वाईट वाटतंय. आजच्या भेटीत
स्वतःचीच टिमकी बडवत होता, ते ही मी आणि प्रीतम होतो, तर आम्हाला कमी लेखून.”
“आयुष्य आणि त्यातले चढउतार त्याने नाही
बघितले अजून. तू नको दु:खी होऊस. एक दिवस येईल त्याचं डोकं ठिकाणावर. आयुष्यच धडा
शिकवतं अशा परिस्थितीत.”
“म्हणजे?”
“म्हणजे त्या घोडा आणि गाढवासारखं. एकदा एक
गाढव चाललं होतं. त्याच्या पाठीवर ओझं होतं, जशी तुझ्या पाठीवर जबाबदारी आहे.”
“म्हणजे मी गाढव?”
“तसं नाही. तुला relate करायला सोपं जावं
म्हणून रे आणि गाढव असण्यात वाईट काय आहे?” बाबा मस्करी करत म्हणाले. “हां, तर
रस्त्यात घोडा भेटला, मोठ्या तोऱ्यात त्याला धक्का मारून निघून गेला, तुझा मित्र संजय
जसा वागला अगदी त्याच्या सारखा! गाढवाला वाईट वाटलं.”
“गाढव काही बोललं?”
“नाही.”
“काही दिवसांनी त्यांची पुन्हा भेट झाली. आज
गाढव थोडं relax होतं. तर समोरून तोच घोडा जाताना दिसला. आज त्याच्या पाठीवर ओझं
होतं. गाढवाला मस्त chance मिळाला होता बोलायचा.”
“मग?”
“पण ना ते काही बोललं नाही. त्याने उलट
घोड्याची मदत केली.”
“हे अती झालं.”
“तू पण अती कर असं म्हणत नाहीये मी. पण ना
त्या गाढवाला माहित होतं प्रत्येकाचे दिवस येतात. अशावेळी एकमेकांना चिडवण्यात,
खिजवण्यात, कमी लेखण्यात वेळ घालवण्यापेक्षा एकमेका सहाय्य केलं तर जास्त सोपं
होतं. तुला काय वाटतं?”
“हा चांगुलपणाचा अतिरेक झाला.”
“हाहा... पण बघ, आहे की नाही गाढव चांगलं.
आपण त्याला उगाच बदनाम केलंय. लक्षात ठेव, प्रत्येकाच्या पाठीवर प्रत्यक्ष
अप्रत्यक्षरित्या ओझं असतं. दिवस सुद्धा प्रत्येकाचे येतात. त्यामुळे भविष्यात तू
वरचढ ठरलास तर त्याला मदत करायची अथवा नाही करायची हे तू ठरव. पण त्याला कमी लेखू
नकोस. कारण त्याच्यावर सुद्धा जी परिस्थिती ओढवली असेल त्याला काही ना काही कारण
असेल. दिवस प्रत्येकाचे येतात.”
- वरुण भागवत


Yes...
ReplyDeleteGood example...
🙋👌👌👍
Thank you!! 😊
Delete