Skip to main content

राजा...

A Click by: Varun Bhagwat


आटपाट नगरात राजेशाही असून सुद्धा ठराविक कालावधीनंतर राजा निवडण्याची मुभा प्रजेला असे. इथे नव्या राजाच्या निवडीवरून जोरदार चर्चा चालू होती. प्रत्येक जण राजा कोण असला पाहिजे यावर आपापलं मत मांडत होता. प्रत्येकाला असं वाटत होतं की आपला राजा आपण म्हणू तोच असला पाहिजे. या वेळी चर्चेचा भर या गोष्टीवर होता की बाहेरचा राजा असला पाहिजे. आपला राजा कामाचा नाही.


तिथे त्या सगळ्यांपासून बाजूला एक वयस्कर व्यक्ती बसली होती. त्या व्यक्तीला या चर्चेत विशेष रस नाही असं आनंदला वाटलं. १८ वर्षांचा आनंद  या सगळ्या चर्चेत सहभागी व्हायच्या प्रयत्नात होता पण राजा कोण असावा याविषयी त्याला मत व्यक्त करता येत नव्हतं. त्याचं लक्ष त्या व्यक्तीकडे गेलं. तो त्यांच्याजवळ जाऊन बसला. वयस्कर माणसाला जाणवत होतं की याला आपल्याशी संवाद साधायचा आहे पण काय बोलावं कळत नाहीये.

म्हणून त्याने स्वतःच विषय काढत विचारलं, "तुला कसा राजा हवा?" अचानक आलेल्या प्रश्नाने गोंधळत आनंद उत्तरला, "अं... कळत नाहीये मला. तुम्हाला कोणता हवा आहे राजा आजोबा? बाहेरचा राजा असावा की नसावा या बद्दल तुमचं काय मतआहे?" यावर ते आजोबा म्हणाले, "मला राजा कोणता हवा यापेक्षा राजा कसा हवा आहे आणि कसा राजा नको आहे हे  समजून घेणं अजून जास्त महत्त्वाचं आहे."
"हे काहीतरी वेगळं आहे." आनंद उत्सुकतेने म्हणाला.
"वेगळं कसं?" आजोबांनी प्रतिप्रश्न केला.
"शक्यतो काय हवं आहे हे महत्त्वाचं असतं. काय नको हे शोधणं तुम्हाला का महत्त्वाचं वाटतं?" आनंदने उत्तराच्या अपेक्षेने विचारलं.
आजोबा म्हणाले, "की काय नको आहे हे कळलं की काय हवं आहे हे समजणं आणि शोधणं जास्त सोपं होऊन जातं."
"मला समजून सांगा."

आकाशात कबुतरांचा थवा विहार करत होता. फार विहंगम दृश्य होतं. ते पाहून आजोबा म्हणाले, "तुला माहितीये एक कबुतरांचा थवा असाच आकाशात विहार करत होता. त्यांना त्यांच्या जीवाची सध्या फार भीती वाटत होती कारण कोणीतरी त्यांच्या मागावर आहे हे त्यांना जाणवलं होतं. भीत भीत जगण्याचा त्यांना कंटाळा आला होता. त्यांनीही इथे चर्चा करतायत तशी चर्चा केली आणि बाहेरचा राजा असावा यावर त्यांचं एकमत झालं. पण तो कसा असावा यावर कोणीच काही बोललं नाही. कबुतरांचा राजा त्यांना सांगत होता की घाबरू नका. भीती या जगात प्रत्येकच जीवाला वाटत असते. पण म्हणून बाहेरचा राजा करू नका. पण त्यांनी आपल्या या राजालाच हद्दपार केलं.

एक गरुड यावर लक्ष ठेवून होता. त्याने संधी साधली.तो त्यांना म्हणाला, "काय तुमचं जगणं? जरा काही झालं की घाबरता आणि खुराड्यात जाता. जरा खुलून जगा. मी तुमचा राजा होईन. मी तुम्हाला इतर सर्वांपासून वाचवेन." कबुतरं हे ऐकून खुश झाली. त्यांनी तडकाफडकी निर्णय घेत, पुढचा-मागचा विचार न करता गरुडाला आपला राजा बनवलं."
"यात काय विचार करायचा? तो त्यांना संरक्षण देणार होता." आनंद तोडत म्हणाला.
आजोबा हसत पुढे सांगू लागले, "गरुड म्हणाला की मी तुमचं इतरांपासून रक्षण करेन. त्याच्यापासून कबुतरांना कोण वाचवणार?"
"म्हणजे?"
"म्हणजे राजा होताच त्याने आज्ञा केली की रोज एक कबुतर मला मेजवानी म्हणून मिळालं पाहिजे."
आनंद म्हणाला, "बाप रे.. म्हणजे बाहेरचा राजा नसला पाहिजे."
आजोबा म्हणाले, "मी पुन्हा तेच म्हणेन की कोण असावा हे महत्त्वाचं नाही, तो कसा असावा हे महत्त्वाचं आहे. राजा बाहेरचा किंवा आतला, कुठला का असेना तो कसा हवा??”
आनंद पटकन म्हणून गेला, "प्रजेचं रक्षण करण्यास तत्पर असावा!"

