![]() |
| A Click by: Varun Bhagwat |
आटपाट नगरात राजेशाही असून सुद्धा ठराविक कालावधीनंतर राजा निवडण्याची मुभा प्रजेला असे. इथे नव्या राजाच्या निवडीवरून जोरदार चर्चा चालू होती. प्रत्येक जण राजा कोण असला पाहिजे यावर आपापलं मत मांडत होता. प्रत्येकाला असं वाटत होतं की आपला राजा आपण म्हणू तोच असला पाहिजे. या वेळी चर्चेचा भर या गोष्टीवर होता की बाहेरचा राजा असला पाहिजे. आपला राजा कामाचा नाही.
तिथे त्या सगळ्यांपासून बाजूला एक
वयस्कर व्यक्ती बसली होती. त्या व्यक्तीला या चर्चेत विशेष रस नाही असं आनंदला
वाटलं. १८ वर्षांचा आनंद या सगळ्या चर्चेत सहभागी व्हायच्या
प्रयत्नात होता पण राजा कोण असावा याविषयी त्याला मत व्यक्त करता येत नव्हतं.
त्याचं लक्ष त्या व्यक्तीकडे गेलं. तो त्यांच्याजवळ जाऊन बसला. वयस्कर माणसाला
जाणवत होतं की याला आपल्याशी संवाद साधायचा आहे पण काय बोलावं कळत नाहीये.
म्हणून त्याने
स्वतःच विषय काढत विचारलं, "तुला कसा राजा हवा?" अचानक आलेल्या प्रश्नाने गोंधळत आनंद उत्तरला, "अं... कळत नाहीये मला. तुम्हाला कोणता हवा आहे राजा आजोबा? बाहेरचा राजा असावा की नसावा या बद्दल तुमचं काय मतआहे?" यावर ते आजोबा म्हणाले, "मला राजा कोणता हवा
यापेक्षा राजा कसा हवा आहे आणि कसा राजा नको आहे हे समजून घेणं अजून
जास्त महत्त्वाचं आहे."
"हे काहीतरी वेगळं आहे." आनंद
उत्सुकतेने म्हणाला.
"वेगळं कसं?" आजोबांनी प्रतिप्रश्न केला.
"शक्यतो काय हवं आहे हे महत्त्वाचं
असतं. काय नको हे शोधणं तुम्हाला का महत्त्वाचं वाटतं?" आनंदने उत्तराच्या अपेक्षेने विचारलं.
आजोबा म्हणाले, "की काय नको आहे हे कळलं की काय हवं आहे हे समजणं आणि शोधणं जास्त
सोपं होऊन जातं."
"मला समजून सांगा."
आकाशात कबुतरांचा थवा विहार करत होता.
फार विहंगम दृश्य होतं. ते पाहून आजोबा म्हणाले, "तुला माहितीये एक
कबुतरांचा थवा असाच आकाशात विहार करत होता. त्यांना त्यांच्या जीवाची सध्या फार
भीती वाटत होती कारण कोणीतरी त्यांच्या मागावर आहे हे त्यांना जाणवलं होतं. भीत
भीत जगण्याचा त्यांना कंटाळा आला होता. त्यांनीही इथे चर्चा करतायत तशी चर्चा केली
आणि बाहेरचा राजा असावा यावर त्यांचं एकमत झालं. पण तो कसा असावा यावर कोणीच काही
बोललं नाही. कबुतरांचा राजा त्यांना सांगत होता की घाबरू नका. भीती या जगात
प्रत्येकच जीवाला वाटत असते. पण म्हणून बाहेरचा राजा करू नका. पण त्यांनी आपल्या
या राजालाच हद्दपार केलं.
एक गरुड यावर लक्ष ठेवून होता. त्याने
संधी साधली.तो त्यांना म्हणाला,
"काय तुमचं जगणं? जरा काही झालं की घाबरता आणि खुराड्यात जाता. जरा खुलून जगा. मी
तुमचा राजा होईन. मी तुम्हाला इतर सर्वांपासून वाचवेन." कबुतरं हे ऐकून खुश
झाली. त्यांनी तडकाफडकी निर्णय घेत, पुढचा-मागचा विचार न करता गरुडाला
आपला राजा बनवलं."
"यात काय विचार करायचा? तो त्यांना संरक्षण देणार होता." आनंद तोडत म्हणाला.
आजोबा हसत पुढे सांगू लागले, "गरुड म्हणाला की मी तुमचं इतरांपासून रक्षण करेन. त्याच्यापासून
कबुतरांना कोण वाचवणार?"
"म्हणजे?"
"म्हणजे राजा होताच त्याने आज्ञा केली
की रोज एक कबुतर मला मेजवानी म्हणून मिळालं पाहिजे."
आनंद म्हणाला, "बाप रे.. म्हणजे बाहेरचा राजा नसला पाहिजे."
आजोबा म्हणाले, "मी पुन्हा तेच म्हणेन की कोण असावा हे महत्त्वाचं नाही, तो कसा असावा हे महत्त्वाचं आहे. राजा बाहेरचा किंवा आतला, कुठला का असेना तो कसा हवा??”
आनंद पटकन म्हणून गेला, "प्रजेचं रक्षण करण्यास तत्पर असावा!"
आजोबा हसले. त्याची पाठ थोपटत जाऊ
लागले. आनंदपाशी त्याचा वयाने थोडा मोठा असणारा मित्र राम येऊन बसला.
आनंद म्हणाला, "खूपच हुशार आणि मनाने चांगले वाटले ते आजोबा!"
राम आश्चर्यचकित होत म्हणाला, "आजोबा??? हा माणूस कोण आहे माहितीये?"
"कोण?"
"काही वर्षांपूर्वी इथल्याच जनतेने
गैरसमजातुन ज्याला हद्दपार केलं तो राजा सुमंत!"
- वरुण भागवत

Well done
ReplyDeleteMoral story...
Sundar.. 🙋🙂😊👌👌
Thanks
DeleteKhup sundar 🙏
ReplyDeleteधन्यवाद!! 😊
Deleteखूपच अप्रतिम.. शेवटपर्यंत खिवळून ठेवलं
ReplyDeleteधन्यवाद!! 😊
Delete