![]() |
| A click by: Omkar Unde |
किस्सा असा झाला की कोण्या एका ‘योग’दिनी बाहेर पाऊस पडत होता.
मी पावसापाण्यात पण धावत पळत एका इप्सित स्थळी पोचलो.
आत पोचलो तर छान वातावरण निर्मिती झाली होती.
आंतरराष्ट्रीय योग दिवस असल्याने सगळी तयारी झाली होती. मोठमोठी
मंडळी मांड्या ठोकून खालीच बसली होती.
मी ही सहभागी झालो.
म्हणलं चला.. योगा करू!
आधी lecture सुरू झालं..
सुरुवात थेट भजी च्या उदाहरणाने झाली.
आधीच पाऊस, त्यात भजी.. ह्म्म ...
पण झालं वेगळंच..
ते म्हणाले की या वातावरणात भजी खावी वाटते..
मी मनात म्हणलं खरंय ..
तर ते म्हणाले .. अजिबात खायची नाही.. ताबा असला पाहिजे जिभेवर..
मी म्हणलं तो ताबा बोलताना ठीक आहे पण भजी म्हणजे.. पण
त्यांच्या या वाक्याने भजीची आशाच संपली.
मग ते म्हणाले माणसाचं आयुष्य ५०% सुख आज ५०% दुःख असं असतं.
मी म्हणलं बरं .. भजी खायला मिळत नाही म्हणजे एकूणच ५०% दुःखाचा
काळ चालू आहे.
मग 'सुख' मिळविण्यासाठी आमच्या केंद्राला भेट द्या असं ते म्हणाले.. तिथे
ताण घालवला जाईल. अहो.. योगाच्या ऐवजी lecture सुरू झाल्याने
निम्मे लोक अपेक्षाभंगाने वैतागले होते आणि तणावाखाली आले होते की हे काय चाललंय..
पण ते चालूच होतं.
गर्भसंस्कार पण केले जातील म्हणले. तसं कोणी असेल तर सांगा.
(घ्या. म्हणजे
यांच्या session साठी गर्भवती
स्त्रिया शोधणं आलं किंवा त्यांनी गर्भवती होणं आलं!)
लहान मुलांना फार स्ट्रेस असतो म्हणले ते! दप्तराच्या
ओझ्यापासून ( आम्ही शाळा शिकलोच नाही ना आणि दप्तर पण नेलं नाही ना!)
नाही, या stress
management मध्ये मुलांच्या
दप्तराचा विषय आलाच कुठून??
माझ्या पायांमध्ये नुसताच मांड्या घालून स्ट्रेस वाढत होता.
व्यायाम सुरूच होत नव्हते.
मग मेंदूविषयी बोलणं सुरु झालं.
आजपर्यंत मला २ मेंदूंबद्दल माहिती होती.
आज त्याहून जास्त मेंदू आहेत हे कळलं.
मग मला ज्ञान कमी आहे असं वाटून माझा स्ट्रेस वाढला.
मग देव आहे की नाही ही चर्चा!
(मी म्हणतो त्या
देवाला कशाला त्रास.. आपण काही मागू नाही.. आणि तो काही उगाचच काही वाटत सुटणार
नाही. त्याला उगाच कशाला discussion मध्ये ओढायचं ?)
मग पुरुष आणि स्त्री चा स्पर्श आणि त्यामागील हेतू या विषयी
सुरु झालं..
(पण आत्ता कोणीच
कोणाला touch करत नव्हतं.. फक्त मांडी घातल्याने
मांड्यांचा स्पर्श झाला असेल फार तर फार.. तो ही स्वतःचाच स्वतःला! आणि मुळात
योगाशी याचा काय संबंध!)
आधी म्हणले रागावर नियंत्रण हवं पण मग म्हणे राग काढलाच पाहिजे
नाहीतर स्ट्रेस वाढेल. हे असं ऐकून आता मला राग येत होता पण राग काढला तर मी वाईट
आणि नाही काढला तर स्ट्रेस वाढणार! मग शांत बसलो. वाढू दे स्ट्रेस .. काय करणार!
माणसं उठून जात होती.
मी बसून राहिलो.
माणसं वैतागत होती.
मी त्यांचं वैतागणं पाहत होतो.
मग अचानक स्ट्रेस वाढला कारण २५ मिनिटं झाल्यावर ते म्हणाले आपण
एकच तासात संपवू!
(अजून तब्ब्ल ३५
मिनिटं दुःख.. दुःखाचे ५०% आजच संपणार बहुतेक..)
एकतर सुंदर पदार्थांची उदाहरणं वाढतच होती पण त्यातलं खायला
काहीच नव्हतं. त्यात योगदिवस असल्याने त्या वेळी कडेला बशीत काही तरी घेऊन खावं तर
ते ही बरं दिसत नाही.
या सगळ्या विचारात आणि ताणात बराच वेळ सरला.
अखेर तो क्षण आला.
दुःख संपून माझे राहिलेले ५०% सुख मिळविण्याचा.. अर्थात lecture संपण्याचा!
हो हो.. Lecture
खरंच संपलं..
माझा विश्वास बसत नव्हता..
पण हे खरं होतं..
ताण हळूहळू सरत होता..
सुखपहाट आली होती.. छे.. पहाट कसली..
सगळं संपेपर्यंत पार संध्याकाळ झाली.
त्यांना सांगावंसं वाटलं अशा दिवशी असं करू नका. पण मी शिकलो
होतो.. रागावर आणि जिभेवर
नियंत्रण!!
रागावर ठेवलं मी नियंत्रण.. पण जिभेवर ठेवणं शक्य नव्हतं.. कारण
अजूनही पाऊस पडत होता आणि तिथून बाहेर पडताच भजीचा वास मला खुणावत होता. सुखाचा
काळ खरंच जवळ येत होता.
-वरुण भागवत

Best!! 👏👏
ReplyDeleteWaa! Bharich hota he.....👌👍😋😍
ReplyDeleteफक्त शवासनच का?☺️☺️☺️
ReplyDeleteControl anger. 👌
ReplyDeleteThank you all!!
ReplyDelete