![]() |
| A click by: Sushil Ladkat |
Guest
Lecturer म्हणून आज शाळेमध्ये ‘अक्षर’ नावाचा लेखक आला होता. तो वर्गात गोष्ट
सांगत होता, “श्याम अगदी लहान होता. आईने श्यामला अंघोळ घातली. अंघोळ घातल्यानंतर
आई त्याचे अंग पुसत होती. श्याम आईला म्हणाला, "आई, माझे पायाचे तळवे ओले
आहेत. ते पुसून दे नाहीतर त्याला माती लागेल आणि ते घाण होतील.” आई त्या वेळी काहीच
बोलली नाही. तिने त्याचे तळवे पुसून दिले, पण त्यानंतर जे वाक्य ती
म्हणाली ते
माझ्या काय, ज्यांनी
ज्यांनी श्यामची आई हे पुस्तक वाचलं आहे किंवा श्यामची आई हा चित्रपट बघितला आहे
त्यांच्या डोक्यातून, खरंतर
मनातून, हो मनातून कधीच जाणार नाही. कारण वाक्यच काहीसं तसं होतं.
तळवे
पुसून झाल्यावर आई श्यामला म्हणाली, "पायाला घाण लागू नये
म्हणून काळजी घेतोस तसाच 'मनाला' घाण लागू नये म्हणून
पण काळजी घे हो." किती सहज म्हणून गेलेलं पण केवढं महत्त्वाचं वाक्य आहे.
'श्यामची
आई' अर्थात साने गुरुजींची आई ही कित्येक आयांचं
प्रतिनिधित्व करते असं म्हणायला हरकत नाही. आई साध्या गोष्टी सांगता सांगता किती
सहज केवढं मोठं तत्त्वज्ञान सांगून जाते. किती गोष्टी अनेकदा न बोलता, कधी बोलून, कधी ओरडून, कधी गोड
बोलून तर कधी दटावून सांगून जाते.”
Lecture संपलं. अक्षर जाऊ लागला.
शाळेतला एक विद्यार्थी staff room पर्यंत त्याच्या मागे मागे जात होता. अक्षरला
चाहूल लागली की कोणीतरी आपल्या मागे येतंय.
तो थबकला. त्याने वळून पाहिलं तर
थोडासा बुजरा मुलगा हातात वही आणि पेन घेऊन उभा होता. अक्षरने खुणेनेच काय म्हणून
विचारलं?
तो मुलगा बोलू लागला, “सर, तुम्ही
आईबद्दल जे लिहिलं आहे, ते मध्ये एकदा तुम्ही आलात तेव्हा ऐकवलं होतं. त्यातला
थोडा भाग तुमच्या तोंडून परत ऐकायला आवडेल.”
“अरे, ते मी...” अक्षर आढेवेढे
घेऊ लागलाय हे कळताच मुलगा थोडा हिरमुसला. तोच हा संवाद ऐकणारे पवार सर अक्षरला
म्हणाले, “अक्षरजी, please ऐकवा.”
अक्षर घाईत होता पण सर असं
म्हणल्यावर तो बोलू लागला,
“मी रडल्यावर आई मला
हसली होती असं ताईने नकळत्या वयात सांगितलं तेव्हा बालसुलभ राग आला होता.
मोठं झाल्यावर कळलं की माझ्या रडण्यावर आई आजपर्यंत एकदाच हसली
आणि ते हसू मी जन्माला आल्याच्या आनंदाचं होतं.
मग अगदी कुशीत घेऊन झोपवलं.. कौतुकाने गालावरून हात फिरवला नि
चुकल्यावर तोच गाल रंगवला सुद्धा!
त्या गोंजारण्याची आणि रंगवण्याची मजा नि किंमत आता कळतीये.
माझ्या यशात हक्काने स्वतःचं यश शोधत नाचली पण अपयशात
माझ्यासोबत न रडता मला प्रोत्साहन देत माझ्या सोबत उभी राहिली. अपयश आल्याशिवाय
यशाची मजा कशी कळणार? हे एक वाक्य पुरेसं होतं.
