Skip to main content

राग…


A Click by: Varun Bhagwat

शाळेच्या वर्गाबाहेर २ मुलं भांडत होती.

त्यातला एक जण म्हणाला, “मला राग आला तर मी काही पण करतो. मला उगाच चिडायला लावू नको.”

दुसरा म्हणाला,”काय करशील रे?”

पहिला म्हणाला, “खूप मारीन काय मी.”

दुसरा म्हणाला, “हिंमत तर कर. मी सोडेन का तुला?”

 

हे चालू असताना सर वर्गात येऊ लागले. मुलांच्या लक्षातच आलं नाही की सर कधी आले. सरांनी मात्र त्यांचं संभाषण येता येता ऐकलं होतं. मात्र तिथे सर काहीच बोलले नव्हते. सर आल्याचं कळताच आपण काही केलंच नाही आणि आपल्यात काही झालंच नाही अशा थाटात ते दोघे पण वर्गात आले आणि आपापल्या जागी बसले.

सर्व मुलांचे हे लाडके शिक्षक असल्यामुळे सरांना मुलं कायम गोष्ट सांगायला लावायची. आज पण मुलांनी गोष्टीची मागणी केली. मुलांचा अभ्यासक्रम बऱ्यापैकी आटपत आला होता. त्या दोन मुलांचे संवाद पण सरांच्या चांगलेच लक्षात होते. सरांनी हे सगळं साधून गोष्ट सांगायचं कबूल केलं.

 

सर सांगू लागले, “एक शेतकरी त्याच्या शेतात फार मेहनत करून काम करत असे. त्याचा मुलगा सोनू हा फार दंगेखोर होता. नुसता दंगेखोर असता तर ठीक पण त्याला राग सुद्धा पटकन यायचा. राग आल्यावर त्याचा स्वत:वरचा ताबा सुटायचा. तो वाट्टेल ते करायचा. त्या शेतामध्ये एक कोल्हा काही दिवसांपासून सारखा येत होता. तो यायचा आणि पिकांची नासधूस करायचा. सोनू ला कळलं की असा एक कोल्हा आहे जो असं वागतोय. त्याचा स्वत:वरचा ताबा सुटला. त्याने ठरवलं की काहीही करून या कोल्ह्याला अद्दल घडवायची. तो असं काही करणार आहे त्याची त्याच्या वडिलांना अर्थात कष्टकरी शेतकऱ्याला काही कल्पनाच नव्हती.” असं म्हणत सरांची नजर त्या दोन भांडणाऱ्या मुलांवर गेली. सर पुढे म्हणाले, “कधी कधी मुलं चूक करतात आणि त्याची शिक्षा मात्र त्यांच्या पालकांना भोगावी लागते.”

“सर म्हणजे? त्याचा गोष्टीशी काय संबंध?” एक मुलगा उत्सुकतेने म्हणाला.

सर पुढे म्हणाले, “अरे, सोनू काय पाऊल उचलणार हे बिचाऱ्या शेतकऱ्याला माहित नव्हतं. सोनू ने काय केलं माहितीये?”

मुलं एकाच सुरात म्हणाली, ”काय?”

सर हसत सांगू लागले, “तो कोल्ह्याची वाट बघतच बसला होता. कोल्हा येताच संधी साधून सोनुने कोल्ह्याच्या शेपटीला आग लावली.”

मुलं हसू लागली.

सर मात्र शांतपणे म्हणाले, “आधी तरी तो कोल्हा फक्त पिकाचं थोडंफार नुकसान करत होता. मात्र अविचारी सोनू ने त्याच्या शेपटीला आग लावल्याने कोल्हा पेटलेली शेपटी विझवायचा प्रयत्न करू लागला. या प्रयत्नात तो शेतभर फिरला आणि पूर्ण शेत जळून खाक झालं. शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान झालं. हे सगळं का घडलं मुलांनो?”

एक मुलगा खिदळत म्हणाला, “शेपटी जाळल्यामुळे.”

सर त्याला टपली देत म्हणाले, “म्हणजे नेमकं कशामुळे?”

एक चुणचुणीत मुलगा म्हणाला, “सर सोनूचा स्वत:वर ताबा नसल्याने आणि त्याच्या रागीट आणि अविचारी स्वभावामुळे.”

सर म्हणाले, “या गोष्टीतून बोध काय घ्यायचा?”

 तोच चुणचुणीत मुलगा उत्तरला, “रागात असणाऱ्या माणसाचा स्वतःवर ताबा राहत नाही. तो वाट्टेल ते करून बसतो. त्याला कसलंच भान राहत नाही. तो यात इतरांचं नुकसान करतो. त्याच बरोबरीने स्वत:चं सुद्धा नुकसान करून घेतो. रागावर वेळीच आवर घातला की मोठं नुकसान टाळता येतं. अशा परिस्थितीत आपल्याला समजत नसेल तर कोणाची तरी मदत घ्यायची.”

त्या दोन मुलांना कळायचं ते कळलं असावं असं सरांना तरी वाटलं. नंतर सरांचा तास संपला, ते जाऊ लागले. ती दोन मुलं धावत सरांकडे आली आणि म्हणाली, “सर...”

