![]() |
| A Click by- Sushil Ladkat |
एक सिंह जंगलाजवळ असणाऱ्या एका शेतावर नजर ठेवून होता. त्या शेतात ४ बैल काम करायचे. हे चारही बैल एकमेकांचे खूप चांगले मित्र होते. सिंहाला बैलाची शिकार करायची होती. मात्र ते चौघे कायम एकत्र असल्या कारणाने त्याला हे शक्य होत नव्हतं. तरीही तो संधीची वाट पाहत होता. त्याने एकूणच त्यांच्या रोजच्या दिनक्रमाचा अभ्यास केला होता. अभ्यासातून एक गोष्ट त्याला कळली होती की दिवसातल्या एका ठराविक वेळी हे चौघे एकमेकांसोबत नसतात. त्यावेळी ते वेगवेगळ्या दिशांना जाऊन चक्कर मारून येतात. मात्र तरीही त्याला एक गोष्ट जाणवली की हे एकमेकांपासून फार दूर जात नाहीत.
त्याने साधारण अर्थ हा काढला की समजा आपण हल्ला
केलाच तर बाकी बैल जे साधारण नजरेच्या टप्प्यात आहेत ते येतील आणि आपल्यालाच पळ
काढावा लागेल. कितीही मोठा सिंह असला तरी ४ बैल नक्कीच भारी पडू शकले असते. म्हणून
सिंहाने वेगळंच अस्त्र निवडलं. त्याने बोलण्याचा पर्याय निवडला.
जेव्हा बैल एकएकटे चक्कर मारायचे तेव्हा
त्यातल्या एका बैलाला त्याने गाठलं. आधी तो बैल त्याच्याशी बोलायला पुढे जात
नव्हता. सिंह म्हणाला, “अरे तुझे मित्र आजूबाजूला आहेत. ते जवळ असताना मी हल्ला का
करेन? आणि मुळात मी तुझ्याशी बोलायला आलोय. मैत्री करायला आणि सावध करायला आलोय.”
अशा आपल्या मधुर वाणीने त्याने बैलाला विश्वासात घेतलं आणि दाखवलं की
त्याच्यापासून त्याला धोका नाहीये. तर त्याच्याच मित्रांपासून आहे. फोडा आणि झोडा
ही नीती सिंहाने वापरली. ही गोष्ट प्रत्येक बैलाच्या बाबतीत करण्यात सिंह यशस्वी
झाला. त्याने एकमेकांबद्दल त्या बैलांच्या मनात विष कालवलं.
सिंहाला आपल्या आजोबांनी सांगितलेली गोष्ट
आठवली. लाकडाची एकत्र बांधलेली मोळी सहजा सहजी तुटत नाही. मात्र त्यातली लाकडं
वेगवेगळी केली की तोडणं सोपं होऊन जातं. सिंह स्वत:च्या यशावर स्वत:शीच हसला.
त्याला आता चौघांमधल्या नात्यात आधीपेक्षा
फरक जाणवू लागला. ते जास्त एकत्र नव्हते. त्यांचा एकटं राहण्याचा कालावधी वाढत
होता. सिंहाला एक दिवस मोठ्ठी संधी चालून आली. त्याला जाणवलं, त्यांच्यातला एक बैल
एकटा फिरत होता. बाकी बैल आजूबाजूला नाहीत
ही खात्री सिंहाने केली. संधी साधून तो त्या एकट्या बैलावर हल्ला चढवायला गेला.
मात्र घडलं वेगळंच. बैल सतर्क होता. त्याने हल्ला चुकवला. सिंह सावरेपर्यंत तिथून
थोड्या अंतरावर लपलेले बैल धावत आले आणि तिथे पोचले.
सिंहाला हा प्रकार कळेना. ज्याच्यावर सिंहाने
हल्ला करायचा प्रयत्न केला होता तो बैल म्हणाला, “आमची मैत्री तोडून आम्हालाच
वेगळं करायला निघाला होतास? सुरुवातीला तू जे बोललास ते मला क्षणभर खरं वाटलं. पण
आम्ही नावाला मित्र नाही आहोत. काही असेल तरी एकमेकांशी share करतो. या वेळी
सुद्धा आमच्या मधलं वातावरण गढूळ होतंय असं जाणवताच मनमोकळेपणे आम्ही बोलायचं
ठरवलं. एक तिऱ्हाईत आपल्यात किती सहज फूट पडू शकतो हे जाणवलं. एकमेकांशी मोकळं
बोलण्याचा फायदाच झाला.” दुसऱ्या बैलाने या बोलण्याला पुष्टी दिली आणि म्हणाला,
“मग म्हणलं चला, तुझ्या चालीत तू यशस्वी होतो आहेस असं तुला भासवूया. तुझ्या मनात
अजून पुढे काय आहे हे जाणून घेऊया.” तिसरा बैल पुढे म्हणाला, “आज तो दिवस आलाच.
एकटे असतो तर आज तुझी शिकार झालो असतो. पण तुला सुद्धा माहित आहे की एकत्र असलो की
तू आमचं काहीच वाकडं करू शकणार नाहीस.”
हे कायम एकत्र असताना हा हल्ला शक्य नाही हे
जाणवून सिंह तिथून निघून जाऊ लागला. तेवढ्यात त्याला थांबवत चौथा बैल बोलू लागला, “आणि
ऐक, आजोबा काय फक्त तुला होते... आम्हालाही लाकडाच्या मोळीची गोष्ट माहितीये. फरक
इतकाच की तुला तुझ्या आजोबांनी शिकवताना आधी लाकडं मोळीतून वेगळी कर म्हणजे शिकार
सोपी जाईल असं सांगितलं. आम्हाला मात्र गोष्ट सांगताना लाकडाची मोळी कायम
बांधलेलीच असली पाहिजे असं वचन आमच्या आजोबांनी घेतलं.”
-
वरुण
भागवत
-

Calss.....doka....
ReplyDelete👌👍
ReplyDeleteNice
ReplyDelete👌👌👌
ReplyDeleteEki Hecha baal.....
ReplyDeleteKhup Chan Baal Aahe ya story Madhe...
📝👌👍
Thank you all
ReplyDelete