मित्रासोबत बाईकवरून चाललो होतो. सिग्नलला गाडी थांबली. आमच्यासोबत अनेक गाड्या थांबल्या. सिग्नलची ती २ मिनिटं नुसतंच थांबणं हा एक कार्यक्रमच असतो. नजर इकडे तिकडे वळत राहिली. तोच एका बाईकवर एक कुटुंब दिसलं. मित्र फोटोग्राफर असल्याने मित्राचा कॅमेरा लगेच फोटो काढायला पुढे सरसावला. त्याने लगेच फोटो दाखवला सुद्धा आणि म्हणाला, जरा ही प्रतिमा (हा फोटो) निरनिराळया दृष्टिकोनातून पाहू.
![]() |
| A click by: Sushil Ladkat |
मग विचारचक्र धावू लागलं. अनेकविध दृष्टिकोनातून ती प्रतिमा पाहू लागलो. मग निरनिराळी निरीक्षणं टिपली ती अशी:
१. म्हटलं तर एक सुखी कुटुंब
२. कदाचित एका दुचाकी वरती ३ जण म्हणजे अडचण!
३. त्या मुलामध्ये अनेक जण स्वतः चं बालपण शोधू शकतात. लहानपणी असे पुढे उभे राहणारे आपण, आपल्यासाठी ती तडजोड नव्हती तर पुढे उभं राहणं हा विजय होता.
४. त्या दोघांचे आविर्भाव असे की लगबग आणि वर्दळ असली तरी ती रोजचीच आहे.
५. ती इकडे पाहते आहे आणि तो तिकडे! आयुष्य दोघांना वेगवेगळ्या वाटांनी नेऊ पाहतं आहे. पण त्यांना जोडणारं अपत्य त्यांना थांबवत आहे.
६. कदाचित मुलगा आता थोडा मोठा होतोय आणि असं पुढं उभं राहणं त्याला नको वाटतंय.
७. कदाचित दोघे रोजच्या कार्यक्रमांना कंटाळून मुलाला घेऊन कुठेतरी सहलीला निघालेत.
८. कदाचित दोघे दोन बाजूला भविष्यात हवी असणारी आपापल्या आवडीची ४ चाकी शोधत आहेत.
९. कदाचित नवी बाईक घेऊनच तिघे बाहेर पडलेत. बाईक असणं हीच मोठी गोष्ट आहे. आपल्याकडे आणि आपल्या नव्या वाहनाकडे कोणी पाहत आहे का हे पाहण्यासाठी तिघे तीन दिशांना बघत आहेत.
१०. कदाचित कोणतं तरी संकट त्यांच्या जवळच्या माणसांवर आलं आहे; हे तिघे पटकन त्यांच्या मदतीसाठी जात आहेत.
११. कदाचित तिघे शरीराने सोबत आहेत पण मनाने दूर आहेत.
१२. कदाचित एरवी आपापला वेळ मिळत नाही म्हणून जाणूनबुजून तिघे आपापल्या विचारात गुंग आहेत.
१३. कदाचित तिघांसाठीही हे शहर नवीन आहे, त्यामुळे तिघांना काय बघू काय नको असं झालंय. त्यामुळे तिघे तीन दिशा न्याहाळत आहेत.
१४. दिवस मोठा कामात गेलाय. तिघे आता शांतपणे घरी परतत आहेत.
तेवढ्यात सिग्नल सुटला. विचारांची तंद्री भंगली. या सगळ्या विचारांपेक्षा एक नवा नि अगदी साधा विचार स्पर्शून गेला की,
१५. कदाचित हे सगळे जण आहे त्यात समाधानी आहेत नि हा सगळा फक्त माझ्या दृष्टिकोनाचा भाग आहे.
- वरुण भागवत

Beautiful! So lovely to read so many perspectives!
ReplyDeleteWaa👌
ReplyDeleteHa khupcha abhyas hotoy, varun...
ReplyDelete🙋🙂☺🍫🌹