| A click by: Varun Bhagwat |
दवाखान्यामध्ये लोक नंबर लावून थांबले होते. एक आई आणि तिचा साधारण ८ वर्षांचा मुलगा त्या मुलाच्या आजोबांची औषधं घेण्यासाठी डॉक्टरांकडे आले होते. डॉक्टर अजून यायचे होते. त्या मुलाच्या हाती एक मासिक लागलं आणि तो त्यातली चित्र चाळत होता. त्याने मध्येच काही वाचायचा प्रयत्न केला असावा आणि तो म्हणाला, “आई कु-रु-त-ज्ञ-ता म्हणजे?” आईने तो शब्द पाहिला आणि हसत म्हणाली, “कु-रु-त-ज्ञ-ता नाही रे. कृतज्ञता!” “पण म्हणजे काय?” मुलगा उत्सुकतेने म्हणाला.
आई विचारपूर्वक म्हणाली, “कसं सांगू बरं
तुला? ऐक हं. पूर्वीच्या काळी काही जणांना गुलाम म्हणून वागवलं जायचं. हवी ती आणि
वाट्टेल तशी कामं करवून घेण्यासाठी. एकदा एक गुलाम त्याच्या मालकाच्या तावडीतून सुटून
पळाला. पळता पळता जंगलात पोचला. तिथेच संध्याकाळ झाली. जंगलात रात्री कडाक्याची थंडी
पडणार हे तो जाणून होता. म्हणून त्याने विश्रांती आणि उबेसाठी एक आसरा शोधला.
त्याला कळलंच नाही की आसऱ्याची जागा ही एका
सिंहाची गुहा आहे. त्याच्या मागोमाग सिंह आलेला पाहून तो घाबरला. सिंह मात्र विव्हळत
होता. त्याचा पंजा रक्तबंबाळ झाला होता. गुलाम शांतपणे त्याच्या जवळ गेला. पाहिलं
तर सिंहाच्या पायात काटा घुसला होता. गुलामाने अलगद पणे तो काटा काढला. स्वत:च्या
रुमालाचा उपयोग पट्टीसारखा करून जखमेवर पट्टी बांधली. सिंहाने गुलामाला कोणतीच इजा
पोहोचवली नाही.” मुलाची उत्सुकता वाढली.
आई पुढे म्हणाली, “पण या गुलामाचा शोध घ्यायला मालकाने माणसं पाठवली. ती माणसं त्याचा शोध घेता घेता जंगलात पोचली. गुलाम पकडला गेला. त्याला मालकासमोर आणलं. मालक भयंकर चिडला होता. दुसऱ्या कोणी असं पळून जाण्याची हिम्मत करू नये म्हणून त्याने गुलामाला मोठ्या मैदानाच्या मध्यात सोडलं. याच्या अंगावर हिंस्त्र श्वापद सोडा अशी आज्ञा केली. पिंजऱ्यातून एक प्राणी सुटला आणि धावत गुलामाकडे येऊ लागला.
तेवढ्यात एक माणूस दवाखान्याच्या रिसेप्शन
पाशी आला. त्याने विचारलं, “डॉक्टर आले नाहीत का?”
“येतील ना... तुमचा नंबर लावू का?” रिसेप्शन
वरील व्यक्तीने विचारलं.
“नको. मला काही झालं नाहीये. मला त्यांना
फक्त हा पुष्पगुच्छ द्यायचाय. मागच्या वर्षी याच दिवशी त्यांनी माझं ऑपरेशन करून मला
मरणाच्या दारातून वाचवलं होतं.” तो माणूस म्हणाला.
मुलगा त्या माणसाकडे बोट दाखवत आईला म्हणाला,
“आई... कृतज्ञता!” आई प्रसन्न हसली.
वरुण भागवत
Excellent
ReplyDelete👍 nice varun sir
ReplyDeleteKya baat hai! Khupch sundar! 👌👌👍👍👍
ReplyDeleteमस्त
ReplyDeleteखुप छान
ReplyDeleteमस्तच
ReplyDeleteखूप छान
ReplyDeleteThank you all.
ReplyDeleteगोष्ट छानच आहे, फक्त यामध्ये नंतर तात्पर्य/सारांश असे काही नाही, तेव्हढच खटकलं. ते छान मांडलेलं असतं.
ReplyDelete