![]() |
| A Click by: Varun Bhagwat |
शाळेच्या वर्गाबाहेर २ मुलं भांडत होती.
त्यातला एक जण म्हणाला, “मला राग आला तर मी
काही पण करतो. मला उगाच चिडायला लावू नको.”
दुसरा म्हणाला,”काय करशील रे?”
पहिला म्हणाला, “खूप मारीन काय मी.”
दुसरा म्हणाला, “हिंमत तर कर. मी सोडेन का
तुला?”
हे चालू असताना सर वर्गात येऊ लागले.
मुलांच्या लक्षातच आलं नाही की सर कधी आले. सरांनी मात्र त्यांचं संभाषण येता येता
ऐकलं होतं. मात्र तिथे सर काहीच बोलले नव्हते. सर आल्याचं कळताच आपण काही केलंच
नाही आणि आपल्यात काही झालंच नाही अशा थाटात ते दोघे पण वर्गात आले आणि आपापल्या
जागी बसले.
सर्व मुलांचे हे लाडके शिक्षक असल्यामुळे
सरांना मुलं कायम गोष्ट सांगायला लावायची. आज पण मुलांनी गोष्टीची मागणी केली.
मुलांचा अभ्यासक्रम बऱ्यापैकी आटपत आला होता. त्या दोन मुलांचे संवाद पण सरांच्या
चांगलेच लक्षात होते. सरांनी हे सगळं साधून गोष्ट सांगायचं कबूल केलं.
सर सांगू लागले, “एक शेतकरी त्याच्या शेतात
फार मेहनत करून काम करत असे. त्याचा मुलगा सोनू हा फार दंगेखोर होता. नुसता
दंगेखोर असता तर ठीक पण त्याला राग सुद्धा पटकन यायचा. राग आल्यावर त्याचा
स्वत:वरचा ताबा सुटायचा. तो वाट्टेल ते करायचा. त्या शेतामध्ये एक कोल्हा काही
दिवसांपासून सारखा येत होता. तो यायचा आणि पिकांची नासधूस करायचा. सोनू ला कळलं की
असा एक कोल्हा आहे जो असं वागतोय. त्याचा स्वत:वरचा ताबा सुटला. त्याने ठरवलं की
काहीही करून या कोल्ह्याला अद्दल घडवायची. तो असं काही करणार आहे त्याची त्याच्या
वडिलांना अर्थात कष्टकरी शेतकऱ्याला काही कल्पनाच नव्हती.” असं म्हणत सरांची नजर
त्या दोन भांडणाऱ्या मुलांवर गेली. सर पुढे म्हणाले, “कधी कधी मुलं चूक करतात आणि
त्याची शिक्षा मात्र त्यांच्या पालकांना भोगावी लागते.”
“सर म्हणजे? त्याचा गोष्टीशी काय संबंध?” एक
मुलगा उत्सुकतेने म्हणाला.
सर पुढे म्हणाले, “अरे, सोनू काय पाऊल उचलणार
हे बिचाऱ्या शेतकऱ्याला माहित नव्हतं. सोनू ने काय केलं माहितीये?”
मुलं एकाच सुरात म्हणाली, ”काय?”
सर हसत सांगू लागले, “तो कोल्ह्याची वाट बघतच
बसला होता. कोल्हा येताच संधी साधून सोनुने कोल्ह्याच्या शेपटीला आग लावली.”
मुलं हसू लागली.
सर मात्र शांतपणे म्हणाले, “आधी तरी तो
कोल्हा फक्त पिकाचं थोडंफार नुकसान करत होता. मात्र अविचारी सोनू ने त्याच्या
शेपटीला आग लावल्याने कोल्हा पेटलेली शेपटी विझवायचा प्रयत्न करू लागला. या प्रयत्नात
तो शेतभर फिरला आणि पूर्ण शेत जळून खाक झालं. शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान झालं. हे
सगळं का घडलं मुलांनो?”
एक मुलगा खिदळत म्हणाला, “शेपटी
जाळल्यामुळे.”
सर त्याला टपली देत म्हणाले, “म्हणजे नेमकं
कशामुळे?”
एक चुणचुणीत मुलगा म्हणाला, “सर सोनूचा
स्वत:वर ताबा नसल्याने आणि त्याच्या रागीट आणि अविचारी स्वभावामुळे.”
सर म्हणाले, “या गोष्टीतून बोध काय घ्यायचा?”
तोच
चुणचुणीत मुलगा उत्तरला, “रागात असणाऱ्या माणसाचा स्वतःवर ताबा राहत नाही. तो
वाट्टेल ते करून बसतो. त्याला कसलंच भान राहत नाही. तो यात इतरांचं नुकसान करतो.
त्याच बरोबरीने स्वत:चं सुद्धा नुकसान करून घेतो. रागावर वेळीच आवर घातला की मोठं
नुकसान टाळता येतं. अशा परिस्थितीत आपल्याला समजत नसेल तर कोणाची तरी मदत घ्यायची.”
त्या दोन मुलांना कळायचं ते कळलं असावं असं
सरांना तरी वाटलं. नंतर सरांचा तास संपला, ते जाऊ लागले. ती दोन मुलं धावत सरांकडे
आली आणि म्हणाली, “सर...”
-वरुण भागवत

👍👍
ReplyDelete1 each no
ReplyDelete👌👌👍👍