| A Click by: Varun Bhagwat |
“एका गावात एक माणूस राहत होता. तो शेती करत असे. खरंतर त्याचं बरं चालू होतं. एकदा त्याच्याकडे काम करायला एक गडी रुजू झाला. या गड्याने एकदा शेतकऱ्याला शेतीसंबंधी काही उपदेश केला. त्या उपदेशामुळे पीक येण्याचं प्रमाण वाढू लागलं. आजूबाजूच्या इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत हा जास्त पैसे कमवू लागला. आता तो शेतकरी त्या गड्याचा प्रत्येक उपदेश मानू लागला. भरपूर पीक येत होतं. इतकं की गरजेपेक्षा खूप जास्त पैसे त्याच्याकडे येऊ लागले. मग त्या गड्याने त्याला अवैध मार्गाने पैसे मिळवण्यासाठी प्रोत्साहन दिलं. शेतकऱ्याला जास्त पैशाचं करायचं काय हा प्रश्न होताच. त्याने गड्याचं ऐकलं. खूप पैसे मिळू लागले. साधं घर असणाऱ्या शेतकऱ्याचा मोठ्ठा बंगला झाला. त्या बंगल्यावर त्याने सर्वांना मेजवानीचं आमंत्रण दिलं. अनेक लोक आले. त्याला वाटलं यातल्या काहींना तर आपण बोलावणं पण केलं नाही तरी ते आलेत. खरंतर निमंत्रण नसणारे कोणी सुद्धा आले नव्हते. पण कोणाला तरी कमी लेखायचंच हे जणू त्याने ठरवलंच होतं. एक रामू नावाचा गरीब शेतकरी आला होता. खरंतर त्याला आमंत्रण होतं पण हे याच्या लक्षात नव्हतं. रामू जेवणाच्या पानावर बसू लागला. तर याने रामूचा अपमान केला. बायकोच्या हातून चुकून दारूची सुरई पडली आणि त्यातून दारू सांडली तर तिलाच तो सर्वांसमोर बोल लावू लागला आणि म्हणाला की काय किंमत आहे या दारूची माहितीये ना तुला, अशी सहज वाया घालवायला लाज नाही वाटत?”
राक्षस देवाला सांगत होता, “माझं महत्त्व पृथ्वीतलावर कमी होता कामा
नये म्हणून मी माझ्या सेवकाला त्या शेतकऱ्याची लालसा वाढवायला त्याच्याकडे पाठवलं
त्याचा गडी बनून.. त्याला आमच्यासारखा बनवायला लावलं. त्याच्यातलं माणूसपण कमी
करायला लावलं. बघ, तो आता आमच्यापैकीच एक आहे. हे असंय... खरंतर याला कशाची कमतरता
नव्हती. पण एका गरीब शेतकऱ्याला जेवू घालणं त्याच्या जीवावर आलं. मी त्याच्यातली
लालसा वाढवली. स्वत:च्याच बायकोला उलटपालट बोलायला मी भाग पाडलं. त्याच्यामध्ये
माझा अंश वाढतोय हे तू नाकारू शकत नाहीस.”
देव म्हणाला, “पण तुझे फसलेले डाव सुद्धा आहेतच की.. एकदा असंच तू
तुझ्या याच सेवकाला एका गावात पाठवलं होतंस. तिथे एक बाळू नावाचा शेतकरी होता. जो रोज शेतात
जायचा. तो चांगला माणूस होता. पण तुला त्याचा साधेपणा, चांगुलपणा बघवत नव्हता. तो
शेतात गेला की झाडाखाली भाकरी आणि चटणी ठेवून द्यायचा. दुपारी बैलांना विश्रांती
द्यायचा आणि स्वत: ती चटणी भाकरी खायचा. एका दुपारी ही चटणी भाकरी तुझ्या सेवकाने
चोरली. बाळूची नियत बदलेल याची वाट तो पाहू लागला. पण बाळू स्वत:शीच म्हणाला,
“चटणी भाकरी कशाला कोण चोरेल.. असो... चोरली असेल म्हणजे एखाद्याची ती गरज असेल”
असं म्हणत आनंदाने पुन्हा कामाला लागला. माणूस असा पण असतो.”
यावर राक्षस म्हणाला, “सगळं आठवतंय देवा. पण माझ्या विकृत स्वभावाने
ते मनावर घेतलं आणि सेवकाला मी खूप बोललो की तू त्याची नियत का बदलू शकला नाहीस
आणि मग गडी म्हणून याच बाळूकडे मी त्याला पाठवलं. हळूहळू त्याची नियत बदलली. त्याच्यातलं
देवत्त्व संपलं. आता तर तू पाहिलंस की तो कोणाशी कसाही वागतोय.”
देव म्हणाला, “खरंय. तुझं महत्त्व वाढतंय... पण तू माझ्याकडे का
आलायस?”
राक्षस म्हणाला, “काय सांगू देवा, माझं महत्त्व वाढतंय याचा मलाच
त्रास होतोय. त्या बाळू शेतकऱ्याला संशय आलाय की माझा सेवक अर्थात त्याच्या
गड्याने त्याच्याशी धोका केलाय. म्हणून तो माझ्या सेवकाच्या जीवावर उठलाय.. माझं
वाईटपण माझ्याच अंगी येतंय.”
देव स्मित करत म्हणाला, “काट्याने काटा काढणे हे तू जाणून असशीलच.”
राक्षस म्हणाला, “मदत करा भगवंत.”
देव प्रश्नार्थक नजरेने म्हणाला, “म्हणजे काय करू?”
राक्षस काकुळतीने म्हणाला, “त्याच्यामध्ये थोडी देवत्त्वाची भर
घाला.”
हताश राक्षसाकडे देव फक्त पाहत राहिला.
- वरुण भागवत
Waah...khara e..devashivay kahi nai👌👌
ReplyDelete