ते म्हणतात ना , "a blessing in disguise" अर्थात वाईटातून चांगलं बघायला शिकवलं.
बघण्यावरून आठवलं, आईने जग बघायला शिकवलं.
धडपडायला (धड पडायला) शिकवलं.
आई कशी असते?
माझ्यासाठी हसते।
माझ्यासाठी रडते।
माझ्यासाठी करते।
माझ्यासाठी झुरते।
सुरवातीला माझ्यासाठी तिच सगळं जग असते।
मग मी मोठा होतो नि ती तिचं जग माझ्यात शोधते।
माझ्या यशाचा सर्वोच्च क्षण पाहायला ती तिथे असते पण तिला तो बघता येत
नाही.
कारण डोळे भरून आणि भरल्या डोळ्यांनी एकाच वेळी कोणती गोष्ट
पाहता येत नाही.
हे सगळं खरं तर सांगायची गरज नाही.
पण कृतज्ञता व्यक्त केल्याशिवाय राहवत नाही.
कुठून येते इतकी माया..?
कुठून येतो इतका त्याग?
कुठून येतं इतकं प्रेम?
कुठून येते इतकी करुणा?
हे प्रश्न जितके सहज पडतात तितकी उत्तरं सहज मिळत नाहीत.
कारण आईचं आईपण काय असतं हे आई झाल्याशिवाय आईशप्पथ समजत नाही.”
अक्षर थांबला. त्या विद्यार्थ्याने टाळ्या
पिटल्या. डोळ्यांत चमक होती, तो thank you म्हणून जाऊ लागला. अक्षरला गंमत वाटली.
तो पवार सरांना म्हणाला, “सर हा?”
सर सांगू लागले, “हा अर्पण. तुम्ही घाईत
होतात तरी त्याला हे म्हणून दाखवलं त्याबद्दल धन्यवाद.”
“सर आभार कसले मानताय?”
“तसं नाही. मागच्या वेळेला पण याने हाच भाग
तुम्हाला म्हणून दाखवायला लावला होता आणि आजही पुन्हा तेच. तुम्हाला कदाचित वाटेल
की हे काय असं? पण खरी गोष्ट अशी की आईबद्दल जिथे जिथे, जसं जसं आणि जे जे ऐकायला
मिळेल ते तो ऐकतो आणि त्याच्या वहीत नोंदवून ठेवतो.”
“असं का?”
“कारण त्याला आई नाही. अक्षरजी, कसंय, आईची
सर्वात जास्त किंमत ती नसल्याशिवाय कळत नाही. मागच्या वेळी जेव्हा त्याने तुमच्या
या कवितेत रस घेतला होता त्याच वेळी त्याला आई नाही ही history मला समजली. हे
समजलं तेव्हा मी त्याला घरी नेलं होतं आणि माझ्या आईची..”
तोच धावत धावत अर्पण आला. पवार सरांना
म्हणाला, “सर तुम्ही मागच्या वेळी मला घरी नेलं आणि आईसोबत पूर्ण दिवस घालवू दिलात.
मी मुद्दाम तुमची आई म्हणालो नाही, कारण त्या एक दिवसाच्या सहवासात ती माझी आई
झाली आणि तुम्हीही मला दोस्त म्हणालात. म्हणून मी अक्षर सरांना त्यांचा लेख/ कविता
पुन्हा ऐकवायला लावली कारण त्यात मला थोडं add करायचं आहे.”
“काय?”
“ती जेव्हा आई होते तेव्हा माझ्यासोबत
माझ्या मित्रांचीही आई होते आणि फक्त आपल्या पोटी जन्माला आला म्हणून प्रेम करायचं
हे विधान चुकीचं ठरवते. कारण आई फक्त प्रेम जाणते.”
अर्पण हे वाक्य बोलून दोघांना thank you
म्हणून निघूनही गेला होता. सर आणि अक्षर नि:शब्द होते.
- - वरुण भागवत

निःशब्द
ReplyDeleteखूप छान 👌👌👌👍
ReplyDelete