Skip to main content

हत्ती आणि आत्मविश्वास

Photography- Varun Bhagwat


भलाथोरला हत्ती पाहिला. एक नाही. अनेक होते. आपापल्या विश्वात रमले होते. निवांतपणे डुलत- डुलत फिरत होते. का नाही फिरणार... ही तर त्यांची जागा.. हे तर अभयारण्य. इथे आपण माणसं बंदी आणि ते मोकळे!


बंद राहण्यावरून एक गोष्ट आठवली.

एक माणूस रस्त्यावरून जात होता.  रस्ता कच्चा, विशेष वर्दळ नव्हती. त्या रस्त्याच्या कडेला बांधलेला हत्ती त्याला दिसला. आता हत्तीसारखा प्राणी म्हणजे किती अवाढव्य असतो याची आपल्याला कल्पना आहेच. पण इतक्या अवाढव्य प्राण्याला बांधून ठेवणं ही कल्पना आधी त्या माणसाला challenging वाटली. त्याने नीट पाहिल्यावर त्याच्या लक्षात आलं की एवढा अजस्त्र हत्ती फक्त एका दोरखंडाने बांधला होता. ते ही एका पायाला तेवढा दोरखंड होता. त्याचं कुतूहल वाढलं. त्याने पाहिलं की कदाचित एखादा साखळदंड असेल किंवा अदृश्य पिंजरा. पण कसलं काय... काहीच नव्हतं. त्याने आजूबाजूला पाहिलं. फार कोणी नव्हतं. तेवढ्यात तिथे जवळच एक माणूस गवत कापताना दिसला. त्याने त्या गवत कापणाऱ्या माणसाला विचारलं, “काय हो, हा हत्ती एका दोरखंडाने कसा काय बांधता आला. हा ते दावं तोडू शकत नाही?”

 

यावर गवत कापणारा मनुष्य हसला. गवत कापता कापता तो म्हणाला, “हा हत्ती लहान होता तेव्हा त्याला पहिल्यांदा या दोरखंडाने बांधलं होतं. तेव्हा त्याच्यात इतकी ताकद नव्हती की तो हे तोडू शकेल. तेव्हा तर या पेक्षा सुद्धा चांगलंच अजून घट्ट पण बांधलं होतं. तेव्हा त्याने प्रयत्न केला होता स्वतःला सोडवायचा पण ते शक्य झालं नाही. त्यानंतर त्याची अशीच समजूत झाली की हा दोरखंड आपल्याला बांधून ठेवतो. हा आपण तोडू शकत नाही. त्यानंतर त्याने प्रयत्नच सोडून दिला.”

Photography- Varun Bhagwat
 

माझं लक्ष पुन्हा अभयारण्यात मुक्तपणे बागडणाऱ्या, जलक्रीडा करणाऱ्या हत्तीकडे गेलं. या हत्तीला म्हणावंसं वाटलं की तुमची भाषा तुम्हाला कळत असेल.. त्यामुळे जा आणि त्या बांधलेल्या हत्तीला सांग की तुला कोणी बांधलं नाहीये. मान्य आहे तेव्हा याला दोर तोडता आला नसेल. पण आता... आता प्रयत्न करायला काय हरकत आहे?

 

आपल्या आयुष्यात असे अनेक दोरखंड असतात. सुरुवातीला तर ते तापदायक वाटतात. पण एक वेळ येते जेव्हा त्यांना तोडून आत्मविश्वासाने पुढे जाणं शक्य असतं. पण त्याच वेळेला कच खाल्ली जाते आणि या दोरखंडाचं महत्त्व उगीच वाढतं. लहानपणी कधी तरी एखाद्याला स्टेज वर जाण्याची भीती बसते. मोठं झाल्यावर ती भीती तशीच राहते. आपणच आपली भीती घालवू शकतो.. पण मी हे करू शकतो हा विश्वास पाहिजे. कधीकधी एकाच झटक्यात हा दोरखंड तोडून आपण मनाने बंधमुक्त होऊ शकतो. पण त्यासाठी तोडणाऱ्याची तयारी पाहिजे. हा भीतीचा दोरखंड तुटला की अभयारण्यात आत्मविश्वासाने वावरणाऱ्या हत्तीसारखे आपण मनाने मजबूत होतो.

 

बोलता बोलता अभयारण्य मागे पडलं. हत्ती त्याच्या विश्वात मोकळा होता नि मी माझ्या विश्वात! तनाने मोकळा झालोच पण मनाने सुद्धा मोकळा झालो होतो आणि आता त्या बांधलेल्या हत्तीच्या शोधात होतो.  

-       वरुण भागवत

Comments

  1. True...prtekane aple dorkhand velich todle pahije

    ReplyDelete
  2. खूप छान. असच लिहीत जा. खूप वाचन करा.

    ReplyDelete
  3. Replies
    1. आंतरिक शक्ती ओळखून काम करायला शिकल पाहिजे, आणि ती आंतरिक शक्ती वेळोवेळी पडताळून पाहिली पाहिजे. छान संदेश

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

Routine चा आदर!