-वरुण भागवत

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Late झाला तर...

समीर नी चिडचिड करतच गाडीला किक मारली. पहिल्या किकला स्टार्ट होणारी गाडी आज चार किका मारून सुद्धा स्टार्ट होत नव्हती. अखेर पाचव्या किकला गाडी सुरू झाली. गाडी सुरू झाल्यानंतर त्याचा राग त्याने Accelerator वर पिळ देत काढला. Accelerator खूप जास्त प्रमाणात पिळत त्याने गाडी idle च ठेवली. त्यानी गाडी इतकी raise केली की शेजारच्या पाटील काकू काचेची खिडकी उघडून डोकावून पाहू लागल्या. त्या बघताच तो थोडासा embarrassed झाला. समीर त्यांच्याकडे बघून कसंनुसं हसला. गाडीचा कधीच इतका मोठा आवाज न करणारा समीर आज थोडं वेगळंच वागताना पाहून समोरच्या शेलार काकूंना आश्चर्य वाटलं होतं. मिस्टर शेलार सुद्धा पूजा करत करत खिडकीतून डोकावून पाहू लागले. आता मात्र समीरने पटकन नजर चोरत gear टाकत तिथून पळ काढला. वर्षा मावशींची गडबड चालू होती. त्यांना काहीही करून त्यांची बस गाठायची होती. कारखान्यात वेळेवर पोहोचणं भाग होतं. पतीच्या निधनानंतर गेली दहा वर्ष, घरापासून ८ किलोमिटर अंतरावर असणाऱ्या कारखान्यात त्या कामाला होत्या. त्यांनी हे काम करून मुलालाही मोठ्या कष्टाने वाढवलं होतं. आता मुलगा कॉलेजमध्ये होता आणि  कॉलेजच्याच ...

Parking आणि त्या तिघी!

  ईशा किराणामालाच्या दुकानातून दोन जड पिशव्या तिच्या नाजूक हातात घेऊन आपल्या two wheeler पाशी पोहोचली. तिथे गेल्या गेल्या तिला दिसलं की तिच्या गाडीच्या दोन्ही बाजूंना चिकटून दोन गाड्या लावल्या आहेत. आणि या तीनही गाड्या side stand वर आहेत. बाकीच्यांनी गाड्या side stand वर लावण्याचं कारण म्हणजे mostly आळस किंवा parking मध्ये दुसऱ्याची गाडी काढायला लावायला अवघड जाईल यांचं भान नसणे. ईशाने side stand वर लावण्याचं कारण आळस नव्हतं, तिला भान होतं; पण तिच्या नाजूक बांध्याला गाडी double stand वर लावणं म्हणजे कमरेची वाट लावून घेण्यासारखं होतं. त्यामुळे ती गाडी side stand वर लावायची. त्यामुळे गाडी काढताना अडचण होणं हा आजचा problem नव्हता. पण नेहमी कोणी ना कोणी सहाय्यास येई. आज मात्र गाडी main road पासून आत साधारण ५०० मीटर अंतरावर असणाऱ्या गल्लीत, उजवीकडे वळून अजून पुढे १०० मीटरवर असणाऱ्या किराणा दुकानासमोर होती. दुपारचा १ वाजला होता. Grocery shop मध्ये सकाळच्या सत्रातली ईशाच शेवटची customer होती. तिने सामान भरताच Shutter down करून ईशा गाडीजवळ येईपर्यंत भरत भाई निघून गेला. गल्ली, दुपारी १ ची व...

मनातल्या एकलव्याची भरारी...

  A click by : Varun Bhagwat  "हातात घेतलेली रेती किती सहज सुटते. आपण पकडून ठेवलीय असं वाटतं. आपला त्यावर ताबा आहे असं वाटतं पण..." "पण ती निघून जाते. असंच ना?" "हो, जशी माझी नोकरी गेली तशीच. शाश्वतीच नाही राहिली कसली." "हं..." "मी किती कष्ट घेतले. रोज नवीन काहीतरी शोधू पाहत होतो, शिकत होतो. पण असा तडकाफडकी निर्णय घेऊन मला काढून टाकलं. कुठे चुकलं माझं?" "तू मर्जीतील माणूस नव्हतास." "काय?" "खूप स्पष्ट बोलतोय मी. पण हेच सत्य आहे." "पण म्हणजे काय?" "खूप explain करावं लागेल. "मग कर." "वेळ आहे?" "नोकरी गेल्यावर वेळच वेळ असतो." "बरं. मग ऐक. द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडवांचे गुरू. अर्जुन तर त्यांचा लाडका शिष्य. त्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवण्याचं वचन त्यांनी त्याला दिलं होतं. एकदा गुरू द्रोणाचार्य त्यांच्या साऱ्या शिष्यांसवे अरण्यात गेले होते. एक कुत्रा खूप वेळ भुंकत होता. मात्र काही काळाने तो शांत झाला. कोणाला कळेना की हा अचानक कसा काय इतका शांत झाला? जिथून त्या ...