आजोबा हसले. त्याची पाठ थोपटत जाऊ लागले. आनंदपाशी त्याचा वयाने थोडा मोठा असणारा मित्र राम येऊन बसला.
आनंद म्हणाला, "खूपच हुशार आणि मनाने चांगले वाटले ते आजोबा!"
राम आश्चर्यचकित होत म्हणाला, "आजोबा??? हा माणूस कोण आहे माहितीये?"
"कोण?"
"काही वर्षांपूर्वी इथल्याच जनतेने गैरसमजातुन ज्याला हद्दपार केलं तो राजा सुमंत!"

- वरुण भागवत

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Late झाला तर...

समीर नी चिडचिड करतच गाडीला किक मारली. पहिल्या किकला स्टार्ट होणारी गाडी आज चार किका मारून सुद्धा स्टार्ट होत नव्हती. अखेर पाचव्या किकला गाडी सुरू झाली. गाडी सुरू झाल्यानंतर त्याचा राग त्याने Accelerator वर पिळ देत काढला. Accelerator खूप जास्त प्रमाणात पिळत त्याने गाडी idle च ठेवली. त्यानी गाडी इतकी raise केली की शेजारच्या पाटील काकू काचेची खिडकी उघडून डोकावून पाहू लागल्या. त्या बघताच तो थोडासा embarrassed झाला. समीर त्यांच्याकडे बघून कसंनुसं हसला. गाडीचा कधीच इतका मोठा आवाज न करणारा समीर आज थोडं वेगळंच वागताना पाहून समोरच्या शेलार काकूंना आश्चर्य वाटलं होतं. मिस्टर शेलार सुद्धा पूजा करत करत खिडकीतून डोकावून पाहू लागले. आता मात्र समीरने पटकन नजर चोरत gear टाकत तिथून पळ काढला. वर्षा मावशींची गडबड चालू होती. त्यांना काहीही करून त्यांची बस गाठायची होती. कारखान्यात वेळेवर पोहोचणं भाग होतं. पतीच्या निधनानंतर गेली दहा वर्ष, घरापासून ८ किलोमिटर अंतरावर असणाऱ्या कारखान्यात त्या कामाला होत्या. त्यांनी हे काम करून मुलालाही मोठ्या कष्टाने वाढवलं होतं. आता मुलगा कॉलेजमध्ये होता आणि  कॉलेजच्याच ...

Parking आणि त्या तिघी!

  ईशा किराणामालाच्या दुकानातून दोन जड पिशव्या तिच्या नाजूक हातात घेऊन आपल्या two wheeler पाशी पोहोचली. तिथे गेल्या गेल्या तिला दिसलं की तिच्या गाडीच्या दोन्ही बाजूंना चिकटून दोन गाड्या लावल्या आहेत. आणि या तीनही गाड्या side stand वर आहेत. बाकीच्यांनी गाड्या side stand वर लावण्याचं कारण म्हणजे mostly आळस किंवा parking मध्ये दुसऱ्याची गाडी काढायला लावायला अवघड जाईल यांचं भान नसणे. ईशाने side stand वर लावण्याचं कारण आळस नव्हतं, तिला भान होतं; पण तिच्या नाजूक बांध्याला गाडी double stand वर लावणं म्हणजे कमरेची वाट लावून घेण्यासारखं होतं. त्यामुळे ती गाडी side stand वर लावायची. त्यामुळे गाडी काढताना अडचण होणं हा आजचा problem नव्हता. पण नेहमी कोणी ना कोणी सहाय्यास येई. आज मात्र गाडी main road पासून आत साधारण ५०० मीटर अंतरावर असणाऱ्या गल्लीत, उजवीकडे वळून अजून पुढे १०० मीटरवर असणाऱ्या किराणा दुकानासमोर होती. दुपारचा १ वाजला होता. Grocery shop मध्ये सकाळच्या सत्रातली ईशाच शेवटची customer होती. तिने सामान भरताच Shutter down करून ईशा गाडीजवळ येईपर्यंत भरत भाई निघून गेला. गल्ली, दुपारी १ ची व...

मनातल्या एकलव्याची भरारी...

  A click by : Varun Bhagwat  "हातात घेतलेली रेती किती सहज सुटते. आपण पकडून ठेवलीय असं वाटतं. आपला त्यावर ताबा आहे असं वाटतं पण..." "पण ती निघून जाते. असंच ना?" "हो, जशी माझी नोकरी गेली तशीच. शाश्वतीच नाही राहिली कसली." "हं..." "मी किती कष्ट घेतले. रोज नवीन काहीतरी शोधू पाहत होतो, शिकत होतो. पण असा तडकाफडकी निर्णय घेऊन मला काढून टाकलं. कुठे चुकलं माझं?" "तू मर्जीतील माणूस नव्हतास." "काय?" "खूप स्पष्ट बोलतोय मी. पण हेच सत्य आहे." "पण म्हणजे काय?" "खूप explain करावं लागेल. "मग कर." "वेळ आहे?" "नोकरी गेल्यावर वेळच वेळ असतो." "बरं. मग ऐक. द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडवांचे गुरू. अर्जुन तर त्यांचा लाडका शिष्य. त्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवण्याचं वचन त्यांनी त्याला दिलं होतं. एकदा गुरू द्रोणाचार्य त्यांच्या साऱ्या शिष्यांसवे अरण्यात गेले होते. एक कुत्रा खूप वेळ भुंकत होता. मात्र काही काळाने तो शांत झाला. कोणाला कळेना की हा अचानक कसा काय इतका शांत झाला? जिथून त्या ...