“कधी कधी वाटतं की खूप लिहावं, पण वेळ होतोच असं नाही.” “वेळ मिळाला की काय करतोस?” “वेळ मिळतो. I mean, कधी वेळ असतो, तर मग लिहायचा mood असतोच असं नाही.” “कधीतरीच काहीतरी करावंसं वाटणं हा मनुष्याचा अगदी सहज स्वभाव आहे. पण तीच गोष्ट रोज ठरवून करणं किंवा ठराविक कालावधीने पुनःपुन्हा करणं हे खरं कसब.”  “तीच गोष्ट repeat करण्यात काय आलंय कसब? रोज करणं हे तर routine झालं. Routine काय अवघड असतं का?” “नाही. Routine हे अवघड नाही तर routine ही गोष्ट खरोखरच boring आहे.” “हं, तेच.” “तेच नाही, फरक आहे.” “म्हणजे?” “Routine अवघड नाही पण boring आहे. पण ते असं आहे म्हणूनच routine हे long term साठी उत्तम result देणारं आहे.”  “कसं?” “कसंय, कित्येक माणसांना results तर हवे असतात आणि त्यातल्या बहुतेकांना results ची प्रचंड घाई असते. मग हवे तसे results मिळत नाहीत, ते खट्टू होतात आणि प्रयत्न म्हणजेच routine सोडून देतात. इथेच सगळी गंमत आहे. फार प्रयत्न न करता results न मिळणं हा प्रयत्नांचा आळस आहे. बघ, MS Dhoni ला कधी interview मध्ये बोलताना पाहिलं असेल तर तो अनेकदा म्हणतो की process वर focus करा. Result ...

अबोल ती... अबोल तो...

  माणसाचं भावविश्व समजून घेण्याचा विचार केला की लक्षात येतं की किती गोष्टी त्यात दडल्या आहेत. कोणीतरी एकटं, त्याहूनही अधिक अचूक सांगायचं तर एकाकी दिसलं की मनी प्रश्न येतो आणि तो विचारावा देखील वाटतो, "काय रे / काय गं? सगळं ठीक ना?" अशीच एक सखी त्याला भेटली. त्याने तिला विचारलं, "ठीक आहेस ना गं?" ती व्यक्ती उत्तरली, "हां... अं... हो..." या उत्तरावरुन त्याला अंदाज आला की काहीतरी बिनसलंय. मग त्याने जाणून घेण्याचा यत्न केला. तेव्हा ती काहीच बोलली नाही. मग तो विषय बाजूला पडला. पण थोड्याच वेळाने ती स्वतःच म्हणाली, "हो, काहीतरी आहे असं, ज्यामुळे मी ठीक नाहीये." त्याने हलकेच विचारलं, "सांगशील?" "नाही नको. उगाच सगळा mood spoil होऊन जाईल. त्यापेक्षा मी लिहिलेल्या कविता ऐकवते. ऐकशील?" "ऐकव." गंमत अशी की तो ही लिहायचा. थोडं तिचं, थोडं त्याचं असं करत दोघे एकमेकांना गूज सांगत होते. दोघे कल्पनेची नाव वल्हवत अज्ञात किनाऱ्यावर जाऊ लागले. काही क्षण शांत गेले. शांतता. न बोलताही बरंच बोलता येईल असा किनारा त्यांना सापडला. तिथे दोघे पोहोच...

चंद्र आणि ते दोघे!

  "आता तर लक्ख उजाडलंय. तरी आज थोडा जास्तच वेळ आहे बघ तो आभाळात." "कोण गं?" "आपला चंद्र!" "असं कसं गं?" "कधी कधी राहतो तो असा जास्त वेळ. निसर्गाचं काय सांगावं?" "किंवा कधी कधी त्याला निघून जावं वाटत नसेल. तिच्यासवे थांबून राहावं असं वाटत असेल!" "ती?" "त्याची सखी!" "चंद्राची सखी?" "हो. नसू शकते?" "असेल." "आहेच. चंद्राला साक्ष ठेवून इतकं काय काय romantic बोललं जातं, लिहिलं जातं. चंद्र नसणार का मग romantic?" "हां." "हां काय? खरंच! मग थांबत असेल तो त्याच्या सखीची वाट पाहत. थांबावं वाटत असेल त्याला. आज तसाच दिवस आहे. म्हणून तो अजूनही आभाळात दिसतोय." "हो ना.. वाटत असेल थांबावं." "रमत असेल तो तिच्या आठवणीत. झुरत असेल भेटीसाठी. आणि खूप दिवसांनी भेट झाली की मग तिच्यासोबत थांबून राहत असेल. नाही का?" "हो रे. यात गंमत आहे खरी. मग ती सोडतच नसेल बघ त्याला." "तिने तरी त्याला का सोडावं? मस्तपैकी घट्ट मिठीत पकडून ...