![]() |
| A sketch by: Prasad Joshi |
कांचन आज घरी आली ते तोंड पाडूनच. वडिलांचं तिच्या एकूण हालचालीकडे लक्ष होतं. पण स्वत:हून ते मुद्दाम काही बोलले नाहीत. त्यांना माहित होतं आज हे घडणार होतं, तिचा चेहरा पडणार होता, तिला थोडं वाईट वाटणार होतं. त्यांनीच तिला काळे काकांकडे पाठवलं होतं. काळे काका म्हणजे कांचनच्या बाबांचे खूप चांगले मित्र ज्यांना नाटकाची खूप चांगली समज होती. कांचनच्या नुकत्याच झालेल्या नाटकाच्या performance विषयी चर्चा करण्यासाठी बाबांनी तिला योग्य माणसाकडेच पाठवलं होतं. आत ती आपल्याशी बोलण्यासाठी स्वत:च विषय काढेल याची ते वाट बघत होते आणि तिने विषय काढलाच.
कांचन वैतागत म्हणाली, “बाबा...”
“बोला.” बाबा वाचत असलेलं पुस्तक मिटत
म्हणाले.
“झाली माझी काळे काकांसोबत meeting.”
“मग काय म्हणाले?”
“फारच वाट लावतात हो ते.”
उगाच न समजल्याचा आव आणत बाबा म्हणाले, “म्हणजे
काय गं?”
“म्हणजे मला कितीतरी जण ‘छान झालं हं’ वगैरे
म्हणत होते आणि यांनी मात्र प्रयोगाची चिरफाड केली.”
“थोडक्यात तुम्हाला जमिनीवर आणलं.”
“हां, तुम्ही त्यांचीच बाजू घेणार.”
“तसं नाही बाळा. पण कोणीतरी असलंच पाहिजे
असं.”
“पार वाट लावणारं??”
“असं म्हणू नये. हे बघ तू ही मान्य करशील की
ते किती जाणकार आहेत आणि त्यांनी तुझ्या नाटकाचा प्रामाणिक अभिप्राय तुला दिला
असणार! चांगले points सुद्धा सांगितले असणार.”
“पण माझ्या वाईटच लक्षात राहिले.”
“Good. त्यावर जास्त कष्ट करता येतील.”
“हं. खरं आहे तुमचं. चांगले मुद्दे पण
सांगितले तसे त्यांनी.”
“म्हणूनच म्हणलं की ते खरं बोलले. तो माणूस
दोन चेहऱ्यांचा नाही. तुला त्यांच्याकडे पाठवायचं हेच कारण होतं. हे बघ तोंडावर चांगलं
म्हणणारे मागून वाईट बोलतील. काही जणांचं बोलणं एक असतं, मनात वेगळं असतं. अशी
माणसं दोन चेहऱ्यांची असतात. ती वेळीच ओळखावीत. त्या हरणाच्या बाबतीत हेच तर घडलं
होतं.”
“बाबा, हरीण कुठून आलं?”
“तुला सांगितली होती ना मी त्या हरणाची गोष्ट.”
“कुठली? परत सांगा.”
बाबा गोष्ट सांगू लागले, “एका हरणाच्या मागे
काही शिकारी लागले. वाटेत त्याला एक छोटं घर दिसलं. हरणाने पटकन त्या घराच्या
मालकाला विचारलं की त्याच्या मागे शिकारी लागलेत आणि त्याला लपायला जागा हवी आहे.
मालकाने घरात आसरा दिला. तेवढ्यात शिकारी तिथे पोचले. त्यांनी हरणाबद्दल त्या
माणसाला विचारलं. तो तोंडाने नाही म्हणाला पण खुणेने त्याने आत हरीण आहे असं
दर्शवलं. सुदैवाने त्याने केलेल्या या खुणेकडे त्या शिकाऱ्यांचं लक्षच गेलं नाही.
ते निघून गेले. हरणाने मात्र त्याच्या बोलण्यातला आणि कृतीतला फरक हेरला. थोडक्यात
त्याचे २ चेहरे ओळखले आणि मागच्या दाराने ते लगेच निघून जाऊ लागलं. मालक तिथून निघून
जाणाऱ्या मात्र नजरेच्या टप्प्यात असणाऱ्या हरणाला म्हणाला, “तुला वाचवलं तर तुला माझे आभार पण
मानावेसे वाटत नाहीत?” हरीण लांबूनच उत्तरलं, “नक्की मानले असते जर तुझं मन स्वच्छ
असतं. माझ्या नजरेत वाईट न होण्यासाठी तू त्यांना तोंडाने मी इथे नाहीये असं
सांगितलंस आणि त्यांच्या नजरेत चांगला होण्यासाठी नजरेने मी इकडेच आहे असं खुणावलंस.
माझं नशीब त्यांचं लक्ष गेलं नाही. पण अशा दुतोंडी माणसांपासून मी दूरच बरा.”
गोष्ट सांगून संपली होती.
बाबा बोलत होते. “खरी माणसं कमव बेटा.. वरवर
कौतुक करणारी, मागे वेगळं बोलणारी २ चेहरे असणारी माणसं आपल्याला नको.”
कांचन ऐकत होती आणि जुना धडा नव्याने शिकत
होती.
- वरुण भागवत

छान!!!
ReplyDeleteखूप छान. माणंस ओळखता आली पाहिजेत.
ReplyDeleteWaah...khara e👌👌
ReplyDeleteYes's...
ReplyDeleteKharay re..... 🙋👌👍